नवी दिल्ली : (Kiren Rijiju on Rahul Gandhi) अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे. संसद सभागृहाची दिशाभूल आणि निराधार विधानं केल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्तावाची सूचना दाखल करणार असल्याचे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाचे स्पष्ट नियम असून, एखाद्या सदस्यावर गंभीर आरोप करण्यापूर्वी अध्यक्षांना पूर्वसूचना देणे आवश्यक असते. मात्र राहुल गांधी यांनी हे नियम पाळले नाहीत, असा आरोप रिजिजू यांनी केला. सरकार आणि पंतप्रधानांवर निराधार व खोटे आरोप करण्यात आले असून, ज्येष्ठ मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याविरोधात कोणतीही सूचना न देता गंभीर आरोप करण्यात आल्याने विशेषाधिकारांचे उल्लंघन झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यानही ठोस मुद्दे न मांडता केवळ आरोप केल्याची टीका करत, राष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर विषयाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करू नये, असे आवाहनही रिजिजू यांनी केले.