कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रख्यात प्रख्यात ‘पंडवानी’ गायिका प्रभा यादव तथा पुण्यातील सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांना आज ‘अखिल भारतीय भरतमुनी सन्मान २०२५’ या पुरस्काराने ठाणे येथील सोहळ्यात गौरवण्यात येणार आहे. हा पुरस्कार आपापल्या क्षेत्रात त्यांनी घडवून आणलेल्या परिवर्तनासाठी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. कलेच्या क्षेत्रात सुद्धा काही ठराविक ठोकताळे पाळत, धोपट मार्गाने प्रवास करणारी माणसं असतात. मात्र, या दोन्ही व्यक्तिमत्वांनी अशा वाटेला नाकारून, स्वतःची वेगळी वाट निर्माण करण्याचा निर्धार केला आणि त्यातून पुढे असामान्य कलाकृतींचा जन्म झाला. एका बाजूला संगीताच्या क्षेत्रात चमत्कार घडला आणि दुसर्या बाजूला कोर्या कॅनव्हासवर नवनवीन स्वप्नांनी आकार घेतला. आज या पुरस्कारांच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद...
‘विचार’ पेरणार्या कलाकाराला मरण नाही : चिंतामणी हसबनीस
आपल्याला ‘भरतमुनी सन्मान’ जाहीर झाला, त्यावेळी आपल्या काय भावना होत्या?
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खरं तर प्रचंड आनंद झाला. भरतमुनी यांच्या नावाने आज आपल्या या आधुनिक जगामध्ये पुरस्कार दिला जातोय, ही गोष्ट निराळी आहे असं मला वाटतं. कारण, अर्थात आजच्या आपल्या जगण्यामध्ये आणि त्या काळामध्ये खूप अंतर आहे. परंतु, त्यांच्या आठवणीत असा पारितोषिक प्रदान करणं, हा विचार मला महत्त्वाचा वाटला. त्यामुळे समाधान तर आहेच.
आपल्या प्रत्येक चित्रामध्ये एक जिवंतपणा भासतो, हे साकारण्यामागे अर्थातच खूप मोठी तपस्या आहे. काळाच्या ओघात आपण हे कसं घडवून आणलं?
खरं तर याचं असं सोप्पं उत्तर देता येत नाही. मात्र मला असं वाटतं की, मी भरपूर चित्रं काढत नाही. कारण, मला खरडत बसायला आवडत नाही. जे दाखवायचं आहे, ते नेमकं जोवर ‘क्लिक’ होत नाही ना, तोवर मी चित्र काढायला घेत नाही. शेवटी चित्र काढताना आपल्या मनाचं समाधान होणं अधिक महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. मला पाट्या टाकणं आवडत नाही. सराव जरी करायचा असला तरी तो नेमका केला पाहिजे. आपल्याला नेमकं काय हवं आहे, याचा विचार एकदा पक्का झाला की मग तो पूर्णवत्वाने नेण्यासाठी कुठलीच कसर सोडायची नाही. मला जो विषय आवडतो, त्याचा मी मनापासून आणि मन लावून अभ्यास करतो. प्रत्येक कृती अत्यंत बारकाईने तपासतो. ते जोवर मनासारखं होत नाही, तोवर मी काम करायला जात नाही. हेच या कामाच्या यशामागचं गमक आहे असं मला वाटतं.
आपण नेत्रहीन मुलांसाठी चित्रविश्व साकारावे असं आपल्याला कधी व का वाटलं?
माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पूर्णवेळ चित्रकार झालो. म्हणजे, आपल्याला ‘चित्रकारिता’च करायची आहे, हे मी ठरवले होतो. इतर क्षेत्रामध्ये आपण जायचं नाही, आपण आपली हीच वाट निवडायची, असं मी ठरवलं होतं. अर्थात, चित्रकार झाल्यावर सुद्धा जी एक धोपट वाट असते, ती टाळून मला पुढे जायचं होतं. काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. आपली कला आपण समाजाच्या चांगल्या कार्यासाठी कशी वापरु शकतो, याचा मी विचार करु लागलो. तोपर्यंत मी आपलं प्रदर्शन भरवायचं नाही, असा मी विचार केला. अशातच एक दिवस रस्ता क्रॉस करताना मला एक नेत्रहीन मुलगी दिसली. त्याक्षणी मी विचार केला, मी यांना माझं चित्र दाखवू शकतो का? सुरुवातीला हा विचार मी मनातून काढून टाकला. मात्र, नंतर पुन्हा पुन्हा हा विचार माझी पाठ सोडत नव्हता आणि अखेर मी चित्र काढायाचे ठरवले. यासाठी मी दोन वर्ष ब्रेल शिकलो. स्पर्शाने वाचणं म्हणजे नेमकं काय असतं, याची मला प्रचिती आली. ज्यावेळी मी या नेत्रहीन मुलामुलींचे भावविश्व बघितले, तेव्हा झपाटून गेलो होतो. त्यांच्यासाठी मी नवीन प्रयोग करायचे ठरवले आणि त्यातून माझ्या नव्या चित्रांचा जन्म झाला. यामध्ये चित्राचा जो पोत असतो, तो सुद्धा भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम असतं, असं मला वाटतं. त्यामुळे त्याची आणि ब्रेल लिपीची सांगड घालून चित्रांची मी रचना केली आणि तिथून एक नवा प्रवास सुरु झाला.
चित्रांना ’बघणं’ आणि स्पर्श करून त्याची अनुभूती घेणं, यामध्ये काही फरक आहे का? आपल्याला काय वाटतं?
चित्रकला ही अनुभवायची गोष्ट आहे. आपल्याला चित्रं डोळ्यांनी दिसतं हे बरोबर आहे. मात्र, त्याची अनुभूती आपल्या मेंदूमध्ये पूर्ण होते. आपण जे जगतो, त्याचं एक संचित आपल्या डोक्यामध्ये तयार असतं. त्याला जोखून आपण चित्रांकडे बघत असतो. अर्थाच चित्र एक असलं तरी, प्रत्येकाचं बघणं वेगळं असतं. दृष्टिहीन व्यक्ती सुद्धा जगाकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघतच असते. एखाद्या गोष्टीला स्पर्श करणं, वास घेणं या गोष्टी सुद्धा बघण्याचाच एक भाग आहे.
आपण ज्या प्रकारे एक सक्षम चित्रकार आहात, तितकेच संवेदनशील कवीसुद्धा आहात, या दोन्ही भूमिका एकमेकांना पूरक ठरतात का?
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात, हा बहुधा त्यातलाच प्रकार आहे. मी रुढार्थाने कवी नाही. मात्र, जिथे व्यक्त होण्यासाठी शब्दांची आवश्यकता आहे, तिथे शब्दांचा आधार मी घेतो. आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे आणि ते किती मोजक्या शब्दात आपण मांडू शकतो, याचा मी विचार करुनच व्यक्त होतो.
प्रामुख्याने कलेच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव वाढतो आहे. अशा या काळात चित्रकलेचे भविष्य काय आपल्याला काय वाटते?
कृत्रिम बुद्धिमत्ता आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाली आहे, हे आपण आता नाकारु तर शकत नाही. या तंत्राचं अत्यंत वेगाने आपल्यावर आक्रमण होत आहे, हे ही आपलं वास्तव आहे. मात्र, विचार पेरणार्या कलाकारांना मरण नाही, असं मला वाटतं. हे जे तंत्रज्ञान आहे, त्याला शेवटी माहिती माणसंच पुरवतात. त्यामुळे आपण त्याचा वापर कसा करु, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.
होतकरू चित्रकारांना, युवकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता?
मी त्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो आणि ती म्हणजे, कुठलीही कला आत्मसात करायची असेल, तर तिचा पाया भक्कम करणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्या त्या कलाप्रकारासाठी लागणारे ‘फाऊंडेशनल स्किल्स’ आत्मसात करणे, खूप गरजेचे आहे. जी गोष्ट शिकायाची आहे, ती मन लावून शिकावी एवढंच माझं सांगणं आहे.
चिंतामणी हसबनीस यांचा अल्पपरिचय
शिक्षण : अभिनव कला विद्यालय, पुणे, जे. के. इन्स्टिट्यूट मुंबई,
कला विश्व महाविद्यालय, सांगली
सन्मान :पु.ल. कृतज्ञता पुरस्कार (२०२५)
रवि परांजपे फाऊंडेशन गुणीजन पुरस्कार (२०२४)
आचार्य पोद्दार कर्तृत्वरत्न पुरस्कार (शब्दसारथी-२०२५)