डॉ. संघ प्रचारक ते ‘पद्मश्री’ पुरस्कारार्थी हा ज्येष्ठ कृषी संशोधक डॉ. श्रीरंग लाड यांचा जीवनप्रवास सर्वार्थाने थक्क करणारा आहे. दादांनी विकसित केलेल्या कृषी तंत्रज्ञानामुळे कापसाच्या उत्पादनात एकरी प्रचंड वाढ झाली असून, शेतकर्यांचे उत्पन्नही वधारले. केवळ शेतीच नव्हे, तर त्यांनी ‘लाल कंधारी’ या देशी गाईंच्या संवर्धनासाठीही मोठे काम केले. ‘भारतीय किसान संघा’चे क्षेत्रीय प्रचारक, ‘अखिल भारतीय किसान संघा’चे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य असलेले दादा म्हणजे एक आणि एक चालते-बोलते विद्यापीठच!नुकत्याच जाहीर झालेल्या ‘पद्मश्री’ पुरस्कारानिमित्ताने त्यांचा कार्यपरिचय करुन देणारा हा लेख...
दादांचे संपूर्ण नाव डॉ. श्रीरंग देवबा लाड. त्यांचा जन्म १९४८ साली माळसोभा, ता. जि. परभणी येथील एका सामान्य कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण गावी आणि नंतर पदवीपर्यंतचे शिक्षण परभणी येथे झाले. शिक्षण झाल्याबरोबर १९७०ला दादा संघाचे प्रचारक म्हणून निघाले. या काळातच दादांनी हजारो कुटुंबे मातेच्या मायेने जोडली. या काळात दादांनी परभणी, तसेच आताच्या संभाजीनगर जिल्ह्यात संघ प्रचारक म्हणून काम केले. पुढे १९८३ साली दादांकडे ‘भारतीय किसान संघा’चे मराठवाडा संघटनमंत्री म्हणून दायित्व आले. पुढे दोन वर्षांनी मी दादांचे एका संघशाखेवर बौद्धिक ऐकले आणि दादांच्या बौद्धिकाने प्रभावित होऊन मीही ‘किसान संघा’चे काम करण्याचे ठरवले आणि दादांबरोबर ‘भारतीय किसान संघा’च्या कामाला सुरुवात केली.दादांबरोबर काम करीत असताना असे लक्षात आले की, दादा ज्या कुटुंबात जातात, त्या कुटुंबाला दादा आपलेसे वाटतात. याचे कारण म्हणजे, दादांनी त्या कुटुंबावर केलेले अपार प्रेम. दादा प्रचारक तर आहेतच; परंतु घरे जोडणारे चालते-बोलते यंत्रदेखील आहे. दादांच्या मायाळू स्वभावामुळे दादांची एकदा भेट झाली की, दादा त्या व्यक्तीला कधीही विसरत नाहीत आणि ती व्यक्तीसुद्धा दादांना कधी विसरत नाही. दोघांमध्ये एक अतूट नाते आपसुकच जोडले जाते.
दादांचा व माझा संबंध येऊन ४०-४१ वर्षे झाली. परंतु, दादांच्या स्वभावात काहीच बदल नाही, उलट त्यांच्या कामाची गती वाढली. दादा संघ प्रचारक म्हणून निघाले आणि आज दादा ‘भारतीय किसान संघा’चे क्षेत्रीय प्रचारक, ‘अखिल भारतीय किसान संघा’चे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. हे सगळे करीत असताना दादांनी शेतीतील संशोधन केले ते कापूस या नगदी पिकावर.
दादांनी कापसावर संशोधन करून त्याच्या उत्पन्नात आमूलाग्र बदल घडवून आणला. जे केवळ कापसाचे तीन-चार क्विंटल उत्पन्न असायचे, ते एकरी ३२ क्विंटलपर्यंत नेले. म्हणजे, थोडेथोडके नाही, तर तब्बल आठपटीने दादांनी कापसाचे उत्पन्न वाढवून दाखवले आणि हे काही सहजासहजी झाले नाही, तर दादा यासाठी २००१ पासून प्रयत्न करीत होते. तब्बल २५ वर्षांनंतर दादांना हे यश मिळाले आणि याची दखल ‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा’ने दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी दादांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान केली. शिवाय, भारत सरकारने नुकताच ‘पद्मश्री’ किताब जाहीर केला. तसेच ‘श्री. गोळवलकर गुरुजी’ हा पुरस्कारही मिळाला.
कापसाचे उत्पन्न कसे वाढवावे, हे सांगताना झाडांची उंची फार वाढवायची नाही. कापसाचे झाड कमरेएवढे झाले की, त्याचा शेंडा खुडायचा आणि झाडाला ज्या गळफांद्या दोन किंवा तीन असतात, त्या ३५व्या दिवशी काढून टाकायच्या, जेणेकरून झाडाची कायिक वाढ म्हणजे अवास्तव वाढ होऊ द्यायची नाही. हेच तंत्रज्ञान दादांनी अवलंबवून प्रचंड प्रमाणावर कापसाचे उत्पन्न वाढवण्यासाठी किमया केली. देशभरात अनेक शास्त्रज्ञ असताना त्यांच्या लक्षात आले नाही, ते दादांनी करून दाखविले आणि कापूस उत्पादक शेतकर्यांच्या उत्पन्नात लाखो रुपयांची वाढ झाली. दादांनी अतिशय चिकाटीने हे संशोधन केले.
दादांबरोबर काम करीत असताना भरपूर काही शिकायला मिळाले. दादांनी स्वत: काम करीत असताना इतरांना त्यांच्या वागण्याचा कधीच त्रास झाला नाही, म्हणून दादांचा सहवास हवाहवासा वाटतो. एकदा दादा आणि मी प्रवासात निघालो. प्रवास सुरू झाला. नियोजित ठिकाणी ग्राम समितीची बैठक सुरू झाली. दुपारची जेवणाची वेळ झाली होती. परंतु, त्या ठिकाणचे कार्यकर्ते आम्हाला जेवण द्यायचे विसरून गेले. आम्ही दोघेही उपाशीपोटी माजलगावला ४ वाजता पोहोचलो. दादांना म्हटले, "दादा आपण जेवण करू.” परंतु, दादा म्हणाले, "आपले दुपारचे जेवण तर झाले, आता संध्याकाळीच जेवू.” हे ऐकून मी आश्चर्यचकितच झालो आणि माझ्या मनाला होणारा दुपारी न जेवण्याचा त्रास कमी झाला. एखादी व्यक्ती किंवा प्रचारक म्हणाले असते की, दुपारी जेवणाची सोय का झाली नाही; परंतु दादांचा स्वभाव सगळे काही सहन करण्याचा असल्याने मलाही हायसे वाटले.
असाच दुसरा एक प्रसंग सांगता येईल. एकेदिवशी दादा माजलगावला मुक्कामी घरी होते. दुसर्या दिवशी दादांना सकाळीच ५ वाजता दुसर्या गावाला जायचे होते. दादा आम्हा सर्वांना झोपेत टाकून निघून गेले. सकाळी उठल्यावर दादा कुठे आहेत हे पाहिले; परंतु दादा नव्हते, तर प्रवासाला निघून गेले होते. म्हणजे, आपल्यामुळे इतरांना त्रास नको, असा दादांचा स्वभाव. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. असे हे दादा म्हणजे एक असामान्य व्यक्तिमत्त्व. आपणास त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते, हे एक सद्भाग्यच. दादांचा प्रवास एक प्रचारक, एक संशोधक, ‘डॉक्टर ऑफ सायन्स’, ‘पद्मश्री’प्राप्त, ‘श्री. गोळवलकर गुरुजी’ पुरस्कारप्राप्त व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. दादा तथा श्रीरंग देवबा लाड. एक चालते-बोलते विद्यापीठच!
सर्वसामान्य शेतकर्यांपर्यंत पोहोचलेले विद्यापीठ, शेतकर्यांना आर्थिक अधार देणारे विद्यापीठ, कापसाच्या उत्पादनात क्रांती घडवून आणणारे विद्यापीठ म्हणजेच डॉ. श्रीरंग देवबा लाड तथा दादा लाड होय. दादांच्या बाबतीत लिहावे तेवढे कमीच!
दादांच्या प्रचारकीय व्यवस्थेतून अनेक कार्यकर्ते घडले. ‘भारतीय किसान संघा’च्या कामाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आणि दादांच्या रूपाने कार्यकर्त्यांना व ‘भारतीय किसान संघा’ला न्याय मिळाला. दादांच्या सहवासाने आम्ही सर्व कार्यकर्ते धन्य धन्य झालो. मी एक सामान्य ‘किसान संघा’च्या कार्यकर्त्यापासून ‘भारतीय किसान संघा’च्या अध्यक्षस्थानापर्यंत पोहोचलो, याचे सर्व श्रेय आदरणीय दादांनाच!
- बळीराम सोळंके
(लेखक भारतीय किसान संघ, महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष आहेत.)