भरतमुनि सन्मानाच्या निमित्ताने...

01 Feb 2026 13:12:40
Bharatmuni Samman 2025
 
कला व साहित्याच्या क्षेत्रात अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असलेल्या ‘संस्कार भारती’ या संस्थेच्या वतीने आज, रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी ठाणे येथे ‘अखिल भारतीय भरतमुनी सन्मान, २०२५’ प्रदान केले जाणार आहेत. भरतमुनी यांना त्यांच्या ‘नाट्यशास्त्र’ या ग्रंथामुळे भारतीय कलेचे जनक मानण्यात येते. तरीही त्यांच्या नावाने एकही कलाविषयक पुरस्कार दिला जात नव्हता. प्रसिद्धीपासून दूर असलेल्या व्यक्ती ज्यांनी आपल्या कार्यातून सामाजिक बांधिलकी जपली आहे, अशा कलावंतांना भरतमुनींच्या नावे पुरस्कार देण्याची परंपरा ‘संस्कार भारती’ने सुरू केली आहे. यंदा पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे. त्यानिमित्ताने...
 
दृश्यकला, मंचीय कला, साहित्य, लोककला यांपैकी दोन प्रकारात दरवर्षी ‘भरतमुनी पुरस्कार’ देण्यात येतो. या वर्षी लोककला व दृश्यकला या विभागातील कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लोककलेच्या विभागात छत्तीसगढ येथील वेदमती शैलीतील प्रख्यात ‘पंडवानी’ गायिका प्रभा यादव, तसेच दृश्यकलेच्या विभागात पुणे येथील सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांना त्यांच्या दीर्घकालीन कलासाधनेसाठी व आपल्या कार्यक्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल ठाणे येथे होणार्‍या भव्य समारंभात ‘अखिल भारतीय भरतमुनी सन्मान - २०२५’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध ओडीसी व भरतनाट्यम नृत्यशैलीच्या महागुरू व माजी राज्यसभा सदस्य पद्मविभूषण सोनल मानसिंह यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भरतमुनींच्या नाट्यविषयक योगदानाचा हा धावता आढावा.
 
भरतमुनी हे प्राचीन भारतातील एक महान तत्त्वज्ञ, नाट्यशास्त्रज्ञ आणि कवी होते. त्यांना ‘भारतीय नाट्यकलेचे जनक’ मानले जाते. त्यांनी ’नाट्यशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला, जो भारतीय नाट्यकलेचा पाया म्हणून ओळखला जातो. भरतमुनी यांचे ‘नाट्यशास्त्र’ हा ग्रंथ सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी लिहिला गेला असावा, असे मानले जाते. हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे आणि त्यात ३६ अध्याय आहेत. नाट्यशास्त्रात नाटक, नृत्य, संगीत, अभिनय, रंगभूमीचे आरेखन, वेशभूषा, मेकअप आणि इतर कलांच्या तंत्रांचे सखोल विवेचन केले आहे. हा ग्रंथ केवळ कलाकारांसाठीच नाही, तर समाजाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकासासाठीही महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ केवळ नाटकाच्या तत्त्वज्ञानविषयक मुद्द्यांबद्दल, परिभाषांबद्दल बोलत नाही, तर कलांच्या इतर अंगांबद्दलही माहिती देतो. भरतमुनी यांच्या नाट्यशास्त्रातील ’रस सिद्धान्त’ हा कलात्मक अभिव्यक्तीचा आणि सौंदर्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे.
 
भरतमुनी यांचे योगदान
 
भरतमुनी यांनी केवळ नाट्यकलेचा पाया रचला असे नाही, तर त्यांनी भारतीय संस्कृतीला एक नवीन दिशा दिली. त्यांच्या नाट्यशास्त्रातील तत्त्वे आजही भारतीय नाटक, चित्रपट, संगीत आणि नृत्य यांना प्रेरणा देत आहेत. त्यांच्या रससिद्धान्तामुळे कलाकारांना भावनांचे सखोल आणि प्रभावी प्रदर्शन करण्यास मदत होते.
 
भरतमुनींच्या नाट्यशास्त्राची वैशिष्ट्ये
 
१. भरतमुनी यांच्या नाट्यशास्त्रात केवळ नाटकाचेच नव्हे, तर रंगमंचाच्या तंत्रज्ञानाचेही सविस्तर वर्णन आहे. त्यात रंगमंचाचे आकार, प्रकाशयोजना आणि ध्वनिव्यवस्थेबद्दलही माहिती दिली आहे.
 
२. रससिद्धान्त हा केवळ नाटकापुरता मर्यादित नाही, तर तो साहित्य, चित्रपट, संगीत, आणि इतर कलांमध्येही वापरला जातो.
 
३. नाट्यशास्त्राचा प्रभाव केवळ सद्यकालीन भौगोलिक भारतापुरताच मर्यादित नाही, तर तो संपूर्ण आशियाई देशांमध्ये पसरला आहे.
 
भरतमुनी यांचे नाट्यशास्त्र आणि त्यांचा रससिद्धान्त या भारतीय संस्कृतीच्या अमूल्य ठेवी आहेत, ज्यांनी जगभरातील कलाकारांना प्रेरणा दिली आहे. ब्रह्मदेवाने रचलेले मूळ नाट्यशास्त्र फारच तात्विक स्वरूपाचे, अवजड आणि थोडेसे क्लिष्ट असल्यामुळे व्यावहारिक दृष्टीने त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. म्हणून ब्रह्मदेवाने भरतांना बोलावून हा ग्रंथ सुगम व्यवहारिक आणि उपयुक्त करण्याची त्यांना विनंती केली व त्यानंतर भरतमुनी यांनी ‘नाट्यशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला, असे मानले जाते. व्यापक अर्थाने बघितले तर ‘नाट्यशास्त्र’ हा नाटकाच्या सादरीकरणाचे यमनियम प्रस्थापित करणारा म्हणजेच नाट्य सादरीकरणाला ठराविक अशी चौकट देणारा ग्रंथ आहे. त्याचप्रमाणे तो नाटकाच्या सादरीकरणाची समीक्षा करणारा ग्रंथ आहे.
 
‘नाट्यशास्त्र’ हा ग्रंथ देशी, विदेशी संशोधकांना आणि अभ्यासकांना कायम आव्हान देत आलेला आहे.प्रत्येक कालखंडात त्यावर चर्चा होत आली आहे आणि यापुढे ती होत राहील, यात संशय नाही. ‘नाट्यशास्त्र’ हा आस्वाद्य ग्रंथ असल्यामुळेच त्याचा रसास्वाद किंवा त्याचे रसग्रहण अभ्यासनीय तर ठरतेच. पण, ते रोचकही होते. नाट्य हे मुख्यतः दृश्य आणि श्राव्य कलाकृती आहे, हे सर्वमान्य आहे. आपण जे ऐकतो, पाहतो ते उत्तम, आनंददायक, उच्च दर्जाचे आणि उदात्त असले पाहिजे. लोकांना रंगभूमीवर दाखवायचे ते लोकचरित असावे. नैतिक लोकव्यवहाराचे त्यातून दर्शन घडावे म्हणजे श्रोत्यांना शिक्षण व प्रेक्षकांना मार्गदर्शन मिळेल, अशी नाट्यशास्त्राची मूळ कल्पना राहिली. नाटकाने नैतिक शिक्षणाचा डौल आणता कामा नये. मात्र, त्याचवेळी नाटकाने करमणुकीबरोबर उद्बोधनही केले पाहिजे. मुळात रंगभूमीवर काय दाखवावे आणि काय दाखवू नये. इतकेच नव्हे तर दाखवायचे ते कसे दाखवायचे? हेही भरतमुनींनी आपल्या ग्रंथात सांगितले आहे. मुळातच भारतीय नाटकाला विशिष्ट स्वरूप आणि उद्दिष्ट बहाल करून जनतेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात नाट्याला फार महत्त्वाचे स्थान आहे, हे निदर्शनाला आणून नाट्यशास्त्राने फार मोठी कामगिरी बजावली आहे.
 
देशाच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात असंख्य घडामोडी होऊन गेल्या. अनेक परकीय आक्रमणे झाली. यशापयशाची अनेक स्थित्यंतरे आपण पाहिली. भारतीय कलासंस्कृतीचा अविभाज्य संस्कृतीचा भाग असणारी नाट्यशास्त्र परंपरा टिकून राहिली. भरतमुनी आणि त्यांचे नाट्यशास्त्र यांचे हे अभूतपूर्व कर्तृत्व आहे, यात शंका नाही.
 
- सोनल नारकर
 
 
 
Powered By Sangraha 9.0