माणिक वर्मा फाउंडेशनच्या माध्यमातून संगीत स्पर्धेचे आयोजन

09 Jan 2026 17:59:56

 
मुंबई : ( Manik Varma ) माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माणिक वर्मा फाउंडेशन' आणि 'शुभश्री संयुक्त विद्यमान लोकप्रिय गायिका माणिक वर्मा यांनी सादर केलेल्या विविध गीत प्रकारांच्या कार्यक्रमांची अभिनव संगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा रुढार्थाने प्रचलित असलेल्या संगीत स्पर्धांसारखी वैयक्तिक स्वरूपाची नसून माणिक ताईच्या बहुरंगी संगीत प्रतिभेची रसिकांना ओळख करून देणाऱ्या सुविहित कार्यक्रमांची स्पर्धा आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, नाशिक, बोरिवली, ठाणे येथील संघ समूह ह्या स्पर्धेत सहभागी होणार असून,त्यांना प्रत्येकी ४५ मिनिटांचा निवेदनासहित कार्यक्रम सादर करावयाचा आहे. यामाध्यमातून माणिक ताईनी भावगीतांपासून रागदारी संगीतापर्यंत सादर केलेल्या विविध गीतप्रकारांची आजच्या तरूण पिढीला ओळख होईल.
 
हेही वाचा : Oxford University Press : वादांच्या वादळानंतर ऑक्सफर्डचा माफीनामा!
 
या स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ ठरणाऱ्या गटाला रु. २१०००/ चे प्रथम पारितोषिक तर द्वितीय क्रमांक गटाला रु. १५०००/- चे पारितोषिक देण्यात येईल. याखेरीज प्रत्येक गटामधील एका सर्वोत्तम गायिकेला वैयक्तिक पारितोषिक देण्यात येईल. स्पर्धेनंतर लगेचच निर्णय जाहीर करून सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर, प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते आणि गायक-संगीतकार अवधुत गुप्ते या मान्यवरांच्या हस्ते ही पारितोषिके प्रदान करण्यात येतील.स्पर्धेचे परिक्षण विदुषी श्रीमती श्रुती सडोलीकर-काटकर, कवी आणि संगीतकार श्री. मिलिंद जोशी, 'शुभश्रीचे श्रीकांत दादरकर आणि माणिक वर्मा फाउंडेशनच्या राणी वर्मा करतील.रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १.३० ते रात्री ८.३० या वेळांत दादर माटुंगा कल्चरल सेंटर' येथे ही स्पर्धा आयोजित केली आहे.


Powered By Sangraha 9.0