वक्ता दशसहस्रेषु

    11-Feb-2026   
Total Views |

लोकव्याख्यानाच्या माध्यमातून पुढच्या पिढीमध्ये परिवर्तनाचा विचार पेरणाऱ्या प्रा. विशाल गरड यांची गोष्ट...

भारताची युवापिढी हे भारताचं खरं सुवर्णसंचित आहे, हे इथल्या महापुरुषांनी ओळखलं होतं. आपल्याला जर या देशामध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल, तर याच युवापिढीला बलशाली करणं महत्त्वाचं आहे, असा विचार त्यांनी वारंवार मांडला. मात्र, ही माणसं फक्त विचार मांडून थांबली नाहीत, तर त्यांनी आपल्या आचरणातून युवकांना यशाचा कानमंत्र दिला. महापुरुषांचे हेच विचार आपल्या वाणीतून समाजापर्यंत पोहोचविणारे लोकव्याख्याते म्हणजे प्रा. विशाल गरड.

सोलापूरच्या बाश तालुक्यातील पांगरी येथे विशाल यांचा जन्म झाला. सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या विशाल यांचं शिक्षण गावच्या शाळेत झालं. गावच्या शाळेत शिकता-शिकता हळूहळू त्यांच्यातील एक व्यासंगी माणूस तयार होत होता. कृषी विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर मानसशास्त्र, व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले. शिक्षणाच्या याच ओढीने त्यांनी आपल्या अभ्यासातून पुढच्या पिढीची मशागत करण्याचा निर्णय घेतला. डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय, उक्कडगाव, ता. बाश या नामवंत संस्थेमध्ये 2013 पासून ‌‘पिकशास्त्र आणि पर्यावरण‌’ या विषयांच्या अध्यापनासाठी साहाय्यक प्राध्यापक म्हणून ते कार्यरत झाले. त्यांनी अध्यापनासोबत आपले छंद जोपासण्याचं, त्याचे संस्कार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरूच ठेवलं. चित्रकला, सुलेखन, काव्यलेखन अशा वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांनी आपल्यातील कलाकार आणि माणूसपण जपलं. चित्रकलेमध्ये त्यांनी बॉलपेनच्या माध्यमातून एक आगळावेगळा आविष्कार साकारला.

मात्र, या सगळ्याच्या पलीकडे त्यांची खरी ओळख महाराष्ट्राला आहे, ती एक लोकव्याख्याता म्हणून! खरं तर शाळेमध्ये तर त्यांनी कुठल्याच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला नव्हता. महाविद्यालयात असताना मात्र योगायोगाने त्यांचं नाव एका वक्तृत्व स्पर्धेत दाखल झालं. ते बोलण्यासाठी उभे राहिले आणि व्यासपीठावर गेले. अशातच अचानक समोरची गद बघून त्यांना घाम फुटला आणि ते काही न बोलताच तिकडून पळून गेले. कोणीही दुसरा विद्याथ असता, तर सर्वसामान्य घटना म्हणून त्याने हा प्रसंग विसरला असता. मात्र, विशाल गरड यांच्या मनाने या प्रसंगाचा ठाव घेतला. आपल्याला या भीतीवर मात करायची आहे, असा निर्धार त्यांनी केला आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. वाचन, लेखन, चिंतन, मनन, श्रवण अशा वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांनी वक्तृत्वाचं कौशल्य आत्मसात केलं. याच काळात छत्रपती शिवाजी महाराज, ‌‘भारतरत्न‌’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारांमुळे त्यांचं भावविश्व पूर्णपणे बदलून गेलं. या महापुरुषांचा विचार आपण जनसामान्यांपर्यंत, विशेषतः युवकांपर्यंत पोहोचवायला हवा, असा विचार त्यांनी केला आणि त्यांच्या जीवनातील ‌‘व्याख्यान‌’पर्वाला सुरुवात झाली. 15 वर्षांच्या कालावधीमध्ये दोन हजारांहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली. अनेक नामवंत शैक्षणिक संस्थांसहीत, मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी व्याख्याने दिली. राजधानी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने इतिहासात पहिल्यांदाच जुन्या राजेंद्रनगर येथे शिवजयंतीनिमित्त प्रमुख व्याख्याता म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

त्यांच्या व्याख्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचा ग्रामीण बोलीतील लहेजा. त्यांनी आपल्या वक्तृत्वामध्ये कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश येऊ दिला नाही. अमेरिकेतील श्यारलेट मराठी मंडळाच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये त्यांना व्याख्यानासाठी बोलावण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त चित्रपट क्षेत्रातसुद्धा विशाल गरड यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. ‌‘दैना‌’, ‌‘बुचाड‌’, ‌‘तोड‌’ अशा लघुपटांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य कष्टकरीवर्गाच्या जाणिवा रुपेरी पडद्यावर मांडल्या. त्यांच्या या चित्रसृष्टीच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा प्रदान करण्यात आले. मुलांच्या भविष्याला आकार देणाऱ्या या शिक्षकाने निराधार, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत करत अनेकांच्या जीवनाला आधारसुद्धा दिला. स्वतःच्या लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी केरळमधल्या पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला. दुर्गरक्षणासाठी झटणाऱ्या अनेक संघटनांना त्यांनी मदत केली.

विशाल गरड आपल्या प्रवासाविषयी सांगताना म्हणतात की, “मी माझ्या भाषेशी, मातीशी एकनिष्ठ राहिलो, म्हणून इथवर पोहोचलो. लोकांसमोर व्याख्याने देण्यासाठी मी उभा राहतो, तेव्हा भगवी शाल परिधान करून मी लोकांसमोर जातो. कारण, भगवा ही आपली ओळख आहे. आपला विचार आहे.” प्रा. विशाल गरड यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’तर्फे शुभेच्छा.
9967826983

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.