उद्धवा, थोर तुझे उपकार!

09 Jan 2026 10:24:10
Uddhav Thackeray
 
ठाकरे बंधूंनी दिलेल्या मुलाखतीमुळे त्यांनी मुंबईकरांवर खरं म्हणजे फार मोठे उपकारच केले म्हणायचे. त्यांचे विकासविरोधी विचार, फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांवरील ठाकरेंची मते ऐकून मुंबईकरांना आता महापालिकेत कोणाला मतदान करायचे, याचा निर्णय घेणे अधिकच सोपे झाले. आपली सत्ता असताना मुंबईत सारे आलबेल होते, असे जर ठाकरे बंधूंना वाटत असेल; तर त्यांना आता एकत्र का यावे लागले, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. उलट, देवेंद्र फडणवीस यांच्या ठाण्यात पार पडलेल्या मुलाखतीत मात्र त्यांची विकासाची दूरदृष्टी अगदी पदोपदी जाणवते.
 
जुने चित्रपटसंगीत हे कितीही सुश्राव्य असले, तरी त्या संगीताची तबकडी सतत वाजवीत राहिल्यास ती झिजून जाते आणि तिची सुई अडकते. उद्धव आणि राज ठाकरे यांच्याबाबतीत मुंबईसंदर्भात हेच झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव व राज ठाकरे या दोघांची संयुक्त मुलाखत खासदार संजय राऊत आणि चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली. ही मुलाखत ऐकताना या दोन्ही बंधूंकडे मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी कोणत्याही नव्या योजना आणि भविष्यवेधी दृष्टी नाही, हे दिसून आले. इतकेच नव्हे, तर सध्याच्या मुंबईच्या दुरवस्थेला आपण सोडून बाकी सर्वजण जबाबदार कसे आहेत, हेच सांगण्याचा त्यांचा प्रयत्न केविलवाणा होता. संपूर्ण मुलाखतीत केवळ नकारात्मक विचार आणि फडणवीस यांच्या नावाने बोटे मोडणे यापलीकडे बोलण्यासारखे ठाकरे बंधूंकडे काहीच नव्हते. गेली २५ वर्षे मुंबईवर एकहाती सत्ता राबविल्यावरही ठाकरे बंधूंची हीच मनोधारणा असेल, तर आता मुंबईकरांनी त्यांच्याबाबत वेगळा विचार केल्यास काहीच नवल नव्हे. उलट, विकासाबद्दलची आपली जगावेगळी आणि प्रतिगामी मते व्यक्त केल्याने त्यांनी मुंबईकरांवर एकप्रकारे उपकारच केले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत कोणाला मत द्यायचे, याचा निर्णय घेणे मुंबईकरांना अधिकच सोपे झाले आहे.
 
या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुलाखत ठाण्यात घेण्यात आली. पहिल्या प्रश्नापासून ती ऐकताना मतदारांना त्यांनी अधिकाधिक बोलावे, असेच वाटत राहते. ठाकरे यांच्या रडगाण्यानंतर फडणवीस यांची मुलाखत ऐकल्यास दमट, कोंदट अंधार्‍या खोलीतून लख्ख सूर्यप्रकाशातील मोकळ्या हवेत आल्यासारखे वाटते. हा फरक या दोन्ही नेत्यांच्या मनोवृत्तीमुळे दिसतो. या मुलाखतीतील फडणवीस यांचा आत्मविश्वास, बोलण्यातील जोश आणि मुंबई व लगतच्या परिसराच्या सर्वांगीण विकासाचा त्यांचा दृष्टिकोन कोणालाही प्रभावित करून जाईल.
 
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि दोन ठाकरे बंधूंचे पक्ष असा सामना होत आहे. ठाकरे बंधूंना विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे ही इतकी तीच ती आहेत की, मुंबईच्या भवितव्यासाठी या दोन्ही पक्षांकडे कोणत्या योजना आहेत, त्याचा साधा उल्लेखही झाला नाही किंवा गेल्या २५ वर्षांत या ठाकरे बंधूंनी मुंबईच्या विकासासाठी कोणते प्रकल्प राबविले, त्याचाही उल्लेख झाला नाही. याचे कारण राज असो की, उद्धव, यांनी पुन्हा-पुन्हा मराठी अस्मिता, परप्रांतीय, मुंबई वेगळी करणे वगैरे जुनीच.
 
विद्यमान राज्यकर्ते (म्हणजे फडणवीस) हे त्यांच्या मालकांचे (म्हणजे मोदी-शाह) नोकर आहेत हे विधान ऐकून हसावे की रडावे, हेच मुंबईकरांना कळणार नाही. ‘फडणवीस यांचे मालक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत,’ हे राज ठाकरे यांचे विधान म्हणजे त्यांच्या कोत्या आणि खुनशी मनोवृत्तीचे द्योतकच. प्रश्नकर्ते महेश मांजरेकर यांची तर वेगळीच पातळी होती. त्यांना आता मुंबईत विकास नकोय. थोडक्यात, राज आणि उद्धव ठाकरे यांना हे विकास प्रकल्प नको आहेत, असे समजायचे का? तसे असेल तर हे प्रकल्प आम्हीच करून दाखविले, अशा अर्थाची ‘होर्डिंग्ज’ त्यांनी का उभारली आहेत? हा विकास नको असेल, तर त्यांच्या विकासाच्या कल्पना तरी काय आहेत, ते त्यांनी स्पष्ट केले; तर मुंबईकरांना मत देण्याचा निर्णय करणे सोपे होईल.
 
मुंबईत जन्म झाला नाही म्हणून फडणवीस यांना मुंबईचे प्रश्न ठाऊक नाहीत आणि म्हणून त्यांनी (म्हणजे त्यांच्या पक्षाने) मुंबईत निवडणूक लढवू नये, असेही ठाकरे बंधूंनी या मुलाखतीत अप्रत्यक्षपणे सुचविले. या इतका आचरटपणाचा विचार कुणी अशिक्षित नेतेही मांडत नाहीत. ठाकरेंचा जन्म मुंबईत होऊनही त्यांना मुंबईकरांचे प्रश्न आजपर्यंत कळलेले नाहीत, हे त्यांनी ‘मेट्रो कारशेड’ला विरोध करून दाखवून दिले आहे. आरे कॉलनी ते कफ परेड या भुयारी मेट्रोच्या‘अ‍ॅक्वा लाईन’ला मुंबईकरांनी जो भरभरून प्रतिसाद दिला आहे तो पाहता, फडणवीस यांनाच मुंबईकरांचे प्रश्न अधिक चांगले कळतात हे दिसून येते. नुसते कळतातच असे नाही, तर फडणवीसांचा मुंबईचा, येथील परिवहन व्यवस्थेचाही अभ्यास आहे आणि म्हणून महायुती सरकारने राबविलेल्या प्रत्येक प्रकल्पांत फडणवीसांची दूरदृष्टी, त्यांचे मुंबईच्या विकासाचे व्हिजन हे लख्ख प्रतिबिंबित होते. त्यामुळे मुंबईची माहिती, मुंबईचा अभ्यास, मुंबईकरांच्या समस्या, मुंबईकरांच्या गरजा याची उत्तम जाण ही नागपूरकर असलेल्या फडणवीसांना ठाकरेंपेक्षा केव्हाही अधिकच!
 
दुसरे असे की, ठाकरे बंधूंचे हे मत त्यांनाही लागू होते, हे ते विसरतात. ठाकरे बंधूंचा जन्म मुंबईतील आहे. पण, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव-राज ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म मुळचा मुंबईचा नाही. म्हणजे मग राज यांच्या तर्काने प्रबोेधनकार आणि बाळासाहेबांनाही मुंबई कळली नाही का? की त्यांनी मुंबईसाठी काहीच केले नाही? मग राज ठाकरेंच्या याच युक्तिवादानुसार ते ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, नागपूर, अकोला वगैरे अन्य शहरांच्या निवडणुका का लढवीत आहेत? ‘बुलेट ट्रेन’च्या कामांना स्थगिती देऊन उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांची कोणती सेवा केली? मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गारगाई धरण बांधण्यात का चालढकल केली आणि समुद्राचे पाणी गोडे करण्याचा (डिसॅलिनेशन) प्रकल्प का उभारला गेला नाही, याचेही उत्तर ते देऊ शकले नाहीत.
 
मुंबईतील रस्ते आणि त्यावरील खड्डे हा जागतिक कीर्तीचा प्रश्न आहे. पण, त्यात सुधारणा करण्याचा विचारही ठाकरे यांना शिवला नव्हता. आता मुंबईतील प्रमुख रस्ते सोडाच, लहान गल्ल्याही सिमेंट-काँक्रीटच्या केल्या जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे पडण्याचा प्रश्न बर्‍याच प्रमाणात सुटेल, हे निश्चित. पण, ही गोष्ट ठाकरेंना गेल्या २५ वर्षांत का सुचली नाही? कारण, तसे झाले तर दरवर्षी रस्तेदुरुस्तीसाठी काढण्यात येणार्‍या कंत्राटातील टक्का कसा मिळाला असता?
 
मुंबईकर मुख्यमंत्री म्हणून नुसती मिरवण्यातच धन्यता मानलेल्या उद्धव ठाकरेंनी मुंबई तर सोडाच, त्यांच्याच घराच्या आसपास तरी विकास केला का? तर नाही! अजूनही वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला पाऊल ठेवताच झोपडपट्ट्या, त्यातून वाहणार्‍या सांडपाण्याचेच दर्शन मुंबईकरांना होते. त्यामुळे ठाकरेंनी मुंबईच्या विकासाच्याही अजिबात बाता मारु नये. खरं तर मुख्यमंत्री हा अमूक एका शहराचा नसतो, तर तो राज्याचा असतो. परंतु, संकुचित मनोवृत्ती असणार्‍या ठाकरेंना मुंबईच्या पलीकडचा महाराष्ट्र मुख्यमंत्री असतानाही कधी दिसला नाही आणि आता हाती काहीही नसताना, तर महाराष्ट्र त्यांच्या खिसगणतीतच नाही. महाराष्ट्राची, राज्याच्या विकासाची, सुरक्षेची दोन्ही ठाकरे बंधूंना मनस्वी तळमळ असती, तर नगरपंचायत निवडणुकीत, त्यांचे दर्शन अवघ्या महाराष्ट्राला झाले असते. परंतु, त्यापैकी काहीएक झाले नाही. परिणामस्वरुप, महाराष्ट्रानेही, ‘महाराष्ट्राचा ब्रॅण्ड’ म्हणून मिरवणार्‍या दोन्ही ठाकरे बंधूंना या निवडणुकांमध्ये सपशेल नाकारत त्यांचा बॅण्डच वाजवला. त्यामुळे फडणवीस म्हणाले होते तसे, ‘तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आणि तुम्ही म्हणजे मराठी नाही!’ ही खूणगाठ दोन्ही ठाकरे बंधूंनी बांधून घ्यावी. कारण, महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतरही पुन्हा त्यांच्यावर ईव्हीएम, व्होटचोरी आणि सत्ताधार्‍यांकडेच बोट दाखवण्याची वेळ ओढवणार आहे, हे निश्चित.
 
खरेतर ठाकरे बंधूंची मुलाखत प्रत्यक्ष न ऐकताही ते काय बोलले असतील, याचा अंदाज मुंबईकरांना आता करता येईल, इतकी त्यांची उत्तरे ठरावीक साच्यातील आहेत. परप्रांतीय, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट, अदानी-अंबानी हे मुंबई गिळंकृत करीत आहेत, यापलीकडे ठाकरे बंधूंकडे बोलण्यास काही नाही. आणि ज्या अदानींचे नाव ठाकरे बंधूंनी घेतले, त्याच अदानींसाठी मागे बारामतीत रेड कार्पेट शरद पवारांनीही अंथरले होते. तोच शरद पवारांचा पक्ष आज दोन्ही ठाकरे बंधूंसोबत नाईलाजास्तव का होईना, मुंबईत निवडणुका लढवतोय. तेव्हा, ‘मुंबईचे अदानीस्तान होईल,’ हा उद्धव ठाकरेंचा दावा शरद पवारांना मान्य आहे का, हेही त्यांनी एकदाच जाहीरपणे सांगावे. आणि तसा तो मान्य नसेल, तर मग पवारसाहेब ठाकरेंचे कान टोचणार का? की या नामधारी आघाडीतून बाहेर पडणार?
 
असो. देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीतील जोश, आत्मविश्वास, ‘एमएमआरडीए’ प्रदेशाची त्यांना असलेली माहिती, त्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा तपशील याची माहिती हे पाहून कोणीही प्रभावित होईल. मुंबईत मराठी माणूस टिकविण्यासाठी ठाकरेंना ‘परके’ वाटणारे फडणवीस हे जितके कष्ट घेत आहेत, त्याच्या निम्मे कष्ट जरी ठाकरे यांनी घेतले असते, तरी त्यांची अशी केविलवाणी अवस्था झाली नसती. पण, आज ठाकरे बंधूंनी आपले पूर्वग्रहदूषित, कोते आणि पराभूत विचार व्यक्त करून मुंबईकरच नव्हे, तर अन्य शहरांतील मतदारांवरही मोठे उपकार केले आहेत, असेच म्हणावे लागते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0