अनगांवचे आधारवड : कर्तव्य, संस्कार आणि समर्पणाची मूर्त प्रतिमा

    01-Feb-2026
Total Views |
Suresh Tatya Lele
 
संघनिष्ठ जीवन, निःस्वार्थ समाजसेवा आणि माणसे जोडण्याची विलक्षण क्षमता यांचा सुंदर संगम म्हणजे कै. सुरेश तात्या लेले यांचे व्यक्तिमत्त्व. आपल्या साध्या, शिस्तबद्ध आणि तत्त्वनिष्ठ आचरणातून त्यांनी अनगांव व पंचक्रोशीतील संघकार्याला भक्कम पाया दिला. शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवत संस्कार, सेवा आणि राष्ट्रभाव यांची पेरणी त्यांनी पिढ्यान्पिढ्या टिकेल अशी केली. स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि सामान्य समाजासाठी आधारवड ठरलेले तात्या हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर प्रेरणेचा अखंड प्रवाह होते. त्यांच्या जीवनप्रवासातून संघशरणतेचे, त्यागाचे आणि समाजासाठी जगण्याचे खरे अर्थ उमजतात.
 
कै. सुरेश तात्या लेले (रघुनाथ प्रभाकर लेले) हे नाव अनगांव आणि पंचक्रोशीत विशेष परिचित झाले होते, ते त्यांच्या संघशरण जीवनपद्धतीमुळे. कुटुंबीयांसाठी ते ‘सुरेश तात्या’ म्हणून परिचित होते, तर स्वयंसेवकांसाठी ते ‘तात्या’ होते. त्यांचा जन्म कल्याण येथे झाला. बालपण व प्राथमिक शिक्षणही कल्याण येथेच झाले आणि याचठिकाणी बालवयात ते संघाच्या संपर्कात आले. मूलतः सदाचारी, तत्त्वनिष्ठ, मृदू स्वभावाचे व मितभाषी, त्यामुळे संघकार्यात रुळायला त्यांना वेळ लागला नाही. संघविचारांशी जोडले गेल्यामुळे आधीच गुणवान असलेले व्यक्तिमत्त्व अधिकच चमकून उठले. बालशाखेपासून त्यांचे सहकारी मित्र भास्करराव मराठे, स्व. सदानंद फणसे, स्व. विश्वासराव धारप आणि वसंतराव पुरोहित सर ही प्रातिनिधिक नावे विशेष स्मरणात आहेत. शाळा आणि शाखा या माध्यमातून मैत्री अधिक दृढ होत गेली. अशाप्रकारे तात्यांचे जीवन संस्कारित आणि समजूतदार होत गेले. शहरात त्यांचे मन फारसे रमले नाही, त्यामुळे ते भिवंडी तालुक्यातील मूळ गावी परतले. अनगांव येथे त्यांचे प्रशस्त घर, गावात जमीन-जुमला, गुरेढोरे आणि बागायत असा पसारा होता. वडिलांनी सुरू केलेली भात गिरण होती. या कामातच तात्यांनी अधिक लक्ष घातले. या पसार्‍यामुळे सतत समाजाशी, सभोवतालाच्या गावांमध्ये संपर्क वाढत गेला. संघदृष्ट्या तात्यांनी तृतीय वर्षाचे प्रशिक्षण वर्ग पूर्ण केले असून, ऐन तरुण वयात दोन वर्षे मोखाडा, डहाणू अशा वनवासी भागांत ते संघ-विस्तारक म्हणून राहिले. संघकामाचा विस्तार करताना अनेक अनुभव गाठीस जमा झाले.
 
अनगांव व परिसरात संघविचार असला, तरी रुजला नव्हता. तसे पाहता, या परिसरात काँग्रेसचे व शेतकरी कामगार पक्षाचे अधिक प्राबल्य होते. परंतु, सर्व प्रकारच्या कार्यकर्त्यांना विश्वासार्ह व सोयीस्कर वाटायचे, ते तात्यांचे वडील प्रभाकरपंत लेले (दादा लेले) जे तालुक्यात परिचित व प्रसिद्ध होते त्यांच्या सहवासात. त्यांची माणसे जोडण्याची कला, सुखसंवाद व आदरणीय या कारणामुळेच अनेकांचे येणे-जाणे त्यांच्या घरी असायचे. संघकाम रुजले, वाढत गेले आणि संघ-कार्यकर्त्यांचा राबता सुरू झाला.
तात्यांच्या घरामध्ये त्यांची आई, वडील, दोन मुलगे व तात्यांच्या सुविद्य पत्नी नीता लेले. असे हे कुटुंब म्हणजे स्वयंसेवकाचे, कार्यकर्त्यांचे आधारवड होते. स्व. सुरेश तात्यांना दोन सुपुत्र आहेत. दोन सुना, नातू, नातवंड आहेत. आजही सर्व कुटुंब संघकार्यात आहे. त्यांचे मोठे सुपुत्र विनीत रघुनाथ लेले ‘विद्या प्रसारक मंडळ, अनगांव’चे अध्यक्ष आहेत. कुटुंब-परिवार मोठा असल्याने अनेकांचे येणे-जाणे, मुक्कामी राहणे हे सुरूच असायचे.
 
संघविचार घरात रुजला पाहिजे आणि तो सर्व सभासदांच्या वागण्यातून प्रकट झाला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. संस्काराचे काही आग्रह आपण प्रचलित केले पाहिजेत, असा हट्ट तात्यांचा असे. घरात येणारा कार्यकर्ता, परिचित, घरी आल्यावर तो जेवून-खाऊनच गेला पाहिजे, अतिथींचे स्वागत आनंदाने करावे, असा घरातील शिरस्ता होता. त्यामुळे सदासर्वदा राबते घर, असाच या घराचा परिचय होता. गरजूंना मदत करणे, असाहाय्य माणसाला साहाय्य करणे, दीन-दुखीतांची जाणीव ठेवणे; हे सारे मूकपणे करणे, कर्तव्य म्हणून करणे, असाच तात्यांचा स्वभाव होता. अडचणीच्या काळात अनेकांना मदत करणारे तात्या स्वतःसाठी कधीच कोणापुढेही झुकले नाहीत. स्वतःसाठी करारी बाणा, कठोरता, तत्त्वनिष्ठता; परंतु समोरच्यासाठी मृदू, सहज, मितभाषी. तात्यांचा अनेकांना आधार असायचा. कुटुंबात कठोर असणारे तात्या संघ-स्वयंसेवकांसाठी भावनिक, उदार असायचे. माणसे जोडणे, सांभाळणे व योग्य कार्यासाठी जबाबदारी पेलण्यासाठीच तात्यांचे संस्कार देणे असायचे. स्वयंसेवक, कार्यकर्ते कुटुंबात प्रिय, कर्तव्यदक्ष असला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे.
 
अनगांवमध्ये संघशाखा स्थिर झाली. आदर्श शाखा व उपक्रमशील शाखा म्हणून ओळखली जाऊ लागली. तरुण स्वयंसेवक शाखेवर येऊ लागले, समजूतदार झाले. ‘समाज आणि राष्ट्र सर्वतोपरी’ हा भाव दृढ झाला. तरुणांची संख्या वाढली आणि अशाच तरुणांच्या मदतीने तात्यांनी सभोवताली संघशाखेची पाळेमुळे रुजवली. त्यांना संघकार्यात पाठबळ मिळू लागले. स्वयंसेवकांची घरे जोडली गेली. तात्यांनी त्यांच्या कल्पनेतून गावात बाल वाचनालय सुरू केले. बाल-स्वयंसेवक जोडले गेले आणि ‘बाळगोपाल नाट्य मंडळ’ नामे संस्था सुरू झाली. मुलांनी अनेक उपक्रमांची जोड दिली. माघी गणपती उत्सव सुरू केला. उपक्रमशील गणपती उत्सव मंडळ म्हणून नावारूपास आले. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा घेऊ लागले. मुले जोडली जात होती. रोजच्या दैनंदिन शाखेवरची संख्या वाढत होती, कार्यकर्ते घडत होते, घडवीत होते.
 
तारुण्याला शोभतील, शक्ती-भक्ती दोघांची वाढ होईल, असे उपक्रम घेतले जाऊ लागले. कबड्डी, पोहणे, कुस्ती, धावणे, संभाषण व वक्तृत्व अशा स्पर्धेत तरुण भाग घेऊ लागले. तरुणांची शाखेवरील संख्या वाढत गेली, प्रभावी होत गेली. संघामधील वर्ग, शिबिरे, प्रशिक्षण वर्ग, निवासी वर्ग यशस्वी व प्रभावशाली होऊ लागले. हे होत असताना अनगांवमध्ये संघपरिवाराचे कामदेखील वाढू लागले. ‘अभाविप’, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, किसान संघ यांना गावातून-शाखेतून कार्यकर्ते मिळू लागले. अनगांवमधील बालकाश्रम, वानप्रस्थाश्रम व मोठी गोशाळा या संस्थादेखील अनगांवमध्ये स्थिरावल्या. येथे सर्व ठिकाणी तात्यांचा संपर्क-प्रवास असायचा. त्याचादेखील एक प्रभाव होता. अनगांवमध्ये व परिसरात संघाच्या माध्यमातून येणारे उपक्रम, कार्यक्रम सहज व परिणामी होऊ लागले. रामजन्मभूमी लढा - कारसेवक गेले होते, तेदेखील तात्यांच्या भरोशावर व प्रेरणेने गेले होते. संघामधील प्रचारक यंत्रणा हा सहज; परंतु वेगळी जीवनशैली असलेला विषय. यामध्येदेखील सहभागी तरुणांची संख्या वाढली, वेळ देऊ लागले, तेही तात्यांच्याच प्रेरणेने. ‘राष्ट्र सर्वोपरि’ हा भाव घेऊन काम करणार्‍या सर्वांना संघ-स्वयंसेवक साहाय्य करू लागले. संघपरिवार सभोवताली सुदृढ होत गेला, स्थिरावला आणि त्याचाच परिणाम म्हणून सभोवताली राजकीय स्थिरता येण्यास मदत झाली.
 
तीनही वेळच्या ‘संघबंदी’त शासनाविरुद्ध आवाज उठवण्यात तात्या अग्रेसर असायचे. संघपरिवारातील अनेक आंदोलनांत तात्यांचा प्रत्यक्ष सहभाग असे. १९७५च्या ‘आणीबाणी’ काळात देश अंधकारमय वातावरणात ढकलला जात असताना केवळ संघ-कार्यकर्ता म्हणून तात्यांना काही महिने जेलमध्ये जावे लागले होते. सुरेश तात्या चिरतरुण होते. मनाने कधी म्हातारे झालेच नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या सहवासात आलेल्या कार्यकर्त्यांचाही ते उत्साह वाढवीत असत. त्यांच्या संस्कारातून प्रेरणा घेऊन आज ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे पूर्णकालीन कार्यकर्ते सुहास अंबादास पाठक कार्यरत आहे. विकास विष्णू फडके हे पूर्ण वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. स्व. सुरेश तात्यांना आनंद होईल, असे कार्य सामाजिक क्षेत्रात करणारे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडविले आहेत.
 
दैन्य विघटना दिसे सभोवती
मनात सलते हे शल्य,
ते दूर कराया यत्न करावे
यातच जीवन साफल्य ॥
 
हे गीत सत्यात उतरवून तात्या जगले. अनेकांना हीच प्रेरणा दिली. याच धावपळीत तात्यांचे आरोग्य बिघडू लागले. शरीर साथ देत नाहीसे झाले. एक दिवस दीर्घ आजाराने तात्यांना गाठले. कफ, दमा बळावत गेला. अनेक उपाय झाले; पण अपयश आले. दि. १० ऑगस्ट २०१८ रोजी तात्यांचे निधन झाले. तात्यांच्या प्रेरणेतून आज अनगांवमध्ये ‘प्रेरणा’ प्रकल्प सुरू आहे. रुग्णसेवा, साहित्य केंद्र सुरू आहेत. तात्यांच्या जीवनातून मिळालेले संस्कार घेऊन अनेकांना प्रेरणा देण्याचा संकल्प आहे. कै. रघुनाथ प्रभाकर लेले तथा सुरेश तात्या लेले यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.