भारतात आरोग्य क्षेत्रात प्रगती होत असताना असंसर्गजन्य आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजारांचे प्रमाण मात्र वेगाने वाढत आहे. ‘पार्किन्सन’सारखे न्यूरोलॉजिकल विकार अधिक ठळकपणे पुढे येत आहेत. विशेष म्हणजे, हा आजार आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित न राहता, मध्यम वयोगटातील आणि कार्यक्षम लोकसंख्येलाही ग्रासू लागला आहे. वाढती रुग्णसंख्या, बदलती जीवनशैली, पर्यावरणीय कारणे आणि उपलब्ध नसलेले ठोस उपचार यामुळे ‘पार्किन्सन’ वैद्यकीय, सामाजिक व आर्थिक अशा तिन्ही पातळ्यांवर गंभीर आव्हान ठरत आहे.
भारतातील आरोग्यस्थिती झपाट्याने बदलत असताना दीर्घकालीन, असंसर्गजन्य आजारांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हृदयविकार, मधुमेह यांसारख्या आजारांनंतर आता ‘पार्किन्सन’ हा गंभीर न्यूरोलॉजिकल आजारही देशासमोर मोठे आव्हान उभे करत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काही वर्षांत भारतात ‘पार्किन्सन’ची रुग्णसंख्या वेगाने वाढण्याची शक्यता असून, जागतिक पातळीवर भारत दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची भीती वैद्यक क्षेत्रातूनही व्यक्त केली जात आहे. ‘पार्किन्सन’ आजार हा मेंदूशी संबंधित विकार आहे. मेंदूतील ‘सब्स्टॅन्शिया नायग्रा’ या भागातील मज्जापेशी हळूहळू नष्ट होत जातात. या पेशी ‘डोपामाईन’ नावाचे शरीरासाठी महत्त्वाचे असे रसायन तयार करतात, जे रसायन शरीराच्या हालचाली नियंत्रित ठेवण्याचे काम करते. ‘डोपामाईन’चे प्रमाण कमी होत गेले की हालचाली मंदावणे, स्नायूंमध्ये कडकपणा येणे, हातपाय थरथरणे आणि संतुलन बिघडणे अशी लक्षणे आपल्याला दिसू लागतात. या आजाराची सुरुवात अनेकदा अतिशय सूक्ष्म लक्षणांनीच होते. सुरुवातीला हात किंवा बोटांमध्ये थरथर, चालताना पावले ओढत टाकली जाणे, चेहऱ्यावर भावभावना कमी दिसणे, लिहिताना अक्षरे लहान होणे अशी चिन्हे दिसतात. पुढील टप्प्यात बोलण्यात अडचणी, पडण्याचे प्रमाण वाढणे, झोपेचे विकार, नैराश्य आणि स्मरणशक्तीवर परिणाम जाणवू लागतो. त्यामुळे वेळेत निदान न झाल्यास आजार अधिक गंभीर रूप धारण करतो.
आजवर ‘पार्किन्सन’ हा मुख्यतः वृद्धांचा आजारच मानला जात होता. मात्र, अलीकडच्या काळात ३० ते ५० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याबाबतचा अहवाला अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आला. यामागे वाढते औद्योगिकीकरण, वायू व रासायनिक प्रदूषण, कीटकनाशकांचा दीर्घकाळ संपर्क, डोक्याला झालेल्या जखमा, तसेच काही अनुवंशिक घटक कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बदलती जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव आणि तणावपूर्ण वातावरण हे घटकही या आजाराला पोषक ठरतात. दरम्यान, ‘पार्किन्सन’ रोगाच्या मूळ कारणांबाबत अलीकडील संशोधनातून एक महत्त्वाचा नवा दृष्टिकोन पुढे आला आहे. या संशोधनानुसार, ‘पार्किन्सन’ रोगाची सुरुवात केवळ मेंदूपासून होत नसून, ती आतड्यांपासूनदेखील होत असल्याची शक्यता एका संशोधनातून पुढे आली आहे. आपल्या आतड्यांमध्ये शरीराचे संरक्षण करणाऱ्या प्रतिकारक पेशी असतात. काही परिस्थितींमध्ये या पेशी ‘पार्किन्सन’शी संबंधित घातक प्रथिनांना पूर्णपणे नष्ट करू शकत नाहीत. परिणामी, ही प्रथिने आतड्यांपासून रक्तप्रवाहात प्रवेश करून, पुढे मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांमध्ये या प्रतिकारक पेशींची संख्या कमी केल्यास मेंदूत आजाराचा प्रसार कमी झाल्याचे आढळून आले आहे. या निष्कर्षामुळे आतडे आणि मेंदू यांचा संबंधही ‘पार्किन्सन’ रोगात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट होते. अर्थात, या संशोधनामुळे या आजारावरील भविष्यातील उपचारांसाठी नवे मार्ग खुले होण्याची शक्यताही वाढली आहे.
‘पार्किन्सन’ रोगाचा सर्वाधिक परिणाम रुग्णाच्या दैनंदिन जीवनावर होतो. हालचालींवरील मर्यादा, स्वावलंबन कमी होणे, कामकाज करण्याची क्षमता घटणे आणि मानसिक अस्वस्थता यामुळे रुग्णासोबतच त्याच्या कुटुंबावरही मोठा ताण येतो. दीर्घकाळ चालणारे औषधोपचार आणि देखभाल यामुळे आर्थिक भारही वाढतो. त्यामुळे हा आजार केवळ वैद्यकीय नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक समस्येचे स्वरूप धारण करत चालला आहे. सध्या ‘पार्किन्सन’ रोग पूर्णपणे बरा करणारा उपचार सध्या उपलब्ध नाही. मात्र, आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे लक्षणांवर प्रभावी नियंत्रण शक्य झाले आहे. ‘डोपामाईन’ची कमतरता भरून काढणारी औषधे, नियमित फिजिओथेरपी, व्यायाम, संतुलित आहार आणि मानसिक समुपदेशन यांमुळे रुग्णाचे जीवनमान बऱ्याच प्रमाणात सुधारू शकते. काही निवडक आणि गंभीर प्रकरणांमध्ये ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ ही शस्त्रक्रियादेखील उपयोगी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर ‘पार्किन्सन’ रोगाबाबत जनजागृती वाढवणे, प्राथमिक आरोग्य पातळीवर लवकर निदानाची सोय करणे, तसेच देशांतर्गत संशोधनाला चालना देणे अत्यावश्यक आहे. या आजाराची वाढती रुग्णसंख्या ही आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा देणारी धोक्याची घंटा आहे. वेळेवर प्रतिबंधक उपाय, योग्य उपचार आणि सामाजिक संवेदनशीलता दाखवली, तर या आजाराचा वाढता भार काही प्रमाणात तरी नियंत्रणात ठेवणे शक्य होईल.
(प्रतिनिधी)