‘सुपर डुपर’मधून उलगडणार कौटुंबिक नात्यांची गोष्ट

    10-Feb-2026
Total Views |

मुंबई: मराठी प्रेक्षकांना कौटुंबिक विषयांवरील चित्रपट नेहमीच खास आकर्षित करतात. कुटुंबातील नातेसंबंध, सुख-दुःख, भावना आणि आपुलकी यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहणारा मोठा प्रेक्षकवर्ग आपल्याकडे आहे. अशाच सर्व वयोगटातील आणि विविध पार्श्वभूमीतील प्रेक्षकांना आपलासा वाटेल असा ‘सुपर डुपर’ हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजची प्रस्तुती, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त निर्मितीतून साकारलेला आणि समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘सुपर डुपर’ चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. टीझर पाहून चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

या टीझरमधून चित्रपटातील एकाहून एक सरस कलाकारांची झलक पाहायला मिळते.
निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह मुख्य भूमिकेत ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले ही लोकप्रिय जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. इतकी भक्कम स्टारकास्ट एकत्र आल्यामुळे चित्रपटाबद्दल अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.

‘कौटुंबिक महासोहळा’ ठरणार प्रेक्षकांसाठी खास अनुभव

‘कौटुंबिक महासोहळा’ अशी टॅगलाईन असलेला ‘सुपर डुपर’ हा चित्रपट येत्या ३ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कुटुंबातील नात्यांची गुंफण, भावना, आनंद आणि संघर्ष यांचा सुंदर मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे टीझरमधून स्पष्ट होते.


चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात,
“हा चित्रपट एका कुटुंबासाठी आणि कुटुंबावर आधारित आहे. माणसाच्या जडणघडणीत कुटुंबाचा फार मोठा वाटा असतो. कुटुंबामुळेच अनेक भावना आपल्याला अनुभवता येतात. अशाच विविध भावनांची मेजवानी ‘सुपर डुपर’मधून प्रेक्षकांना मिळणार आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच आपलासा वाटेल असा हा चित्रपट आहे.”

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात,
“या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटातून आम्ही एका कुटुंबाची भावनिक गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडली, जी प्रेक्षकांना भावली. आता ‘सुपर डुपर’मधून आम्ही पुन्हा एकदा कुटुंबाचीच, पण वेगळ्या धाटणीची आणि अधिक धमाकेदार कथा घेऊन येत आहोत. मराठीतील अनेक दिग्गज कलाकारांचा अभिनय असलेला हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.” ‘सुपर डुपर’ या चित्रपटाची निर्मिती विजय शिंदे आणि नरेश बोर्डे यांनी केली असून, उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.