नवयुगाचे शिल्पकार

    01-Feb-2026   
Total Views |
Prabha Yadav
 
कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रख्यात प्रख्यात ‘पंडवानी’ गायिका प्रभा यादव तथा पुण्यातील सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांना आज ‘अखिल भारतीय भरतमुनी सन्मान २०२५’ या पुरस्काराने ठाणे येथील सोहळ्यात गौरवण्यात येणार आहे. हा पुरस्कार आपापल्या क्षेत्रात त्यांनी घडवून आणलेल्या परिवर्तनासाठी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. कलेच्या क्षेत्रात सुद्धा काही ठराविक ठोकताळे पाळत, धोपट मार्गाने प्रवास करणारी माणसं असतात. मात्र, या दोन्ही व्यक्तिमत्वांनी अशा वाटेला नाकारून, स्वतःची वेगळी वाट निर्माण करण्याचा निर्धार केला आणि त्यातून पुढे असामान्य कलाकृतींचा जन्म झाला. एका बाजूला संगीताच्या क्षेत्रात चमत्कार घडला आणि दुसर्‍या बाजूला कोर्‍या कॅनव्हासवर नवनवीन स्वप्नांनी आकार घेतला. आज या पुरस्कारांच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद...
 
कलेला योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक : प्रभा यादव
 
आपल्याला आपल्या कार्यासाठी ‘भरतमुनी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. आपल्या काय भावना आहेत ?
 
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर निश्चितच आनंद झाला. मागच्या अनेक दशकांची तपस्या फळाला आली आहे असं वाटतं. माझी जी जीवनयात्रा होती, तिचा सन्मान यानिमित्ताने होतो आहे, असं वाटतं.
 
पंडवानी गायन कला म्हणजे नेमकं काय?
 
‘पंडवानी’ ही आमच्या छत्तीसगढ राज्यातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक लोककला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ’पांडवांची वाणी’ म्हणजेच ‘पंडवानी.’ आता ’पांडवांची वाणी’ म्हणजे साक्षात भगवंताची वाणी. अधर्माच्या विरोधात पांडवांना संघर्ष करावा लागला. अर्जुनाला उपदेश करणारी गीता श्रीकृष्णाने ऐकवली म्हणजेच काय, तर धर्माच्या स्थापनेसाठी रचलेलं हे काव्य आहे. ‘पंडवानी’ गायनाच्या माध्यमातून महाभारताचा हाच विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत असतो. यामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे, ‘वेदमती शैली’ आणि दुसरी म्हणजे ‘कापालिक शैली.’ मी स्वतः ‘वेदमती शैली’ची गायिका आहे. ‘वेदमती शैली’मध्ये वेदांचा आधार घेऊन वेदांना प्रमाण मानूनच गीत सादर करायचे असते. कथाकथनाच्या शैलीमध्ये आम्ही महाभारताचा आशय आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवतो. दुसर्‍या बाजूला ‘कापालिक शैली’मध्ये विविध कल्पनांची सांगड घालून, वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून महाभारत लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो. अभिनय, संगीत यांच्या मिश्रणातून आम्हीही कला लोकांपर्यंत नेतो.
 
आपण ‘पंडवानी गायन’ कधीपासून करत आहात? आपल्याला या कलेसाठी कोणाचे मार्गदर्शन लाभले?
 
माझ्या जीवनाचा एक मोठा काळ या गीतांच्या, तपस्येमध्ये आणि सादरीकरणात गेला. मागील पाच दशकांहून अधिक काळ मी या क्षेत्रामध्ये आहे. माझे गुरू ज्यांना ‘पंडवानी गायनातील भीष्म पितामह’ असेसुद्धा म्हटले जाते ते म्हणजे स्वर्गीय झाडूराम देवांगन यांच्याकडे मला या गीतांचे शिक्षण घेण्याचे भाग्य लाभले. माझ्या गुरूंनी वयाच्या १२व्या वर्षीच गायनाला सुरुवात केली होती. १९२७ साली भिलाई जवळच्या बासिन या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्यासोबत राहून मला माझा मार्ग सापडला. गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेत, ‘पंडवानी’ गायनाचे असंख्य वेगवेगळे कंगोरे मी शिकले. त्यांच्यासोबत जिथे जिथे मी जायची, तिथे तिथे मला खूप नवनवीन गोष्टी कळायच्या आणि एकूणच त्यांच्या सान्निध्यात माझी बैठक अधिकाधिक पक्की होत गेली. ते गात असताना प्रामुख्याने त्यांच्या चेहर्‍यावर जे भाव होते, त्यातून सुद्धा त्यांच्या अभिव्यक्तीचा विचार मला कळायचा. आपल्या गायकीप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि संवेदनशीलता आम्हाला खूप काही शिकवून गेली. त्याचबरोबर माझे गुरुबंधू कुंजबिहारी देवांगन यांच्या तालमीत सुद्धा माझ्या गायकीने आकार घेतला. मंचावर काम करता करता, बाहेर आपली कला सादर करताना मी अनेक गोष्टी शिकले.
 
प्रत्येक कला आपल्या कलाकाराला काही ना काहीतरी देत असते, ‘पंडवानी’ गायनाने आपल्याला काय दिलं?
 
मला असं वाटतं की, माझ्या गायिकीने मला समाधान दिलं, जे आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दर्शकांचे प्रेम सोबत होतेच. आम्ही ज्या वेळेला लोकांच्या समोर कला सादर करतो, त्यावेळेला भगवंताची जीवन यात्रा त्यांच्यासमोर मांडत असतो. त्यामुळे या जनतेचे आशीर्वाद आम्हाला लाभतात. आम्हाला जे शिक्षण मिळालं, त्यातून आम्ही पुढे वेगळा विचार लोकांना देण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एका प्रकारचा समाधान आहे, संतोष आहे.
 
‘पंडवानी’ गायनाची ही कला आपण भारताच्या अनेक प्रांतामध्ये सादर केली आपला अनुभव काय राहिला आहे?
 
वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या वेळेला सादरीकरणासाठी आम्ही जातो, त्यावेळेला अत्यंत प्रेरणादायी अनुभव आम्हाला मिळतो. आम्ही आमच्या भाषेत म्हणजेच छत्तीसगढीमध्ये आमची कला सादर करतो. समोर बसलेल्या प्रेक्षकांना ती भाषा अपरिचित असली तरी सुद्धा त्याची त्यांना अडचण होत नाही. त्याचं कारण म्हणजे, आमच्या लोकसंगीताचा जो बाज आहे, जी धून आहे, लोकं तिच्या प्रेमात पडतात आणि आम्हाला दाद देतात. लोकांना आपलं म्हणून जे संगीत आहे ना की ऐकण्यात रस आहे.
 
एक कलाकार म्हणून, आपल्याला या क्षेत्रामध्ये आगामी काळात काय बदल व्हायला हवे असं वाटतं?
 
कलाकार मग तो कुठल्याही क्षेत्रातला असतो, त्याला व्यासपीठ मिळणे, संधी मिळणे अत्यंत आवश्यक असते. त्याला जर संधी मिळाली, तरच तो स्वतःला सिद्ध करू शकतो. आम्हाला संधी मिळाली आम्ही इथपर्यंत आलो. अशाप्रकारे वेगवेगळ्या भागातील तरुणांना तरुणींना संधी मिळणे आवश्यक आहे. मला या क्षेत्रात येऊन मोठा काळ लोटला. मात्र, माझ्यानंतर ज्यांना संधी मिळाली, त्यांनी देखील आपल्या संधीचं सोनं केलं. कलाकार हा कलेने श्रीमंत असला तरी ऐहिकदृष्ट्या बर्‍याचदा निर्धन असतो. त्याला सबळ करणे, त्याचे सशक्तीकरण करणे याची जबाबदारी शासनाची आहे.
 
आज अनेक युवक ‘पंडवानी’ गायनाकडे आणि एकूणच लोककलेच्या विश्वाकडे वळत आहेत. त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता?
 
या क्षेत्रात त्यांनी मनापासून काम करावे, अशी माझी इच्छा आहे. मात्र, बर्‍याच जणांचा ओढा हा ‘कापालिक शैली’कडे जास्त आहे, असे मला दिसून आले आहे. त्यांनी ‘वेदमती शैली’वर देखील तितक्याच क्षमतेने काम केले पाहिजे, असे मला वाटते. ‘वेदमती शैली’वर जर कोणी काम केले नाही, तर ती आपली शैली लुप्त होण्याची शक्यता आहे. या गायकीमध्ये तिजनबाई यांच्यासारख्या महिलेने काम करून अनेकांना प्रेरणा दिली. त्यांच्यामुळे अनेक मुली पुढे आल्या. त्यामुळे सर्व अडथळ्यांवर मात करत पुढे जाणं आवश्यक आहे, असं मला वाटतं.
 
प्रभा यादव यांचा अल्पपरिचय
 
शिक्षण : प्राथमिक पाठशाळा, ग्राम बंगोली
 
सन्मान : लोककला आदिवासी परिषद, भारत भवन (१९८९)
छत्तीसगढ गौरव सन्मान (२०१०)
भुईया सन्मान (२०२५)
 
 
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.