६९ वर्षीय अनिल कपूर यांचा डॅशिंग अंदाज, ‘सुबेदार’चा हटके टीझर प्रदर्शित

11 Feb 2026 19:31:13

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर त्यांच्या फिटनेसाठी कायम चर्चेत राहिले आहेत. वयाच्या ६९ व्या वर्षीही त्यांचा फिटनेस अगदी तरुणांनाही लाजवणारा ठरतो. तर सध्या त्यांच्या आगामी ‘सुबेदार’ या चित्रपटामुळेही ते चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. आता या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला असून चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे. दीर्घकाळानंतर अनिल कपूर अ‍ॅक्शन अवतारात दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर टीझर शेअर करत “गलत आदमी से पंगा ले लिया” असे कॅप्शन दिले आहे. यासोबतच चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ‘सुबेदार’ हा चित्रपट ५ मार्च रोजी, होळीच्या निमित्ताने, प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.






View this post on Instagram
















A post shared by prime video IN (@primevideoin)


एक मिनिट सात सेकंदांच्या टीझरमध्ये अनिल कपूर एका जीपसमोर उभे दिसतात. जीपच्या मागे ‘फौजी’ असा उल्लेख आहे. कथेनुसार ते निवृत्त सैनिकाची भूमिका साकारत आहेत. वय वाढल्यामुळे त्यांना कमी लेखले जाते आणि हलक्यात घेतले जाते. काही प्रसंगांमध्ये त्यांचा अपमानही केला जातो. मात्र शेवटी तेच आपल्या ताकदीने आणि धाडसी कृतीने समोरच्यांना चोख प्रत्युत्तर देताना दिसतात. चित्रपटात राधिका मदान, सौरभ शुक्ला आणि फैसल खान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले असून निर्माते विक्रम मल्होत्रा, अनिल कपूर आणि सुरेश त्रिवेणी आहेत.

कथानकाबद्दल बोलायचे झाल्यास, अनिल कपूर ‘अर्जुन मौर्य’ या निवृत्त सैनिकाची भूमिका साकारत आहेत. राधिका मदान त्यांच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. वडील-मुलीतील नातेसंबंध, त्यातील दुरावा आणि कुटुंबासाठी उभे राहणारा संघर्ष याभोवती कथा फिरताना दिसते. घर आणि कुटुंब वाचवण्यासाठी अर्जुन मौर्य पुन्हा एकदा लढायला सज्ज होतो, अशी या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना आहे. अ‍ॅक्शन, भावना आणि कौटुंबिक नात्यांचा संगम असलेला ‘सूबेदार’ होळीच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, ट्रेलरची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.


Powered By Sangraha 9.0