वयाच्या ५व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हा मराठी सुपरस्टार माहितीये?

    10-Feb-2026
Total Views |

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards) हा सर्वोच्च सन्मान मानला जातो. देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणारा हा पुरस्कार प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातील मोठा टप्पा असतो. अनेक बॉलिवूड सुपरस्टार्सनी दशकानुदशके काम करूनही हा मान मिळवू शकले नाहीत. मात्र एका मराठमोळ्या अभिनेत्याने अवघ्या पाचव्या वर्षीच हा पुरस्कार जिंकून इतिहास घडवला होता. तर त्यानंतर त्या अभिनेत्याने अनेक सुपहीट चित्रपटसुद्धा दिले होते.

राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा बालकलाकार कोण?

ज्या अभिनेत्याचा इथे उल्लेख केला जात आहे, ते म्हणजे सचिन पिळगावकर. लहान वयातच अभिनयात पाऊल ठेवणाऱ्या सचिन यांनी बालपणीच आपली असामान्य प्रतिभा सिद्ध केली. त्यांनी धर्मेंद्र, संजीव कुमार आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सचिन पिळगावकर यांना १९६३ साली प्रदर्शित झालेला त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट ‘हा माझा मार्ग एकला’ साठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी मिळालेल्या या यशामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. या यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुढे त्यांना ‘अजब तुझे सरकार’ या चित्रपटासाठी दुसराही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.


बॉलिवूडमधील यशस्वी प्रवास

बालकलाकार म्हणूनच नव्हे, तर प्रौढ वयातही सचिन पिळगावकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. शोले, त्रिशूल, सत्ते पे सत्ता यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही लक्षात राहणाऱ्या आहेत. ‘शोले’मधील अहमदच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून त्यांना विशेष दाद मिळाली.

‘नदिया के पार’ने बनवले देशाचे लाडके कलाकार

१९८२ साली प्रदर्शित झालेला ‘नदिया के पार’ हा चित्रपट सचिन पिळगावकर यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. चंदन या साध्या, प्रेमळ भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हा चित्रपट देशभर लोकप्रिय झाला आणि पुढे तो कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जाऊ लागला. या चित्रपटानंतर सचिन पिळगावकर हे घराघरात पोहोचले आणि संपूर्ण देशाचे लाडके कलाकार बनले.

अभिनय, दिग्दर्शन आणि संगीत अशा विविध क्षेत्रांत यश मिळवणारे सचिन पिळगावकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मानले जातात. बालवयात मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीची नांदी ठरला, हे आजही त्यांच्या यशकथेवरून स्पष्ट होते.