ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे एपस्टीन फाईल प्रकरणामध्ये नाव आल्यामुळे त्यांच्यावरही राजीनामा देण्याचा नैतिक दबाव दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसतो. त्यामुळे मजूर संघात अस्वस्थता पसरली असून, अनेकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही सुरु आहे. अशा परिस्थितीत गृहसचिव शबाना महमूद यांचे नाव स्टार्मर यांच्या संभाव्य उत्तराधिकारी म्हणून आघाडीवर आले आहे. तसे झाल्यास त्या ब्रिटनच्या पहिल्या मुस्लीम आणि पाकिस्तानी वंशाच्या पंतप्रधान ठरू शकतात. यामुळे ब्रिटनच्या ‘ममदानीकरणा’बाबतच्या चर्चा आणि शंकांना उधाण आले आहे.
एकीकडे महाराष्ट्रातील पालिका निवडणुकांचा आढावा घेतला, तर मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत इस्लाम पाटच्या नसरीन शेख यांनी विजय मिळवला. त्यांच्याबाबत सध्या सोशल मीडियावर ‘बुरखा घातलेली महापौर’ म्हणून चर्चा रंगलेली असतानाच, शबाना महमूद यांच्या नावाचा ब्रिटनच्या मुस्लीम महिला पंतप्रधान म्हणून बोलबाला सुरू झाला आहे.
शबाना महमूद या 2010 पासून बर्मिंगहॅम लेडीवूड मतदारसंघातून खासदार आहेत. त्या प्रशिक्षित बॅरिस्टर असून, मजूर संघातील पहिल्या मुस्लीम महिला खासदारांपैकी एक. त्यांचे पालक पाकिस्तानी स्थलांतरित होते. बर्मिंगहॅममध्येच त्यांचा जन्म आणि शिक्षण झाले. कामगारवगय पार्श्वभूमी आणि ब्रिटिश मुस्लीम ओळख, याबाबत त्या अनेकदा उघडपणे बोलल्या आहेत. पक्षात त्यांची झपाट्याने प्रगती झाली, ‘शॅडो कॅबिनेट’मध्ये स्थान मिळाले आणि ‘शॅडो जस्टिस सेक्रेटरी’, तसेच ‘शॅडो एज्युकेशन सेक्रेटरी’सारखी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. 2024 मध्ये मजूर संघ सत्तेत आल्यानंतर 2025 मध्ये त्यांची गृहसचिव म्हणून नियुक्ती झाली. गृहमंत्रालय हे ब्रिटनमधील अत्यंत आव्हानात्मक मंत्रालयांपैकी एक असून, त्यात पोलिसिंग, राष्ट्रीय-सुरक्षा, स्थलांतर आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांचा समावेश होतो.
हा संपूर्ण वाद पीटर मँडेलसन यांच्याशी संबंधित आहे, जे स्टार्मर यांचे निकटवतय मानले जात होते. स्टार्मर यांनी त्यांची अमेरिकेतील ब्रिटिश राजदूत म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, जेफ्री एपस्टीनशी त्यांचे जुने संबंध उघडकीस आले. एपस्टीन यांना 2008 मध्ये लैंगिक गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आणि 2019 मध्ये तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला. नव्या कागदपत्रांनुसार, मँडेलसन यांनी एपस्टीनशी मैत्री कायम ठेवली होती. हे सर्व माहिती असूनही स्टार्मर यांनी नियुक्ती केल्याचे आरोप झाले. नंतर मँडेलसन यांना पदावरून हटवण्यात आले. त्यांनी मजूर संघ आणि ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मधूनही राजीनामा दिला. स्टार्मर यांनी एपस्टीनच्या पीडितांची जाहीर माफी मागितली. या घोटाळ्यामुळे ‘डाऊनिंग स्ट्रीट’ हादरले. स्टार्मर यांचे ‘चीफ ऑफ स्टाफ’ मॉर्गन मॅकस्विनी आणि ‘कम्युनिकेशन्स चीफ’ टीम ॲलन यांनी राजीनामे दिले. स्कॉटिश मजूर संघाचे नेते अनस सरवर यांनीही स्टार्मर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, शबाना महमूद आणि उपपंतप्रधान डेव्हिड लॅमी यांच्यासह काही कॅबिनेट सदस्यांनी स्टार्मर यांना पाठिंबा दिला आहे. स्टार्मर यांनी आपण ‘वॉक अवे’ करणार नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी पक्षातील असंतोष वाढत चालला आहे.
स्टार्मर यांच्या अडचणी वाढत असताना, पक्षीय वर्तुळात शबाना महमूद यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. कॅबिनेटमधील त्यांची मजबूत पकड, अनुभव आणि पक्षातील विविध गटांमध्ये असलेली स्वीकारार्हता ही त्यांची बलस्थाने मानली जाते. अँजेला रेयनर, वेस स्ट्रीटिंग अशी इतर नावेही पुढे येत असली, तरी शबाना महमूद यांच्याकडे अधिक विश्वासार्ह पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
शबाना महमूद यांच्याव्यतिरिक्त ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत एंजेला रेनर, वेस स्ट्रीटिंग, एड मिलिबॅण्ड आणि ॲण्डी बर्नहॅम ही प्रमुख नावे मानली जात आहेत. आज मालेगावच्या महापौरपदापासून उद्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचणारी ही चर्चा केवळ योगायोग नाही, तर बदलत्या जागतिक वास्तवाची खूण आहे. स्थलांतर, लोकसंख्येतील बदल आणि ओळखाधारित राजकारण, यामुळे पाश्चात्त्य लोकशाहीची दिशा झपाट्याने बदलत आहे. प्रश्न मुस्लीम महिला पंतप्रधान होण्याचा नाही; प्रश्न असा आहे की, या सत्ताबदलामागे मूल्यांची समानता राहील की, धार्मिक ओळख राजकीय अजेंड्याचा केंद्रबिंदू बनेल? इतिहास सांगतो की, जेव्हा लोकशाही सजग राहत नाही, तेव्हा निर्णय निवडणुकीत होतात; पण परिणाम पिढ्यांना भोगावे लागतात.