मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या वेगळ्या शैलीच्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे राजपाल यादव. ‘चुपके-चुपके’, ‘हंगामा’, ‘ढोल’, ‘धमाल’ आणि ‘भूलभुलैया’सारख्या चित्रपटांतून त्यांने प्रेक्षकांची मनं जिंकली. जवळपास दोन दशकांहून अधिक काळ तो बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. मात्र त्याच्या कारकिर्दीत एक असा टप्पा आला, ज्यामुळे त्याला मोठ्या आर्थिक आणि कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागलं. एका चित्रपटामुळे राजपालच्या आयुष्यात मोठं वादळ आलं.
२००९-१० च्या सुमारास राजपाल यादवच्या करिअरचा सुवर्णकाळ सुरू होता. तो एका वर्षात अनेक चित्रपट करत होता. अभिनयात यश मिळाल्यानंतर त्याने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही हात आजमावण्याचा निर्णय घेतला. २०१० मध्ये त्याने ‘अता-पता लापता’ हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात त्यांने केवळ मुख्य भूमिका साकारली नाही, तर दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारीही स्वतः सांभाळली. अधिकृतरित्या निर्मात्याच्या भूमिकेत त्याची पत्नी राधा यादवचे नाव देण्यात आले होते.
दमदार स्टारकास्ट, मोठी अपेक्षा
‘अता-पता लापता’मध्ये अनेक अनुभवी कलाकारांचा सहभाग होता. असरानी, ओम पुरी, मनोज जोशी, आशुतोष राणा, विजय राज, गोविंद नामदेव, शरत सक्सेना यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांनी चित्रपटात काम केले. कॉमेडी जॉनर आणि अनुभवी कलाकारांची फौज पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. राजपालने स्वतः ‘मानव चतुर्वेदी’ ही प्रमुख भूमिका साकारली होती.
चित्रपटासाठी घेतले कोट्यवधींचे कर्ज
चित्रपट निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करण्यात आली. अहवालांनुसार, सुमारे ११ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार झाला. त्यासाठी राजपालने स्वतःची बचत गुंतवली आणि दिल्लीस्थित एका कंपनीकडून सुमारे ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगितले जाते. चित्रपट यशस्वी ठरल्यास कर्जाची परतफेड सहज होईल, अशी त्याची अपेक्षा होती. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ‘अता-पता लापता’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटाची कमाई अत्यंत कमी राहिली. मोठ्या बजेटच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवरील उत्पन्न नगण्य ठरले. या अपयशामुळे राजपाल यादववर आर्थिक ताण वाढला.
कायदेशीर अडचणींचा सामना
कर्जाची परतफेड न झाल्याने संबंधित कंपनीने कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला. चेक बाऊन्स प्रकरणासह विविध तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणामुळे राजपालला न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करावा लागला. ही परिस्थिती त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी कठीण ठरली. मात्र त्यानंतर त्याने पुन्हा अभिनयाकडे लक्ष केंद्रीत करत हळूहळू चित्रपटसृष्टीत सक्रियता वाढवली.
आर्थिक संकट आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरही राजपाल यादवले हार मानली नाही. त्याने वेब सीरिज, चित्रपट आणि इतर प्रकल्पांमधून पुन्हा आपली उपस्थिती दाखवण्यास सुरुवात केली आहे. कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांना आनंद देणारा हा अभिनेता आजही आपल्या मेहनतीच्या जोरावर उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. पण आता पुन्हा एकदा हे प्रकरण पोलिसांपर्यत पोहोचलं आहे.
व्याज, दंड आणि विलंब शुल्काच्या वाढत्या ओझ्यामुळे थकबाकीची रक्कम तब्बल ९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. कर्जाची परतफेड करण्यासाठी राजपाल यादव यांनी कर्जदात्याला अनेक धनादेश (चेक) दिले होते. मात्र हे सर्व धनादेश बाऊन्स ठरले. त्यानंतर नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यानुसार त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली.
दरम्यान, २ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत संबंधित तुरुंग अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या निर्देशानुसार अखेर ५ फेब्रुवारी रोजी राजपाल यादव यांनी अधिकाऱ्यांसमोर हजर होत आत्मसमर्पण केले.