वास्तवाशी जोडलेला गणेश

10 Feb 2026 15:42:34

पद किंवा सत्तेच्या चौकटीबाहेर राहून, सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर भांडुपमधील सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारे कार्य म्हणजे गणेश नारायण वराडे यांची सामाजिक वाटचाल. त्यांच्याविषयी...

गेल्या अनेक वर्षांत मुंबईच्या भांडुप उपनगरातील पाणी, रस्ते, वीज, गटारे, झोपडपट्टी पुनर्वसन किंवा शासकीय कागदपत्रांशी संबंधित असंख्य तक्रारींच्या फेऱ्यांत गणेश वराडे हे एक नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचे म्हणणे आहे की, जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्या पदाची गरज नसून चांगल्या पाठपुराव्याची गरज असते आणि त्यात सातत्य ठेवलं की, प्रश्न नक्कीच सुटतात.

गणेश वराडे यांचे सामाजिक कार्य कुठल्याही एका घटनेतून सुरू झालेलं नाही. ते हळूहळू, रोजच्या अनुभवातून आकार घेत गेलं. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या वडीरामस गावातून लहान वयात मुंबईत आलेल्या गणेश वराडे यांनी स्थलांतर, आर्थिक अडचणी आणि शहरातल्या संघर्षांचा अनुभव लवकर घेतला. वयाच्या पाचव्या-सहाव्या वष गाव मागे पडलं आणि काम, जबाबदाऱ्या व मर्यादा समोर उभ्या राहिल्या. शहरातलं आयुष्य संधी देत असतानाच स्वतःला सिद्ध करण्याची सक्तीही करतं, ही जाणीव त्यांना बालपणातच झाली.

इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर घरची जबाबदारी स्वीकारावी लागली. काम करत असताना वस्त्यांमधील प्रश्न, सामान्य माणसाच्या अडचणी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील त्रुटी अधिक स्पष्टपणे जाणवू लागल्या. अनेक वेळा प्रश्न केवळ अर्ज, सही आणि फाईल यांच्यात अडकून राहतात, हे वास्तव त्यांच्या लक्षात आलं. प्रश्न मोठा नसतो; पण तो हाताळण्याची यंत्रणा सामान्य माणसासाठी अवघड असते, ही जाणीव त्यांच्या सामाजिक कामाची सुरुवात ठरली.

वंजारी समाजात घडलेले गणेश वराडे हे प्रखर हिंदुत्ववादी आणि मराठी भाषा व संस्कृतीचे अभिमानी आहेत. मात्र, त्यांची भूमिका केवळ वैचारिक घोषणांपुरती मर्यादित नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची संकल्पना, राजष शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेचे तत्त्वज्ञान, तसेच स्वगय गोपीनाथ मुंडे यांची संघर्षशील वाटचाल या सगळ्यांनी त्यांच्या कामाला दिशा दिली. संतपरंपरेतील सेवाभाव, संयम आणि माणुसकी हे त्यांच्या कार्याचं अधिष्ठान.

त्यांच्या आयुष्यात मैत्री आणि सहकार्य महत्त्वाचं ठरलं. स्व. स्वप्नील तारगे, स्व. किशोर गावडे आणि सुदर्शन गिरकर यांच्यासोबतचा प्रवास वैयक्तिक मर्यादेत न राहता, सामाजिक पातळीवर विस्तारला. स्व. स्वप्नील तारगे यांनी स्थापन केलेल्या ‌‘स्वराज सेना‌’ या सामाजिक आणि राजकीय चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या चळवळीचा उद्देश सत्ता मिळवणं नव्हता, तर समाजातील प्रश्नांना वाचा फोडणं आणि नागरिकांमध्ये हक्कांची जाणीव निर्माण करणं, हा होता.

आज गणेश वराडे हे ‌‘राजमुद्रा प्रतिष्ठान‌’, ‌‘वराडे फाऊंडेशन‌’, ‌‘जनसेवा प्रतिष्ठान‌’, ‌‘सेवा प्रतिष्ठान‌’ आणि ‌‘स्व. स्वप्नील तारगे प्रतिष्ठान‌’ यांच्या माध्यमातून सामाजिक काम करत आहेत. या संस्थांची कामं घोषणात्मक नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर आधारलेली आहेत. पाणी, रस्ते, गटारे, सुसज्ज प्रवास, वीज, झोपडपट्टी पुनर्वसन, शासकीय दाखले किंवा अन्यायग्रस्त नागरिकांचे प्रश्न या सगळ्यांवर सातत्याने लक्ष ठेवणं आणि प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करणं, ही त्यांच्या कामाची रोजची शिस्त.
त्यांच्या कार्यपद्धतीत कोणताही भेदभाव नाही. तक्रार कुणाची आहे, तो कोणत्या समाजाचा आहे, त्याची भाषा किंवा आर्थिक स्थिती काय, या गोष्टी कधीच आड येत नाहीत. अनेक वेळा ते केवळ तक्रार मांडत नाहीत, तर योग्य प्रक्रिया समजावून सांगतात आणि नागरिकांना सक्षम करतात. शासकीय कार्यालयांत काम करताना त्यांची भूमिका संयत आणि कृतिशील असते. वेळकाढूपणा, दुर्लक्ष आणि अडथळे येतात; तरीही संघर्षाचा सूर न चढवता, मुद्देसूद आणि सातत्यपूर्ण पद्धतीने काम करणं ही त्यांची ओळख. सामाजिक कार्य म्हणजे प्रसिद्धी नव्हे, तर गरजेच्या वेळी सामान्य माणसाच्या बाजूने उभं राहणं हा त्यांचा ठाम विश्वास आहे.

भांडुप परिसरात त्यांच्या सामाजिक चळवळीला सर्व समाजांचा पाठिंबा लाभतो. विविध समाजघटकांतील लोक त्यांच्या कामाशी जोडले गेले आहेत. कारण, त्यांच्या कार्यामागे गरज आणि अन्याय हाच केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच अनेक वस्त्यांमध्ये त्यांचं नाव विश्वासाचं प्रतीक बनलं आहे. वेळ, आर्थिक साधनं आणि वैयक्तिक सोयी अनेकदा दुय्यम ठरतात; तरीही सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी उभं राहणं, हीच त्यांच्या कामाची प्रेरणा आहे.

आजच्या काळात जिथे सामाजिक काम अनेकदा प्रसिद्धी आणि पदांभोवती फिरताना दिसतं, तिथे गणेश नारायण वराडे यांचं कार्य वेगळं ठरतं. ना सत्तेचा गाजावाजा, ना पदाची चमक; पण शासकीय कार्यालयांच्या पायऱ्यांवर आणि वस्त्यांच्या गल्लीबोळांत ही उपस्थिती सातत्याने दिसत राहते. त्यांची ही समाजहितैषी वाटचाल अजून थांबलेली नाही आणि म्हणूनच ती नेहमीच, तितकीच आवश्यक ठरणार आहे. त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!

- सागर देवरे
Powered By Sangraha 9.0