संत रोहिदास विचारांचा सामाजिक जागर

11 Feb 2026 13:30:59

श्रम, समता आणि आत्मसन्मान या मूल्यांवर उभ्या राहिलेल्या हिंदू समाजाच्या संतपरंपरेत संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे स्थान अत्यंत प्रेरणादायी आहे. चर्मकार समाजासह संपूर्ण हिंदू समाजाला कर्तृत्व, एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा हा वारसा यंदा मुंबईत 650व्या जयंतीवर्षानिमित्त भव्य स्वरूपात अभिव्यक्त झाला. हा महोत्सव भक्तीपुरता न राहता, समाजघडणीसाठी एकत्र येण्याचा, श्रमप्रतिष्ठेचा सन्मान करण्याचा आणि सांस्कृतिक एकजुटीचा संकल्प अधोरेखित करणारा ठरला.

मुंबईतील दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात पार पडलेला संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती महोत्सवाचा शुभारंभ सोहळा या अर्थाने ऐतिहासिक ठरला की, त्यात भक्ती, संस्कृती, सामाजिक प्रश्न आणि शासनाची भूमिका या सगळ्यांचा एकत्रित प्रत्यय आला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने आणि चर्मकार समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती महोत्सव समितीच्यावतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रममंत्री मंगल प्रभात लोढा यांनी चर्मकार समाजाच्या मागण्यांबाबत स्पष्ट भूमिका मांडली. समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातील सर्व मागण्या येत्या वर्षभरात माग लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मंत्री लोढा यांनी आपल्या भाषणात संत रोहिदास महाराजांच्या ऐतिहासिक योगदानावर प्रकाश टाकला. मुघलकालीन संघर्षाच्या काळातही आपल्या संस्कृतीचे, धर्माचे आणि मूल्यांचे रक्षण करणाऱ्या संतपरंपरेत संत रोहिदास महाराजांचे स्थान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. कर्म, समता आणि मानवतेचा संदेश देत समाजातील शेवटच्या घटकाला आत्मसन्मान दिल्यामुळेच त्यांचे विचार आजही तितकेच सुसंगत असल्याचे त्यांनी सांगितले.

या सोहळ्याला संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज हभप शिवाजीराव मोरे महाराज, स्वामी विज्ञानानंद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुंबई महानगर सहसंघचालक प्रा. डॉ. विष्णू वझे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. हभप शिवाजीराव मोरे महाराज यांनी संत रोहिदास महाराजांच्या भक्तीमार्ग, समता आणि पर्यावरण संवर्धनाच्या विचारांवर सविस्तर भाष्य केले. पुढील जयंती सोहळ्यात सर्व संतांच्या वंशजांना सहभागी करून घेण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

स्वामी विज्ञानानंद यांनी आपल्या भाषणात संत रोहिदास महाराजांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचा आणि सामाजिक भूमिकेचा उल्लेख केला. 650 वर्षांनंतरही विविध समाजघटक एकत्र येऊन त्यांची जयंती साजरी करतात, हे त्यांच्या विचारांची ताकद दर्शवते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महोत्सवाच्या आयोजनात समितीचे विजय इंगळे, रविंद्र डोईफोडे, देवराम केदार, ज्ञानेश्वर ठोंबरे, गुरुदेव कांबळे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी प्रास्ताविकातून महोत्सवामागील भूमिका स्पष्ट केली, तर गुरूदेव कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. माजी मंत्री विजयभाई गिरकर, माजी आमदार बाबुराव माने यांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली. या जयंती महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ व्यासपीठावरील भाषणे नव्हे, तर त्यासोबत जोडलेली सांस्कृतिक आणि सामाजिक मांडणी. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत रोहिदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित पोवाडे सादर करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संत रोहिदास महाराजांच्या जीवनावरील कवितेने उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण केले.

दुपारी संत रोहिदास चौक, परळ एसटी डेपो येथून कार्यक्रम स्थळापर्यंत काढण्यात आलेली शोभायात्रा हा महोत्सवाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. संत रोहिदास महाराजांची वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर आणि भक्तांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. शोभायात्रेसोबत आयोजित चित्रप्रदर्शनाने संत रोहिदास महाराजांचे जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवले.

या सोहळ्यात महिलांनी हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभाग घेतला. महिलांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ‌‘इंडियन एज्युकेशन सोसायटी‌’च्या राजा शिवाजी विद्या संकुलात पार पडलेल्या मुख्य सोहळ्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, तसेच राज्यभरातून आलेल्या चर्मकार समाजाच्या संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपस्थितीने महोत्सवाचा व्यापक प्रभाव अधोरेखित झाला. संत रोहिदास महाराज जयंती महोत्सवातून समता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक न्याय आणि आत्मसन्मानाचे विचार प्रभावीपणे समाजासमोर मांडण्यात आले. हा महोत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता, चर्मकार समाजाच्या सन्मानाचा, एकतेचा आणि सामाजिक उन्नतीच्या संकल्पाचा जागर करणारा ठरला. संतविचार, शासनाची भूमिका आणि समाजाची अपेक्षा यांचा संगम घडवणारा हा महोत्सव येणाऱ्या काळातही सामाजिक संवादाचा महत्त्वाचा आधार ठरेल, अशी भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती महोत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नसून चर्मकार समाजाच्या सन्मान, एकता आणि सामाजिक प्रगतीचा मंच आहे. समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी शासनापर्यंत आमच्या मागण्या पोहोचवणे, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे. समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.
-धनंजय वायंगणकर
संत रोहिदास महाराज जयंती महोत्सव समिती प्रतिनिधी



संत रोहिदास महाराज जयंती महोत्सवासाठी विविध संघटना, कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र येणे, हीच या कार्यक्रमाची खरी ताकद आहे. शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विचारमंथन यातून संतांचे विचार समाजमनात रुजवण्याचा प्रयत्न केला. हा महोत्सव समाजाच्या एकात्मतेचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव आहे.
-ज्ञानेश्वर ठोंबरे
संत रोहिदास महाराज जयंती महोत्सव समिती समन्वयक


- सागर देवरे
9967020364


Powered By Sangraha 9.0