संत शिरोमणी रोहिदास महाराज की जय!

01 Feb 2026 12:39:39
Sant Rohidas Maharaj
 
समरस-समतामय समाजासाठी, भारत एक राष्ट्र म्हणून त्यांच्या एकतेसाठी आयुष्यभर तत्पर असणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज. संत रोहिदास महाराजांचे विचारकार्य दोह्यांच्या स्वरूपात आजही दिशादर्शक आहेत. आज दि. १ फेब्रुवारी रोजी त्यांची ६५०वी जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रेरणादायी आणि धर्म-कर्म रक्षणार्‍या विचारांचा या लेखात घेतलेला संक्षिप्त आढावा...

वेद धर्म सबसे बड़ा,
अनुपम सच्चा ज्ञान
फिर क्यों छोड़,
इसे पढ लूं झूठ कुरआन
वेद धर्म छोडूं नहीं,
कोसिस करो हजार
तिल-तिल काटो चाहि,
गला काटो कटार
 
‘मुस्लीम हो, नाहीतर मरायला तयार राहा’ असे सिकंदर लोधीने म्हटले, तेव्हा संत रोहिदासांचे हे म्हणणे होते. तो काळ होता १४व्या शतकातला. हिंदूंचे धर्मांतरण करणे हा एककलमी कार्यक्रम या मुस्लीम धर्मांध आक्रमणकर्त्यांचा होता. त्यामुळे हिंदूंचे जगणे नरकयातनांनी होरपळलेले होते. तसेही जगाच्या पाठीवर इस्लामचे जिथे कुठे आक्रमण झाले, तिथे स्थानिक धर्माचा विलय झाला. पण, शेकडो वर्षे मुस्लिमांची अत्यंत हिंसक-धर्मांध सत्ता असतानाही देशात हिंदू धर्म टिकण्यामागे क्षात्रतेजाने धर्म जगणार्‍या संत रोहिदासांचे विचारकार्य अग्रणीच म्हटले पाहिजे. त्यांनी मुस्लिमांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला. ते म्हणतात-
 
देता रहै हज्जार बरस,
मुल्ला चाहे अजान|
रैदास खोजा नहं मिल सकइ,
जौ लौ मन शैतान॥
 
म्हणजे अरे मुल्ला, हजार वर्ष बांग दे; पण मनातच शैतान असेल, तर जे शोधतोस ते मिळणार नाही. ते एका दोह्यात ईद वगैरेला पशूंची कुर्बानी दिली जाते, त्यावर म्हणतात की, ”जीवाची हत्या करून खुदा कसा मिळणार, हे पीर-पैगंबर औलिया कुणी सांगेल का?” तर अशा इस्लामिक राजवटीतही समाजाला जोडण्यासाठी आदर्श हवेत. प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श समाजाला जोडणारा आहे, हे त्यांनी जाणले. प्रभू श्रीराम हे केवळ राजा दशरथाचे पुत्र नाहीत, तर ते धनिक-वाणिकांसह कष्टकरी, शोषित, वंचितांचा, सगळ्या विश्वात सामावलेला राम आहे, हे त्यांनी दोह्यातून स्पष्ट केले.
 
रैदास हमारौ राम जी
दशरथ करि सुत नाहिं|
राम हमउ मांहि रहयो
बिसब कुटंबह माहिं॥
 
तसेच कर्तव्यासोबतच कर्तव्य करणार्‍याबद्दलही संत रोहिदासांनी समाजाला जागृत केले, ते म्हणतात,
 
रैदास स्रम करि खाइहिं,
जौं लौं पार बसाय|
नेक कमाई जउ करइ,
कबहुं न निहफल जाय॥
 
म्हणजेच, सामर्थ्य आहे तोपर्यंत माणसाने इमानदारीने अर्जित करावे. जो मनुष्य इमानदारीने अर्थार्जन करतो, तो कधीच निष्फळ नसतो. तसेच त्यांनी म्हटले, कर्म करणे हा आपला धर्म आहे, तर फळ मिळणे हे सौभाग्य. सौभाग्य आणि कर्माचा संबंध दर्शवत त्यांनी समाजाला कर्तव्यपूर्ततेची प्रेरणा दिली. त्यामुळेच की काय, कितीही आक्रांता आले आणि गेले, समाज आपले कौटुंबिक, सामाजिक कर्तव्य निभावत राहिला. त्यातून आपली संस्कृती, समाज धर्म टिकवत राहिला.
 
कर्म-सिद्धांतासोबतच त्यांनी समतेचा, बंधुतेचा पुरस्कार केला. या समतेबद्दल अनेकजण छातीठोकपणे म्हणतात की, १८व्या शतकामध्ये ‘फ्रेंच राज्यक्रांती’मुळे समता-मूल्याचा विकास झाला. पण, त्याही आधी १३व्या शतकामध्ये संत रोहिदास महाराजांनी समतेसह समरसतेचा पाया घातला. सर्व जीवांमध्ये एकच ईश्वर आहे, ही भारताची आध्यात्मिक भूमिका होती. मात्र, तरीही आपसात जातीचे भेद भयंकर होते. त्यावेळी संत रोहिदासांनी सत्य मांडले, "जातपात काय विचारता? इथे कुणीच कुजात नाही. सगळे प्रभूची लेकरे आहेत आणि समान आहेत.” त्यांनी समाजाला सांगितले,
 
रैदास इक ही बूंद सो,
सब ही भयो वित्थार|
मुरखि हैं तो करत हैं,
बरन अवरन विचार॥
 
म्हणजे, ही सृष्टी एका बिंदूचा विस्तार आहे.एका ईश्वरापासून सगळ्या प्राण्यांचा विकास झाला. तरीही, जे लोक जात-कुजात विचार करतात, जातिगत भेदभाव करतात, ते नितांत मूर्ख आहेत. आपसात भेदभाव करत राहिलो, समाजात दुही माजली, तर देश नष्ट होईल. त्यांनी समाजाला समजावले-
 
हिल मिल चलो जगत मे,
फु ट पडो दो नही
फु ट पडी माची तो, देश नष्ट हो जाई
 
आजही काही नतद्रष्ट म्हणतात की, स्वातंत्र्यापूर्वी भारत एक राष्ट्र नव्हते, तर विखुरलेली राज्ये होती. त्यामुळे संत रोहिदासांचे हे विचार महत्त्वाचे आहेत. त्यांचे ४० दोहे शिखांच्या ‘गुरुबानी’मध्येही आहेत. हिंदू आणि शीख वेगळे नाहीत, याची सिद्धता करणारे संत रोहिदास. अखंड भारतासाठी आणि समरस-समान समाजासाठी धर्म-कर्माची ज्योत तेवत ठेवणार्‍या संत रोहिदास महाराजांच्या विचारकार्याला नमन. संत शिरोमणी रोहिदास महाराज की जय!
संतश्रेष्ठ रोहिदास महाराजांविषयी...
 
संत शिरोमणी रोहिदास महाराजांचा जन्म माघ महिन्यातील पौर्णिमेला झाला. त्यांचा जन्म साधारणपणे १३व्या शतकाच्या उत्तरार्धात काशी (वाराणसी) जवळच्या मांडूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव माता काळसी (घुरबिनिया) आणि वडिलांचे नाव रघुराम (संतोख दास/संतोरवदास) होते. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय चामड्यापासून पादत्राणे बनवण्याचा होता. त्यांचे गुरू स्वामी रामानंद होते. संत कबीर हे त्यांचे गुरुबंधू, तर संत मीराबाई ही त्यांची प्रमुख शिष्या होती. धर्म-कर्म, देश, समाज यांसाठीचे त्यांचे विचार आजही समाज आणि देशासाठी दिशादर्शक आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0