मनपात पुन्हा ‌‘भाजपराज‌’

    10-Feb-2026
Total Views |

2017 सालच्या महापालिका निवडणुकीतील प्रचारादरम्यान एका प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “नाशिकला मी आजपासून दत्तक घेतो, इथली एकहाती सत्ता भाजपला द्या,” अशी भावनिक साद नाशिककर मतदारांना घातली. त्याला नाशिकच्या जनतेने प्रतिसाद देताना भाजपच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकत, नाशिक महापालिकेच्या किल्ल्या हवाली करण्याचे काम केले. मिळालेल्या सत्तेची जाण राखत, नाशिकची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू करण्यास भाजपने सुरुवात केली. त्यासाठी वेळोवेळी नाशिकला भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामे उभारण्यावर भरही दिला. मधल्या काळात शहरातील तीनही आमदार भाजपचेच निवडून आले. या आमदारांनी आपापल्या मतदारसंघात विकासकामांचा जवळजवळ डोंगरच उभा केला. महापालिकेत प्रशासकीय राजवट असताना देखील, या आमदारांकडून शहरातील समस्यांबाबत वेळोवेळी प्रशासनाविरोधात आवाज उठवत, नाशिकच्या प्रश्नांना वाचा फोडत, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम केले. त्यामुळे अधिकारीवर्गाकडून कामे करण्यावरच भर देण्यात आला. परिणामी, तीन ते चार वर्षे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडूनही महापालिका पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या हवाली करण्याचे काम मतदारांनी करत, 72 नगरसेवक निवडून दिले.

एकहाती सत्ता मिळूनही नाशिकच्या विकासाला खिळ बसू नये आणि महायुती अबाधित राहावी, यासाठी शिवसेना शिंदे पक्षाला सोबत घेत भाजपने उपमहापौरपद बहाल केले. त्यामुळे नाशिक महापालिकेत विरोधक चांगलेच क्षीण झाले आहेत. आता नाशिकमध्ये पूर्णपणे ‌‘भाजपराज‌’ आले असून, सुरक्षित आणि विकसित नाशिक होण्याकडे वाटचाल अधिक जोमाने सुरू होईल. येत्या काळात नाशिकमध्ये मोठे उद्योग येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या जोडीला नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या उद्देशाने रस्ते, रेल्वे आणि हवाई या तिन्ही मार्गांचे जाळेही विणले जात आहे. त्यातच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणारी विकासकामे दर्जेदार होण्याबरोबरच, लागणारा निधी पर्याप्त स्वरूपात मिळण्ोही शक्य होईल आणि यासोबतच नाशिकचा विकास होण्यासाठीही हातभार लागेल.

उबाठावर माघारीची नामुष्की

नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट कौल मतदारांनी दिला. नाशिक महापालिकेत तर मागील निवडणुकीचा आपला रेकॉर्ड तोडताना भारतीय जनता पक्षाचे 72, शिवसेना शिंदे पक्ष 26, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने चार जागा मिळवत; महायुतीचे 122 पैकी 102 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे एकट्या भाजपच्या संख्याबळावर महापौर भाजपचा होणार, हे निर्विवाद सत्य होते. तरीही, आगळीक करायची सवयच लागलेल्या उबाठा गटाने कुठेतरी चर्चेत राहायचे म्हणून, 15 नगरसेवकांच्या जोरावर महापौरपदासाठी आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याचे काम केले. त्यात एकत्र लढूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवडून आलेल्या एकमेव नगरसेवकाने, शिवसेना शिंदे पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला; तर काँग्रेसचीही साथ ठाकरेंना मिळाली नसती. त्यामुळे प्रत्यक्ष महापौर निवडीच्या वेळी आपली अधिक नाचक्की होऊ नये म्हणून पीठासीन अधिकारी आयुष प्रसाद यांनी महापौरपदाच्या निवडणुकीची घोषणा करताच, अवघ्या काही मिनिटांतच उबाठा गटाचे महापालिकेतील गटनेते केशव पोरजे यांच्या सूचनेवरून सीमा पवार यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपच्या हिमगौरी आडके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याने, त्या बिनविरोध निवडून आल्या.

लोकसभेतील विजयाने हुरळून गेलेल्या उबाठा गटाने विधानसभा निवडणुकीत चांगलीच आपटी खाल्ली. तरीही, ‌‘गिरे तो भी टांग उपर‌’ या न्यायाने उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात तथाकथित डरकाळी फोडत, मुंबईसह नाशिक महापालिकेत सत्ता आणण्यासाठी आरोपांची राळ उठवली. जनतेला पूर्ण न होणारी आश्वासनेदेखील देऊन पाहिली. जुने झालेले मुद्दे पुन्हा उकरून त्यांना हवा देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, भारतीय मतदार सुज्ञ असल्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आपला विकास कोण करू शकतो हे त्यांना पक्के ठाऊक असल्यानेच, विरोधात लढूनही बहुसंख्य ठिकाणी महायुतीची सत्ता आली. मात्र, मतदारांनी दिलेला कौल मान्य करून त्याचा आदर राखायचा असतो, त्यातून बोध घ्यायचा असतो आणि पुढील निवडणुकीत झालेल्या चुका टाळून सामोरे जायचे असते. पण, हे ठाकरेंना सांगणार कोण?

- विराम गांगुर्डे