मुंबई : ( Mumbai Metro ) महिलांसाठी अधिक समावेशक आणि संवेदनशील सार्वजनिक वाहतूक सुविधा देण्याच्या दिशेने मुंबई मेट्रो वन प्रा. लि. वर्सोवा–अंधेरी–घाटकोपर ब्लू लाईन-१ने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबई मेट्रो वनने देशातील आघाडीच्या फेमटेक आणि महिला वेलनेस ब्रँड ‘सिरोना’सोबत भागीदारी करत सर्व १२ मेट्रो स्थानकांवर मासिक पाळी स्वच्छतेसाठी बहुपर्यायी व्हेंडिंग मशिन्स बसवण्यास सुरुवात केली आहे.
ही व्हेंडिंग मशिन्स महिलांच्या स्वच्छतागृहाबाहेर रणनीतीपूर्वक बसवण्यात आल्या असून, महिला प्रवाशांना सहज, गोपनीय आणि सन्मानपूर्वक आवश्यक स्वच्छता उत्पादने उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या मशिन्समधून विविध मासिक पाळी व स्वच्छता उत्पादने अल्प दरात उपलब्ध होणार असून, दोन सॅनिटरी पॅड्सचा पॅक अवघ्या १० पासून मिळणार आहे.
हेही वाचा : PM Narendra Modi : 'मेड इन इंडिया, मेड फॉर द वर्ल्ड'; भारताला जागतिक एआय नेतृत्व बनवण्यासाठी मोदींचा मूलमंत्र
या उपक्रमाबाबत मुंबई मेट्रो वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्यामंतक चौधरी म्हणाले, “आमच्यासाठी प्रवाशांचा आराम आणि सोय हे सर्वोच्च प्राधान्य आहे. महिलांची मोठी प्रवासी संख्या लक्षात घेता, त्यांच्या गरजांचा मेट्रो अनुभवात समावेश करणे आवश्यक आहे. सिरोनाच्या व्हेंडिंग मशिन्समुळे महिलांना आवश्यक स्वच्छता उत्पादने सहज आणि गोपनीयतेने मिळतील.”
२०१५ साली स्थापन झालेली सिरोना ही पुरस्कारप्राप्त भारतीय फेमटेक कंपनी असून, मासिक पाळी व महिलांच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर जागरूकता, नावीन्य आणि सुलभतेसाठी ओळखली जाते. या उपक्रमातून मासिक पाळीबाबतचा संकोच कमी करणे, महिला प्रवाशांची गैरसोय टाळणे आणि सार्वजनिक वाहतुकीत लिंग-संवेदनशील पायाभूत सुविधांचे नवे मानक निर्माण करणे, हा मुंबई मेट्रो वनचा उद्देश आहे.