५५ टक्के उमेदवार शेतकरी

09 Jan 2026 12:00:28

Supriya Sule

मी शेतकरी आहे,’ असे वक्तव्य एखाद्या राजकारणी माणसाने केले की, समजून जावे याने सरकारदरबारी कर चुकवण्यासाठी ‘शेतकरी’ नावाची झूल पांघरली आहे. म्हणूनच, तर एक एकर शेतात लावलेल्या वांग्याच्या पिकातून १०० कोटी रुपयांचे उत्पन्न महाराष्ट्राच्या मोठ्या ताईंनी मिळवल्याच्या खुमासदार चर्चा अगदी गावच्या पारावरदेखील ऐकायला मिळतात. सर्वपक्षीय नेत्यांवर नजर टाकली, तर बहुसंख्य ‘हाडाचा शेतकरी’ असल्याचे दिसून येईल. पण, जेव्हा खर्‍या शेतकर्‍यांच्या शेतमालाच्या किमतीचा प्रश्न आला की, ही नव्याने ‘शेतकरी’ झालेली जमात कुठे लपून बसते, याचे कोडे काही महाराष्ट्राच्या जनतेला सुटलेले नाही. एकही पुढारी दर घसरले म्हणून माझे इतके नुकसान झाले, मला नुकसानभरपाई मिळावी; अशी मागणी करताना अजूनतरी कोणीच पाहिलेले नाही. या ‘शेतकरी पुराणा’चा येथे एवढा ऊहापोह करण्याचा उद्देश म्हणजे सध्या महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत नाशिकमध्ये भावी नगरसेवकांच्या रूपाने शेतकर्‍यांचा भाव वधारला आहे. १२२ उमेदवारांपैकी ५५ टक्के उमेदवारांनी सादर केलेल्या माहितीनुसार, आपले उत्पन्नाचे साधन, व्यवसाय शेती असल्याचे निवडणूक अर्ज दाखल करताना सादर केले.

आता नाशिकच्या सध्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला, तर शेती करता येईल अशी कितीशी जमीन शहराला लागून आहे, याचा आधी शोध घ्यावा लागेल. मखमलाबाद, नांदूर, नाशिकरोड, अमृतधाम आणि सातपूर या भागांत काही प्रमाणात शेती आढळते. मग, अचानक इतके सारे उमेदवार शेतकरी कसे काय झाले, याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आता निवडणूक लढणे पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही. कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांची मर्जी उमेदवाराला सांभाळावी लागते. त्यात मतदानाच्या दिवशी ‘लक्ष्मीदर्शन’ घडवले नाही, तर मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत नाहीत, हे दारुण वास्तव. त्यात एकीकडे शेतीवर गुजराण करणार्‍या शेतकर्‍याची व्यथा जाणून घेतली. नुसता अर्ज दाखल करायला तो दहावेळा विचार करेल, अशी परिस्थिती असताना महापालिकेत जाण्यासाठी धडपडणारे हे खरेच शेतकरी आहेत का, याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

नाफेड’ने १०५ कोटी थकवले

 

एकीकडे नाशिकच्या महापालिका निवडणुकीसाठी ५५ टक्के उमेदवार शेतकरी असल्याचे समोर आलेले असताना, दुसरीकडे निवडणूक प्रचाराच्या या रणधुमाळीत ‘नाफेड’ने कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे १०५ कोटी रुपये थकवल्याची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील दोन हजार, ४०० शेतकर्‍यांना त्यांच्या घामाचा दाम त्यांच्या पदरात मिळालेला नाही. त्यातून उद्विग्न झालेल्या बळीराजानेनाफेड’च्या कार्यालयावर धडक देत कर्मचारी आणि अधिकार्‍यांना बाहेर काढत, कार्यालयाला कडी लावली. ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या संस्थांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या ‘किंमत स्थिरीकरण निधी योजनें’तर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून सुमारे तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता. मागील काही महिन्यांपूर्वी कांद्याची दरवाढ झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला कमी दरात तो उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘नाफेड’ने मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती.

त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कांदा खरेदी करता आला. ही गोष्ट सत्य असली, तरी नाशिक जिल्ह्यात बहुसंख्य शेतकरीवर्गाचा उदरनिर्वाह कांद्याच्या शेतीवर अवलंबून आहे. तसेच शेतीच्या पुढील मशागतीचा खर्चही त्यावरच भागवला जात असल्याने पैसे न मिळाल्याने तो अडचणीत सापडला आहे. या कांदाखरेदी प्रक्रियेमध्ये शेतकर्‍यांना त्यांच्या मालाच्या मोबदल्यापोटी आतापर्यंत ७५ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे. मात्र, उरलेली ५० टक्के रक्कम मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळेच संयम सुटलेल्या कांदा उत्पादकांनी ‘नाफेड’च्या कार्यालयाला कडी लावत, अधिकार्‍यांना बाहेर काढले. येत्या काही महिन्यांत उन्हाळी कांद्याची आवक होण्यास सुरुवात होईल. त्यात सध्या बाजारात असलेल्या कांद्याला उत्पादन-खर्च भरून निघेल, इतका दर मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यात जोरदार पावसाने शेतीची मोठी हानी केली. या सगळ्या एकत्रित कारणांमुळेच ‘नाफेड’च्या गलथान कारभाराचा निषेध करत, जिल्ह्यातील विविध भागांत शेतकर्‍यांनी आंदोलन केले. आता नाशकात शेतकरी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार खरेच शेतकरी आहेत का, याचा शोध जनतेने घ्यायचा आहे.
 
 - विराम गांगुर्डे
 
Powered By Sangraha 9.0