श्री मत्स्येंद्रनाथ यांच्या गुरुगादीमुळे, तसेच त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री मलंगगडाच्या पुस्तकाचे लेखक दिनेश श्रीराम देशमुख यांनी अतिशय मेहनतीने लिखाण केले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे सदैव शुभाशीर्वाद पाठीशी उभे असल्याने दिनेश देशमुख हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. दि. 29 जानेवारी रोजी नाथांच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. ही पालखी श्रीमलंगगडाकडे प्रस्थान करत असून, दि. 2 फेब्रुवारी रोजी श्रीमलंगगड यात्रा तसेच रात्री भव्य पालखी सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने ‘श्रीमलंगगड’ या पुस्तकाचा परिचय करून देत आहोत.
संघर्ष, श्रद्धा आणि सत्याचा शोध
महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक इतिहासात काही स्थळे केवळ तीर्थक्षेत्र म्हणून मर्यादित राहत नाहीत, ती स्थळे समाजमनाचा आरसा बनतात. श्रद्धा, परंपरा, इतिहास, राजकारण, धर्म आणि माणुसकी या साऱ्या प्रवाहांचा संगम जिथे होतो, अशी ठिकाणे काळाच्या ओघात वादाचे केंद्र बनतात. ‘श्री मलंगगड’ हे असेच अस्वस्थ करणारे, विचार करायला भाग पाडणारे आणि सत्याच्या शोधाला वाचकाला अंतर्मुख करणारे प्रेरणादायी पुस्तक आहे.
हे पुस्तक म्हणजे केवळ एखाद्या गडाचा इतिहास नाही, केवळ धार्मिक वादाची मांडणी नाही किंवा न्यायालयीन कागदपत्रांची जंत्रीही नाही. हे पुस्तक म्हणजे श्रद्धा आणि वास्तव यांच्यातील संघर्षाचा, परंपरा आणि पुरावे यांच्यातील ताणाचा, तसेच सत्य आणि अपप्रचार यांच्यातील लढ्याचा सखोल दस्तऐवज आहे.
इतिहासाची पायाभरणी आणि नाथपरंपरेचा संदर्भ
पुस्तकाचा आरंभ नाथ संप्रदायाच्या व्यापक संदर्भातून होतो. श्री मच्छिंद्रनाथ, श्री गोरखनाथ, श्री कानिफनाथ यांसारख्या नाथयोगींची परंपरा, त्यांचे महाराष्ट्रातील कार्य, समाधीस्थळे आणि लोकमानसावर झालेला प्रभाव लेखकाने अभ्यासपूर्ण रीतीने मांडला आहे. नाथपरंपरा ही केवळ धार्मिक नसून ती सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ होती, हे या पुस्तकातून ठळकपणे अधोरेखित होते.
‘श्री मलंगगड’ हा नाथपरंपरेशी कसा जोडलेला आहे, तेथील पूजा पद्धती, उत्सव, पालखी, अभिषेक, आरती यांचा इतिहास काय आहे, याचा तपशील लेखक पुराव्यासहित देतो. केवळ ऐकीव कथनांवर न थांबता, जुन्या ग्रंथ-संदर्भाचा, लोकपरंपरेचा आणि लेखी पुराव्यांचा आधार घेतला आहे, हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
श्रद्धा, पूजा आणि परंपरांचा सूक्ष्म अभ्यास
पुस्तकातील एक मोठा भाग श्री मलंगगडावरील पूजा पद्धती, सण-उत्सव, वार्षिक कार्यक्रम, नाथपंथीय साधकाची उपस्थिती आणि लोकांची श्रद्धा यावर केंद्रित आहे. येथे लेखक कुठेही श्रद्धेला तडा जाईल, असे करीत नाही. पण, श्रद्धा आंधळी न होता विवेकी असावी, असा स्पष्ट संदेश देतो. हिंदू परंपरेतील अभिषेक, चंदन, धूप, दीप, नैवेद्य, पालखी, फुलांची चादर, समाधीपूजन हे सर्व तपशीलवार नोंदवले आहे. त्याचबरोबर काही परंपरा कालांतराने कशा बदलल्या, कशा विकृत झाल्या किंवा कशा लादल्या गेल्या, याचे विलेषणही केले आहे. त्यामुळे वाचकाला श्रद्धा आणि तिचा वापर-गैरवापर यातील फरक समजतो.
न्यायालयीन लढा : श्रद्धेचा कायदेशीर परीक्षा प्रवास
या पुस्तकाचा अत्यंत महत्त्वाचा आणि धक्कादायक भाग म्हणजे, न्यायालयीन संघर्षाचे तपशीलवार विवेचन. धर्मदाय आयुक्त कार्यालय, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय येथे दाखल केलेले अर्ज, प्रतिज्ञापत्रे, आदेश, तारखा, साक्षी पुराव्यांची कमतरता किंवा फेरफार हे सर्व लेखकाने संयम आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडले आहे. हा भाग वाचताना लक्षात येते की, धार्मिक स्थळांचा प्रश्न केवळ श्रद्धेचा नसतो; तो कायदा, प्रशासन, राजकीय हस्तक्षेप आणि समाजशक्तींच्या दबावाशी निगडित असतो. काही ठिकाणी सत्य असूनही पुरावे दडपले जातात, तर काही ठिकाणी पुरावे नसतानाही दावे रेटले जातात. ही अस्वस्थ करणारी वास्तवता पुस्तक ठळकपणे उघड करते.
हिंदू-मुस्लीम सहअस्तित्व : संघर्ष नव्हे, समन्वय
या पुस्तकाची मोठी ताकद म्हणजे द्वेष निर्माण करत नाही, तर समज वाढवण्याचा प्रयत्न करते. लेखक स्पष्टपणे सांगतो की, नाथ संप्रदाय, सुफी परंपरा, वारकरी संप्रदाय हे परस्परविरोधी नसून इतिहासात अनेक ठिकाणी एकमेकांशी संवाद साधणारे प्रवाह होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मशीद, दर्गाह, समाधी, मठ व देवालय शेजारीशेजारी नांदत आली आहेत. मलंगगड प्रश्न हिंदू विरुद्ध मुस्लीम असा नसून सत्य विरुद्ध असत्य, परंपरा विरुद्ध राजकीय हस्तक्षेप असा अधिक आहे, हे पुस्तक ठामपणे मांडते.
काव्य, अभंग आणि भावनिक समारोप
पुस्तकाचा उत्तरार्ध अत्यंत भावस्पश आहे. उपसंहारामध्ये लेखकाचा वैचारिक आणि भावनिक प्रवास वाचकासमोर उलगडतो. त्यानंतर येणाऱ्या काव्यरचना, अभंग, आरती, हिंदी-मराठी कविता या भक्तीपर नसून विचारप्रधान आहेत. पुस्तक वाचताना वाचकाच्या मनात प्रश्न उरतो की, आपण श्रद्धा जपतो आहोत की, सत्य दडपत आहोत.
लेखनशैली आणि पुस्तकाचे महत्त्व
लेखकाची भाषा सोपी, सरळ; पण आशयघन आहे. कुठेही अनावश्यक अलंकारिक भाषा नाही. पण, विषयांचे गांभीर्य टिकून राहते. संदर्भ, तारखा, नावे देताना लेखकाची अभ्यासूवृत्ती दिसते. हे पुस्तक विचारप्रवर्तन करणारे आहे. आजच्या काळात जेव्हा धार्मिक प्रश्न राजकीय अजेंड्यासाठी वापरले जात आहेत, तेव्हा ‘श्री मलंगगड’सारखे पुस्तक वाचणे आवश्यक ठरते. हे पुस्तक कोणत्याही एका समाजासाठी नाही, ते सत्य शोधणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी आहे.
‘श्री मलंगगड’ हे पुस्तक म्हणजे केवळ इतिहासाचे पान नाही, ते वर्तमानाला प्रश्न विचारणारे आणि भविष्यासाठी सावध करणारे लिखाण आहे. श्रद्धा, परंपरा, कायदा आणि माणुसकीचा समतोल शोधण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर वाचक केवळ माहिती घेऊन थांबत नाही, तर विचार करायला लागतो. साहित्याचे खरे यश याहून वेगळे काय असू शकते?
पुस्तकाचे लेखक : दिनेश श्रीराम देशमुख
प्रकाशक : विजय साळवी, कल्याण शहरप्रमुख, शिवसेना कल्याण शहर शाखा कार्यालय,
शिवाजी चौक, कल्याण
मुद्रण स्थळ : रामदास ग्राफिक्स, कल्याण
मुखपृष्ठ : राम जोशी
आवृत्ती : प्रथमावृत्ती (1 फेब्रुवारी 2014)
मूल्य : श्री मलंगबाबावरील श्रद्धा
- अजयकुमार जोगी
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आणि महात्मा गांधी विद्यामंदिर, प्राथमिक विभाग, डोंबिवलीचे मुख्याध्यापक आहेत.)