वादे वादे जायते तत्त्वबोध:

    10-Feb-2026
Total Views |

संवाद हवा, तर्क हवा, विचारांची देवाणघेवाणही हवी. यातून जे विचारमंथन होते, त्यातूनच सत्याची खरी जाणीव होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीचे सत्य विकृत करून सांगणाऱ्यांना सरसंघचालकांनी समाजाशी थेट संवाद साधल्यामुळे चाप बसला आहे. ही संवाद प्रक्रिया व तिचे पडसाद प्रदीर्घ काळ उमटत राहतील किंवा काहीच प्रतिक्रिया येणारही नाही. कारण, आता सगळ्या भेदांनाच व अपप्रचाराला तिलांजली मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शनिवारी व रविवारी मुंबईच्या कला क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या नेहरू सेंटरच्या सभागृहात दोन दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा विविध क्षेत्रांतील दिग्गजांबरोबर संवाद संपन्न झाला. हा संवाद खऱ्या अर्थाने संवाद होता व एखाद्या उत्तम मैफिलीची सांगता संगीताचा परमोच्च बिंदू गाठून होते, तशी या संवादाची सांगता सुसंवादातून झाली. खरेतर विजयादशमीचे सरसंघचालकांचे उद्बोधन संघ व समाजासाठी मार्गदर्शन करणारे भाषण मानले जाते.

समाजातल्या एखाद्या विशिष्ट घटकासाठी विशिष्ट संवाद साधण्याचा संघाचा रिवाज नव्हता. मात्र, संघ शताब्दी व त्याचा पूर्वार्ध हे निमित्त मानून, रा. स्व. संघाने विविध महानगरांत भारतातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांशी संवाद साधायला सुरुवात केली. क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर विश्वास ठेवणाऱ्या रा. स्व. संघाच्या इतिहासात हा संवाद महत्त्वाची नोंद म्हणून नोंदवला जाईल.

देशभरात विविध ठिकाणी झालेल्या अशा विविध कार्यक्रमांत पत्रकार, तत्त्वज्ञ, चित्रकार, कलाकार, प्राध्यापक, उद्योजक, विविध देशांचे राजदूत, संत-महंत, विविध पंथांचे प्रमुख अशा अनेक श्रेणींतील बहुसंख्य दिग्गजांनी हजेरी लावली. देशाच्या राजकीय राजधानीत तर सतत संघाला पाण्यात पाहणारी मंडळीही या संवाद कार्यक्रमात सहभागी झालेली दिसली. त्यांना झालेल्या संघाच्या आकलनानुसार त्यांनी पू. सरसंघचालकांना प्रश्नही विचारले. सरसंघचालकांनीही तितक्याच समंजसपणे प्रश्नांचे रोख व त्यातून काढला जाणारा अर्थ लक्षात घेऊन, त्या प्रश्नांची चोख उत्तरे दिली. त्यामुळे मुंबईसह सर्वच महानगरांत झालेला हा संवाद ‌‘मोनोलॉग‌’ न राहता, आत्मसंवादातून जनसंवादाचा प्रयोग ठरला. संवादाच्या ज्या तीन प्रक्रिया जनसंवादाचे विद्याथ अभ्यासत असतात, त्यात आत्मसंवाद, संवाद व जनसंवाद हे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. संघाचा आत्मसंवाद हा केवळ राष्ट्रभक्तीतून जन्मलेला आहे. या देशात या मातीसाठी काम करीत असताना आलेल्या अनुभवांतून संघाची संवाद प्रक्रिया घडली आहे. सरसंघचालकांचा हा संवाद व्यापक जनसंवादाची नांदी ठरला. या संवादाचे परिणाम प्रदीर्घ काळ अनुभवता येतील. संघाविषयीचे समज-गैरसमज हे संघ व समाज यांच्यातील संवाद-सेतूंच्या अभावामुळे निर्माण झाले होते. अभिमत निर्माण करणारी मंडळी आपापल्यापरीने संघ समजून घेतात व संघाचा भलाबुरा अर्थ समाजाला सांगत राहतात. परवाच्या संवादामुळे एका झटक्यात संघ व समाजा मधला हा अडसर दूर झाला आहे.

मुंबई हे आर्थिक व मनोरंजन क्षेत्राचे अग्रेसर शहर. इथल्या अर्थकारणाला व मनोरंजनाला आकार देणाऱ्या व्यक्ती व दिग्गजांना या शहरात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दोन्ही स्तरांतील गणमान्य लोकांनी सरसंघचालकांसोबत संवाद साधला. सिनेमा हे अभिमतनिर्मितीतील महत्त्वाचे माध्यम. अनेकदा हिंदूविरोधी, संघविरोधी अभिमत निर्माण करीत असताना, याच क्षेत्रातील मंडळींचा प्रभावीपणे वापर केला जातो. यातील काही लोक खरोखरच संघापासून अनभिज्ञ आहेत, तर काही लोक स्वत:च्या तुच्छ लाभांसाठी संघाची बदनामी करीत असतात. मात्र, जेव्हा संघच संवादी होऊन जातो, तेव्हा अशा मंडळींची दुकाने बंद होतात. संघ दलितविरोधी आहे, संघ मुस्लीमविरोधी आहे, संघ ख्रिश्चनविरोधी आहे, हे आणि असे कितीतरी ‌‘फेक नॅरेटिव्ह‌’ सतत संघाविषयी पसरविले जातात. यासाठी पुस्तके लिहिली जातात, परिसंवाद भरविले जातात, अनेका एनजीओंची पोटंही यावर भरतात. सरसंघचालकांनी यावर उत्तम विवेचन केले आहे. मुंबईच्या कार्यक्रमात एखादी दलित व्यक्ती सरसंघचालक होऊ शकते का? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी अत्यंत मार्मिक पद्धतीने दिले. सरसंघचालक होण्याचा निकष हिंदू असणे व संघटनेसाठी समर्पण करणे, हाच असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. वादातून, संवादातून, विचारमंथनातून जी घुसळण होते; त्यातूनच सत्याची, तत्त्वाची खरी जाणीव होते. भारतीय परंपरेत वाद म्हणजे भांडण नव्हे, तर सत्याच्या शोधासाठी प्रश्न विचारणे, मतभेद मांडणे, तर्क लावणे अशी ही प्रक्रिया आहे. यातून तत्त्वबोध आकाराला येतो. व्यक्ती असो, कुटुंब असो, संस्था असो, समाज असो किंवा देश; जिथे मुक्तपणे, सुसंस्कृतपणे तर्काधिष्ठित संवाद होतो, तिथेच समाज पुढे जातो. जिथे या प्रक्रिया दुर्लक्षित केल्या जातात, तिथेच विचार मरून जातात. स्वत:च्याच विचारांना अंतिम सत्य घोषित करणाऱ्या माध्यमांच्या बजबजपुरीत हा संवाद मेोलाचा ठरला. माध्यमांना त्यात सरसंघचालकांनी साधलेल्या संवादापेक्षा सलमान खानची उपस्थिती बातमीमूल्य असलेली घटना वाटली, यातच सगळे आले. सरसंघचालकांनी माध्यमांचे वर्णन करत असतानाच, “आज माध्यमे जे काही वृत्तांकन करतात, त्यापेक्षा किमान 40 टक्के समाजात काही चांगले घडत असते,” असे सांगितले. पू. सरसंघचालकांनी आपल्या दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’चा पहिल्या दिवशीच्या त्यांच्या भाषणाचा दिलेला शब्द अन्‌‍ शब्द वृत्तांत विशेषकरून उल्लेखला, ही दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’च्या टीमसाठी अभिमानाची बाब ठरली.

आपल्या दुसऱ्या सत्रात सरसंघचालकांनी जे सांगितले, तोच या संवादाचा खरा ‌‘टेक-अवे‌’ मानावा लागेल. समाजाची, देशाची चिंता करीत असताना ‌‘पंचपरिवर्तना‌’चे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. वीज वाचवण्यापासून ते कुटुंबात बसून ‌‘आपण कोण आहोत‌’ याचा कुटुंब म्हणून शोध घेण्यापर्यंत अनेक विषयांतील त्यांचे मार्गदर्शन सर्वस्वी उद्बोधक होते. दोन दिवस नेहरू सेंटरचे देखणे सभागृह कार्यक्रम संपून राष्ट्रगीत होईपर्यंत खचून भरलेले राहणे, हा एक निराळाच संकेत आहे. संवादाच्या या प्रक्रियेमुळे शंभरीच्या घरात आलेला संघ समजून घ्यायला सर्वसामान्य नागरिकांना उपयोग होईल, यात शंका नाही!