REVIEW : ‘मर्दानी ३’ची ‘राणी'

01 Feb 2026 14:45:52
Mardaani 3
 
२०१४ साली प्रदर्शित झालेल्या अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर २०१९ला ‘मर्दानी २’ आला, तर आता २०२६ला ‘मर्दानी ३’ सुद्धा चित्रपटगृहात दाखल झाला आहे. मानवी तस्करीवर आधारित थरारक आणि विचारप्रवर्तक कथा घेऊन ‘मर्दानी’ने नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत राणी मुखर्जीने प्रत्येक वेळी ताकदीची, ठाम आणि प्रभावी कामगिरी केली आहे. ‘मर्दानी ३’चा ट्रेलर पाहिल्यानंतर राणी आणि हा तिसरा चित्रपट यावेळी आणखी गंभीर आणि सशक्त कथा घेऊन येणार, हे स्पष्ट झाले होते. ३० जानेवारीला ‘यशराज फिल्म्स’चा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तेव्हा हा चित्रपट कसा आहे, ते पाहूया.
या चित्रपटाची कथा बुलंदशहरात एका ‘व्हीव्हीआयपी’ व्यक्तीच्या लहान मुलीच्या अपहरणाने सुरू होते. तिच्यासोबतच त्या ‘व्हीव्हीआयपी’च्या केअरटेकरच्या मुलीचेही अपहरण केले जाते. या दोन्ही मुलींना सुरक्षितपणे शोधून काढण्याची जबाबदारी एसएसपी शिवानी शिवाजी रॉय (राणी मुखर्जी) वर सोपवली जाते. त्यामुळे यावेळी शिवानी रॉयसमोर गरीब नाही, तर एका श्रीमंत बापाच्या मुलीच्या अपहरणाचाही छडा लावण्याचे गंभीर आव्हान आहे. तपास पुढे सरकतो तसं उघड होतं की, हे अपहरणकर्ते एका मानवी तस्करीशी संबंधित आहेत. हे संपूर्ण जाळं ‘अम्मा’ (मल्लिका प्रसाद) चालवते. ‘भिकारी माफिया’शी जोडलेलं हे तस्करीचे जाळे समाजाच्या काळ्या बाजूचं भयावह चित्र मांडतं. ‘मर्दानी’ची परंपरा पुढे नेत, यावेळची कथा अम्मा अशा खलनायिकेच्या रूपात सादर करते की, तिची एंट्री होताच अंगावर काटा उभा राहतो. अम्मा क्रूर, निर्दयी, घृणास्पद आणि पूर्णपणे विकृत. अलीकडच्या काळात मोठ्या पडद्यावर दिसलेल्या सर्वात भीषण खलनायिकांपैकी ती एक म्हणता येईल. पण, फक्त ‘भिकारी माफिया’च नाही, तर या कथेत आणखी एक थरारक घटना आहे; ज्याचा उलगडा या संपूर्ण कथेत होतो. त्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.
 
अम्माची दहशत इतकी आहे की, तिचे बरेच लागेबांधे आहेत. मोठे लोक या प्रकरणात गुंतलेले आहेत. सरकारी यंत्रणाही पूर्ण ताकदीनिशी काम करत आहे; पण प्रश्न असा उरतो की, श्रीमंत घरातल्या मुलीला शोधण्यासाठी जी मेहनत घेतली आहे, तीच संवेदनशीलता आणि संसाधनं सामान्य घरातल्या मुलीसाठीही खर्च केली जातील का? चित्रपटाचा पूर्वार्ध अत्यंत प्रभावी आहे. राणी मुखर्जी पूर्णपणे आपल्या पात्रात उतरलेली दिसते. कथा गंभीर आहे आणि तिचा तपास जसजसा पुढे जातो, तसतसं प्रेक्षक त्यात पूर्णपणे गुंतून जातात. आता उत्सुकता एवढीच उरते की, ‘मर्दानी ३’चा उत्तरार्ध काय नवीन, थरारक आणि धक्कादायक घटना उलगडून दाखवतो.
 
‘मर्दानी ३’चे दिग्दर्शन अभिराज मिनावाला यांनी केले आहे आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात त्यांना बर्‍यापैकी यश आलेलं आहे. अ‍ॅक्शन सीन्स आणि कथेची गुंफण चित्रपट पाहताना उत्सुकता नक्कीच निर्माण करतात. आयुष गुप्ता, दीपक किंगरानी आणि बलजीत सिंह मारवाह यांनी लिहिलेल्या या कथेचं विश्व काही अंशी ओळखीचं वाटतं. मुलींची तस्करी, लहान मुलांकडून भीक मागवून घेणं किंवा मानवी अवयवांची तस्करी यांसारख्या गंभीर सामाजिक समस्यांचे वास्तव याआधीही अनेक चित्रपटांमधून आणि वेब-सीरिजमधून समोर आले आहे. मात्र, तरीही ही कथा हळूहळू एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचते. आयुष गुप्तांची घट्ट बांधलेली पटकथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्यांचे संवादही तितकेच प्रभावी आहेत.
 
चित्रपटात सातत्याने ‘ट्विस्ट’ आणि ‘टर्न्स’ येत राहतात. मात्र, तुम्ही ‘इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर’चे चाहते असाल, तर काही कथानकातील वळणांचा अंदाज आधीच बांधता येऊ शकतो. अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर संपूर्ण चित्रपटाचा भार राणी मुखर्जीच्या खांद्यावर आहे आणि तिने तो अत्यंत समर्थपणे पेलला आहे. राणीच्या दमदार उपस्थितीमुळे चित्रपटाची पकड कायम राहते. पण, यावेळी राणीसमोर ‘व्हिलन’सुद्धा तितकीच दमदार आहे. अम्मा हे पात्र साकारणार्‍या अभिनेत्री मल्लिका प्रसाद यांचा अभिनय खरोखरच फार ताकदीचा पाहायला मिळतो. त्यांच्या चेहर्‍यावरचे हावभाव आणि संवादफेक नक्कीच लक्षात राहणारे ठरतात. इतर कलाकारांनीही बर्‍यापैकी चांगलं काम केलं आहे. चित्रपट मनोरंजक नक्कीच आहे. मात्र, काही ठिकाणी बरीच ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ घेतल्याचे पाहायला मिळते. कोणतेही ‘बोल्ड सीन्स’ नसल्याने सहकुटुंब अगदी लहान मुलांसह हा चित्रपट चित्रपटगृहात तुम्ही नक्की पाहू शकता.
 
दिग्दर्शक : अभिराज मिनावाला
 
कलाकार : राणी मुखर्जी, मल्लिका प्रसाद, जानकी बोडीवाला, प्रजेश कश्यप
 
निर्मिती : यशराज फिल्म्स
 
रेटिंग : ३ स्टार
 
 
- अपर्णा कड  
 
 
 
Powered By Sangraha 9.0