BMC : जयघोषावेळी उबाठा गटाच्या नगरसेवकांनी बाळगलं मौन; आता छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा उबाठाला परके झाले?

11 Feb 2026 19:13:33
uddhav
 
मुंबई: (BMC) देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत अखेर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महापौरपदी भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी शिवसेना पक्षाचे संजय घाडी बिनविरोध निवडले गेले आहेत. या ऐतिहासिक निवडीमुळे भाजपने तब्बल ४४ वर्षांनी महापौरपद आपल्याकडे खेचून आणले आहे. मात्र यावेळी सभागृहात ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष होत होता, त्या वेळेला उबाठा गटाच्या नगरसेवकांनी मौन बाळगले. यामुळे आता हा चर्चेचा मुद्दा बनला आहे.

बिनविरोध निवडणूक; ऐतिहासिक निर्णय
महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली. भाजपकडून रितू तावडे तर शिवसेनाकडून संजय घाडी यांनीच अर्ज दाखल केले. विरोधी पक्षांनी उमेदवार उभा न केल्यामुळे ही प्रक्रिया बिनविरोध पार पडली. ११ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी अधिकृतपणे दोन्ही नावांची घोषणा केली.
महापालिकेत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह महत्त्वाचे अधिकारी आणि नगरसेवक होते. मनसेने महापौरपदाच्या निवडीबाबत तटस्थ भूमिका घेतली, तर काँग्रेस आणि उबाठा गटांनी उमेदवारी मागे घेतली.
 
महाराजांचं नाव घ्यायला उबाठा गटाला लाज वाटते? 
महापालिका सभागृहात बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी निवडणूक पार पडली. सभागृहात ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष होत होता, त्या वेळेला उबाठा गटाच्या नगरसेवकांनी मौन बाळगले. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उबाठा गटाला असलेला आदर दिसून येतो. स्वत:ला हिंदुत्ववादी मानतात, तरीही शिवरायांचा जयघोषाला प्रतिसाद देत नाहीत. उबाठा गटाच्या नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्यास प्रतिसाद दिला नाही. यामुळे उबाठा गटाच्या नगरसेवकांना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्यास लाज वाटते का? असा सवाल उपस्थित झाला आहे. तर यानंतर भाजप नगरसेवकांनी उत्साहाने ‘देवाभाऊ-देवाभाऊ’ असा जयघोष करून महापालिकेत आपला दबदबा स्पष्ट केला.







View this post on Instagram
















A post shared by MahaMTB (@themahamtb)


किशोरी पेडणेकरांचा आक्षेप आणि आयुक्तांचे उत्तर
निवडणूक प्रक्रियेदरम्यान उबाठा गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी हरकतीसह आरोप केला की, महापालिका आयुक्तांनी परंपरेला छेद केला आहे. त्यावर आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले की, २२ जानेवारी २०२६ रोजी शासनाने संबंधित आदेश दिला असून, पीठासीन अधिकारी म्हणून मी सभागृहाचे संचालन करत आहे. किशोरी पेडणेकर यांचा आरोप निराधार असल्याचे सांगितले.
 
महापौर पदासाठी एकमेव अर्ज असल्यामुळे रितू तावडे यांची निवड जाहीर झाली, तर उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांची निवड झाली. निवडीनंतर सर्व नगरसेवकांनी बाके वाजवून दोघांचे स्वागत केले.
 
कोण आहेत रितू तावडे?
रितू तावडे या भाजपच्या मुंबईतील एक आक्रमक आणि अनुभवी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. वर्ष २०१२मध्ये घाटकोपर प्रभाग क्रमांक १२१ मधून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती आणि त्या निवडूनही आल्या होत्या. यानंतर वर्ष २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक १२७ मधून त्यांनी विजय मिळवला होता. वर्ष २०२६ च्या निवडणुकीमध्ये रितू तावडे यांनी प्रभाग क्रमांक १३२ मधून विजय मिळवला आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे.
 
रितू तावडे यांचे शिक्षण आणि मालमत्ता
५३ वर्षीय रितू तावडे यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये नमूद केलंय की, त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले आहे. वर्ष १९९३ साली आचार्य मराठे कॉलेजमधून त्यांनी इयत्ता बारावीचे शिक्षण पूर्ण केले आहे. विद्याविहारच्या रहिवासी असलेल्या रितू तावडे या व्यापार क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.
 
रितू तावडे यांच्या कौटुंबिक आर्थिक स्थितीबद्दलही प्रतिज्ञापत्रात माहिती दिली आहे. त्यांच्या कुटुंबाकडे एकूण ५ कोटी २६ लाख ६७ हजार ४१७ रुपयांची मालमत्ता असून त्यावर ३ कोटी २ लाख ११ हजार ९५८ रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साधारण १४ लाख ७१ हजार ८७० रुपये इतके आहे.
 
भाजपचा भगवा महापालिकेवर फडकला
या ऐतिहासिक निवडीमुळे मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा डौलाने फडकला असून मागील चार दशकांचे स्वप्न साकार झाले आहे. शहराच्या प्रशासनात पारदर्शकता, कामकाजाची गती आणि विकासाच्या नव्या योजनांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0