
मुंबई : मुंबईची वेस मानल्या जाणाऱ्या पनवेल येथे एकाचवेळी शेकडो हिंदूंचे धर्मांतर करण्याचा डाव उधळून लावण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील शिरढोण गावात ‘दि पेन्टेकॉस्टल कनव्हेक्शन ग्राऊंड’ येथे हे कारस्थान करण्यात येत होते. यावर स्थानिक ग्रामस्थांनी जोरदार विरोध करत चर्च प्रतिनिधींना भंडावून सोडले. त्यापूर्वी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात निवेदनही दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘दि पेन्टेकॉस्टल मिशन, मुंबई’च्या वतीने शिरढोण येथे ४ दिवसीय ‘वार्षिक स्नेहसंमेलन आणि रोग निवारण सभा’ या नावाने कार्यक्रम चालू होते. ग्रामस्थ प्रवेशद्वारावर विरोध करत असतानाही आत हा कार्यक्रम चालूच होता. तसेच यासाठी केरळ, तामिळनाडू या ख्रिस्ती बहुल भागातून मोठी फौज इथे आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
यावेळी आम्ही कुणालाही निमंत्रण दिले नसल्याचे चर्चच्या प्रतिनिधीने ग्रामस्थांना सांगितल्यावर ग्रामस्थांनी ‘सर्वांना प्रेमपूर्वक आमंत्रण’ असे लिहिलेले चर्च पत्रक दाखवून त्यांचा खोटेपणा उघड केला. तसेच येथे आलेल्या सर्व लोकांचे नाव, संपर्क क्रमांक, ते कुठून आले आणि त्यांचा धर्म याची यादी लिहून देण्याची मागणी केली. त्याचबरोबर ख्रिश्चनेतर लोकांना प्रवेश बंदी असा फलक प्रवेशद्वारावर लावण्याची मागणी केली.
ग्रामपंचायतीची परवानगी घेतलीच नाही
ग्रामस्थांनी चर्चच्या प्रतिनिधीला कार्यक्रमाची सरपंच आणि ग्रामपंचायत यांच्याकडून परवानगी घेतली का, असे विचारताच त्यांनी नाही म्हणून सांगितले. यावर विरोध थांबत नाही हे पाहून चर्चच्या प्रतिनिधींनी येथे धर्मांतर होत नाही, असे पत्र लिहून देण्यास तयार झाले.
पोलिसांना निवेदन; कठोर कारवाईची मागणी
गावातील ग्रामस्थांसोबतच हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने पनवेल येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. कार्यक्रमात रोगनिवारणाच्या नावाखाली होणार्या धर्मांतराच्या शक्यतेविषयी या निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच यामुळे परिसरातील शांतता आणि धार्मिक सलोखा, तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.