बिनविरोध निवड ‘राजे शिवबां’ची!

    01-Feb-2026
Total Views |
Rajé Shivba
 
निवडणुकांची धामधूम आपल्या देशात कायम सुरू असते. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात कोण नेता निवडून येणार, याबद्दलची उत्सुकता जनमानसात सतत टिकून असते. मात्र, क्वचितच असं घडतं, जेव्हा एखादा नेता बिनविरोध निवडून येतो - सर्वमान्य, सर्वस्वी स्वीकारलेला. सध्या ‘राजे शिवबा’ या बालमहानाट्याची तयारी जोमानं सुरू असताना नेतृत्व कसं असावं, प्रजा कशी असावी, मावळे आणि सरदार कसे होते, या सगळ्या विचारांचा कल्लोळ माझ्या मनात एक दिग्दर्शिका म्हणून सातत्याने सुरू आहे. मात्र, एक लेखिका म्हणून ‘राजे शिवबा’ लिहायला घेतलं, त्या क्षणापासूनच लेखणीच्या पहिल्या अक्षरात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता.
 
आपले महाराज म्हणजे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नाही; ते आपलं आराध्यदैवत, महापुरुष आणि जाणता राजा आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेसाठी कोणाची निवड करायची, हा प्रश्न स्वाभाविकपणे त्या क्षणीच उभा राहिला. माझ्या दृष्टीने महाराज हे आपल्यातले, आपल्या अनुभवातील, आपल्या जगण्यातले असायला हवेत. ऑडिशन घेऊन, परीक्षा घेऊन महाराजांची निवड करायची नव्हती. माझ्यासमोर अनेक विद्यार्थी होते, जे ही भूमिका साकारू शकत होते; पण मला हवा होता तो असा विद्यार्थी- जो माझ्या कल्पनेत फिट बसेल आणि जो बिनविरोध सर्वांना मान्य होईल.
 
माझ्या मनात पहिल्याच क्षणी दोन नावं उमटली- आरव गायकर आणि तनुष पुराणिक. या दोन्ही मुलांनी यापूर्वी माझ्याबरोबर नाटकात काम केलं आहे. त्यांचा रंगभूमीवरील प्रवास, त्यांची शिस्त, समज आणि प्रगल्भता मला परिचित होती. म्हणूनच, या दोघांचा प्रवास आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. महाराजांचा जिरेटोप डोक्यावर चढवला किंवा तलवार हाती घेतली म्हणून कोणी महाराज होत नाही. महाराज होण्यासाठी त्यांच्या विचारांचा, त्यांच्या वीररसाचा, त्यांच्या मूल्यांचा अंगीकार करावा लागतो. एक कलाकार म्हणून ही दोन्ही मुलं त्या दिशेनं नक्कीच आपली पावलं उचलत आहेत. भविष्यात ही मुलं व्यक्ती म्हणून कशी घडत जातात, याकडे माझी दृष्टी कायम राहील. कारण, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका हा केवळ अभिनय नाही, तर व्यक्तिमत्त्व घडवणारा, विकास घडवून आणणारा एक जादुई प्रवास आहे.
 
माझ्या या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. ते अजून लहान आहेत, त्यांना आयुष्यात अनेक अनुभव घ्यायचे आहेत. त्यांचा जीवनप्रवास नुकताच सुरू झाला आहे. चला तर मग, या दोन लहानशा कलाकारांविषयी, भावी शिवरायांविषयी थोडंसं अधिक जाणून घेऊया.
 
तनुष : एक ऊर्जावान कलाकार आणि भावी नेता
 
तनुष हा जन्मजात कलाकार. त्याची ऊर्जा, आत्मविश्वास आणि ठामपणा रंगमंच उजळून टाकतात. मेगा नाटके, मोनो-अ‍ॅट, इम्प्रोव्हायझेशन स्किट्स, एकांकिका, तसेच सूत्रसंचालन आणि पडद्यामागील व्यवस्थापन अशा विविध प्रकारांतून त्याने केलेला प्रवास त्याची बहुआयामी क्षमता आणि सादरीकरण कलेविषयीची खोल आवड दर्शवते.
 
तनुष एकल कलाकार म्हणूनही तितकाच सहज आहे, जितका तो समूहात काम करताना असतो. परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याची, प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आणि अर्थपूर्ण योगदान देण्याची त्याची क्षमता त्याला एक उत्तम टीम प्लेअर, तसेच स्वतंत्र कलाकार बनवते. तो उत्साह, शिस्त आणि विश्वासार्हता घेऊन काम करतो. त्यामुळे संपूर्ण टीमला आणि मार्गदर्शकांनाही त्याच्याकडून सातत्यपूर्ण उत्कृष्टतेची अपेक्षा ठेवता येते. नाटकाच्या माध्यमातून तनुषच्या भाषिक आणि संवाद कौशल्यांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. तो आता एक आत्मविश्वासपूर्ण वक्ता आणि प्रभावी अभिनेता झाला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्याने नाटकाकडे केवळ सादरीकरण म्हणून नव्हे, तर आत्मशोध, आंतर-वैयक्तिक विकास आणि नेतृत्वासाठीचं साधन म्हणून पाहायला सुरुवात केली आहे.
 
त्याच्या या प्रवासाचा प्रभाव इतरांवरही पडला आहे. त्याची धाकटी बहीण आणि मित्रांनी त्याच्यातला बदल आणि समर्पण पाहून नाट्यवर्गात प्रवेश घेतला. तनुष इतरांसाठी एक आदर्श ठरला आहे. नाटक म्हणजे केवळ अभिनय नसून जीवन-कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास आणि भावनिक बुद्धिमत्ता घडवण्याचं प्रभावी माध्यम आहे, हे तो आपल्या कृतीतून दाखवतो. गुण मिळवणं असो, सन्मान प्राप्त करणं असो किंवा रंगभूमीच्या परिवर्तनकारी शक्तीचा संदेश पोहोचवणं असो, तनुष नेहमीच अपेक्षेपेक्षा अधिक कामगिरी करतो. त्याची उपस्थिती प्रत्येक सादरीकरणाची पातळी उंचावते आणि त्याचा प्रवास आपल्याला आठवण करून देतो की, नाटक हे जीवनाला आकार देणारा अनुभव आहे. निःसंशयपणे तनुष हा लक्ष ठेवण्यासारखा कलाकार आणि घडत असलेला नेता आहे.
 
आरव - जो मुलगा लक्ष्मण झाला.
 
आरवने ‘सियावर रामचंद्र की जय’ या भव्य नाटकात सहभागी होताना वानराची भूमिका साकारण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र, मला त्याच्यात काहीतरी वेगळं, अधिक तीव्र आणि प्रभावी दिसलं. इतरांना जिथे त्याचा खोडकरपणा, आकर्षण आणि अमर्याद ऊर्जा दिसत होती, तिथे मला लक्ष्मण दिसत होता. आरव हा दुर्मीळ संगम आहे- प्रामाणिक; पण थोडासा रंगतदार, आज्ञाधारक; पण तक्रारी करणारा, खोडकर; पण अतिशय गोड. तत्काळ दाद मिळावी ही त्याची गरज होती; पण त्याचबरोबर सूचना मनापासून पाळणारं त्याचं हृदयही होतं. हाच द्वैतभाव लक्ष्मणासारख्या गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखेसाठी त्याला योग्य ठरवत होता-
निष्ठा, समर्पण आणि तीव्रतेचं प्रतीक.
 
राम, लक्ष्मण आणि सीता यांसारख्या भव्य व्यक्तिरेखांसाठी केवळ अभिनय पुरेसा नसतो; त्यासाठी अंतर्गत परिवर्तन, परिपक्वता आणि बांधिलकी आवश्यक असते. आरवने हे आव्हान स्वीकारलं आणि इतया लहान वयातही लक्ष्मणाची भूमिका अतुलनीय रीतीने साकारली. मात्र, हा प्रवास पूर्णपणे सोपा नव्हता. ‘सियावर रामचंद्र की जय’च्या पाचव्या प्रयोगापर्यंत आमच्याकडे दोन लक्ष्मण होते- एक दुसर्‍या शाळेतून आणि आरव. आमच्या फेरपालटीनुसार त्यावेळी दुसर्‍या कलाकाराची पाळी होती. आरवला हे फारच लागलं; तो दुखावला गेला, स्वतःला बाजूला काढल्यासारखं वाटलं. त्याने इतर कोणतीही भूमिका करायला नकार दिला आणि आपली निराशा स्पष्टपणे व्यक्त केली. सामान्यतः मी अशा निर्णयांचा आदर करते आणि विद्यार्थी व पालकांना निर्णय घेऊ देते. पण, त्यावेळी मला वाटलं की, हस्तक्षेप करणं आवश्यक आहे. मी त्याच्या आईला फोन केला आणि थेट आरवशी बोलण्याची विनंती केली. शांत आणि प्रामाणिक संवादात विचारलं, "तू का नाटकात काम करणार नाहीस?” तो साधेपणाने म्हणाला, "मला लक्ष्मणच करायचा आहे.”
 
तो क्षण नम्रता, कृतज्ञता आणि समजुतीचा धडा ठरला. मी त्याला हळुवारपणे समजावलं की, तो आधीच ही भूमिका साकारू शकला, हे त्याचं मोठं भाग्य आहे आणि कित्येक विद्यार्थी अशी संधी मिळण्याचं स्वप्न पाहतात. सगळेच राम किंवा लक्ष्मण होऊ शकत नाहीत. यावेळी दुसर्‍याला करू दे, तुला पुन्हा संधी मिळेल. आरव थांबला, विचार केला आणि मग म्हणाला, "सॉरी, रॅडी. मी उद्यापासून येईन.”
 
यानंतर जे घडलं, ते खरोखरच प्रेरणादायी होतं. त्याने इंद्रजीत, दरबारी, महामंत्री अशा छोट्या भूमिका स्वीकारल्या- अनिच्छेने नव्हे, तर अभिमानाने आणि सन्मानाने. त्या भूमिका आपल्या क्षमतेखाली आहेत असं त्याने कधीही वागण्यात दाखवलं नाही. नंतर तो मला म्हणाला, "मला अजूनही लक्ष्मण सर्वात जास्त आवडतो; पण मला अजिबात पश्चात्ताप नाही. मी शिकण्याची आणि वेगळ्या पद्धतीने वाढण्याची मोठी संधी गमावली असती.”
 
ही भूमिका करत असताना, नाटक सादर करताना ते नेमकं काय शिकले? कोणते विचार, कोणते अनुभव, कोणती शिदोरी त्यांनी मनात गाठीशी बांधली आहे? महाराजांच्या भूमिकेने त्यांच्यातील कलाकारच नाही, तर माणूस म्हणून घडणारा प्रवास कसा सुरू झाला आहे याविषयी पुढील लेखात, प्रयोग प्रेक्षकांसमोर सादर झाल्यानंतर नक्कीच सविस्तर लिहीन.  शुभारंभाचा प्रयोग, रविवार, दि. ८ फेब्रुवारी संध्याकाळी ७ वाजता, नटसम्राट निळू फुले नाट्य मंदिर, पुणे येथे. आवर्जून शिवभक्तांनी आणि रंगभूमीप्रेमींनी या नाटकाला उपस्थित राहावं. कारण, हा प्रयोग केवळ नाटक नाही, तर पुढच्या पिढीच्या मनात रुजणारा शिवविचार आहे.
 
 
-रानी राधिका देशपांडे