बहुभाषिकतेचा प्रज्वलित दीपक!

09 Jan 2026 10:55:18
Deepak Paage
 
एका छोट्याशा गावातून सुरु झालेला दीपक पागे यांचा प्रवास आज कित्येक आंतरराष्ट्रीय भाषा अस्खलित बोलण्यापर्यंत पोहोचला आहे. अशा या बहुभाषिक व्यक्तिमत्त्वाविषयी...
 
एखादा मराठी माणूस मायबोली मराठीसह गीर्वाणवाणी संस्कृत, भारतात व्यापक प्रमाणावर बोलली जाणारी हिंदी, आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘संवादसेतू’ म्हणून वापरली जाणारी इंग्रजी आणि एका साध्या होकारासाठी ‘उई’, ‘उई’, ‘उई’ अशा लडिवाळ शब्दांची आतषबाजी करणारी फ्रेंच अशा स्थानिक, राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध भाषा अगदी अस्खलित बोलत असेल, तर आपल्याला आश्चर्य अन् आनंद वाटेल. पण, ती व्यक्ती एका छोट्या गावातून या टप्प्यावर येऊन पोहोचली असून, मराठी तरुणाईला बहुभाषिक करण्याचा ध्यास घेऊन कार्यरत आहे, हे कळल्यानंतर निश्चितच आपला ऊर अभिमानाने भरून येईल.
 
दि. २२ ऑगस्ट १९७५ रोजी एका मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबात जन्मलेल्या दीपक गंगाधर पागे यांनी आपले प्राथमिक शिक्षण सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते या छोट्याशा गावात पूर्ण केले. ऐतिहासिक काळात शहाजीराजे भोसले यांची जहागिरी असलेल्या, मोरेश्वर रामचंद्र पराडकर ऊर्फ मोरोपंत यांच्या पंडिती काव्याचे उगमस्थान असलेल्या आणि आधुनिक कृषितंत्राने प्रगत झालेल्या बारामती शहरातील ‘विद्या प्रतिष्ठान’ या नामांकित शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातून दीपक पागे यांनी विज्ञान शाखेतील ‘रसायनशास्त्र’ या विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर ‘पूर्वेकडील ऑसफर्ड’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्यनगरी अर्थात, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी ‘पेंट टेक्नोलॉजी’ या विषयात प्रावीण्य मिळविले. मराठी तरुण हा नेहमी नोकरीचा सुरक्षित पर्याय निवडतो. पण, दीपक पागे यांनी छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली ती आपल्या स्वतःच्या व्यवसायाला अनुभवांचे भक्कम अधिष्ठान लाभावे, याच दृढ मानसिकतेतूनच.
 
दरम्यानच्या काळात दीपक पागे यांचा विवाह झाला आणि प्रपंचातील पत्नीचा पायगुण त्यांना लाभदायक ठरला. त्याचे फलित म्हणजे, नेदरलॅण्ड्समध्ये त्यांना नोकरीची संधी मिळाली. त्याकाळात त्यांनी संपूर्ण युरोप भ्रमण केले आणि परदेशात वावरताना ‘फॉरिन लॅग्वेज’ अर्थात, विदेशी भाषा बोलता येणे किती गरजेचे आहे, ही जाणीव तीव्रतेने त्यांच्या लक्षात आली. खरे म्हणजे, विदेशातल्या नोकरीत चांगले बस्तान बसले होते. पण, आपला स्वतःचा व्यवसाय हवा, ही ऊर्मी अंतर्यामी उफाळून येत होती. नेमकी त्याचवेळेस कौटुंबिक जबाबदारीमुळे भारतात परत यावे लागेल, अशी तातडीची परिस्थिती निर्माण झाली. त्यालाच इष्टापत्ती मानून दीपक यांनी भारतात आल्यावर ‘माएल इंडिया’ ही सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. कंपनीचे कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी त्यांनी फ्रेंच भाषा शिकून घेतली.
 
त्याकाळात भारतात मुक्त अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले होते. जागतिकीकरण आणि माध्यमक्रांती यामुळे संपूर्ण जग हे एक प्रचंड मोठे खेडे झाले आहे, असे म्हटले जाऊ लागले. या पार्श्वभूमीवर दीपक पागे यांच्यासारख्या संवेदनशील आणि चाणाक्ष व्यावसायिक व्यक्तीच्या मनात प्रामुख्याने विदेशी भाषा अन् बहुभाषिकतेचा दीपक चेतू लागला. कारण, विदेशात असताना परकीय भाषेवरील प्रभुत्व ही व्यक्तिमत्त्वातील अत्यंत महत्त्वाची बाब असते, हे त्यांच्या लक्षात आले होते. परकीय भाषांची वाढती मागणी आणि त्या तुलनेत अतिशय कमी प्रमाणात असलेले परकीय भाषाशिक्षक, तसेच भाषातज्ज्ञ यांची अत्यंत तुटपुंजी उपलब्धता यांतून २०१७ मध्ये दीपक पागे यांनी जर्मन भाषातज्ज्ञ प्रीती गायतोंडे यांच्यासोबत ‘भाषा अ‍ॅकेडमी’ या संस्थेची स्थापना केली.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर विदेशी भाषा अस्खलित उच्चार अन् भाषिक लहेजा सांभाळून बोलता यावी, हे अ‍ॅकेडमीचे मूळ उद्दिष्ट असल्याने त्याबरहुकूम अभ्यासक्रमाची आखणी करून व्यक्ती किंवा समूहाला प्रशिक्षित करण्यात यावे, अशा कार्यपद्धतीची मांडणी केली. ‘भाषेची प्रत्येक सेवा’ हे ब्रीद घेऊन सुरू करण्यात आलेली ही भाषा अ‍ॅकेडमी अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झाली. कारण, अतिशय कमी फी आणि जागतिक दर्जाचे शिक्षण यामुळे विविध शाळांमधून आणि व्यक्तिगत पातळीवर विद्यार्थिसंख्या सातत्याने वाढू लागली. साहजिकच, अ‍ॅकेडमीची व्याप्तीदेखील विस्तारली. जर्मन, फ्रेंच, मँडेरिन, जपानी, कोरियन, रशियन, इंंग्रजी, पोर्तुगीज, इटालियन, डच या दहा भाषांसाठी पन्नासहून अधिक निष्णात अध्यापक अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य करीत असून, सध्या २०हून अधिक शाळांमधील सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी विदेशी भाषांचे शिक्षण घेत आहेत.
 
अ‍ॅकेडमी स्थापन केल्यापासून आजतागायत दहावीचे विद्यार्थी १०० टक्के उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी काही विद्यार्थी जर्मनी आणि जपानमध्ये नोकरी करीत आहेत. याचबरोबर १२हून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांसोबत अ‍ॅकेडमी भाषा प्रशिक्षण आणि भाषांतरसेवेचे काम करीत आहे. सध्या पुणे, मुंबई, बीड आणि कोल्हापूर या शहरांमध्ये भाषा अ‍ॅकेडमी कार्यरत आहे. दीपक पागे एवढ्या विस्तारावर समाधानी नाहीत; तर अन्य शहरांबरोबरच इतर राज्यांमध्येही त्यांना सहयोगी संस्थांच्या सहकार्यातून भाषा अ‍ॅकेडमीचा विस्तार करायचा आहे. दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी अमेरिकास्थित संस्थेकडून परीक्षण करून भाषा अ‍ॅकेडमीला ’आयएसओ ९००१ : २०१५’ हे प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
 
सद्यस्थितीत जागतिक पातळीवर तरुणांची सर्वात जास्त संख्या असलेला देश म्हणून भारताचा गौरवाने उल्लेख केला जातो; परंतु मुबलक मनुष्यबळ आणि तुरळक रोजगार अशा दुष्टचक्राचा सामना देश करीत आहे. या पार्श्वभूमीवर बहुभाषिकता हा आशेचा किरण आहे. पूर्वीच्या काळात साहित्य अभिव्यक्ती एवढ्यापुरतेच भाषेचे मर्यादित महत्त्व होते; परंतु जर्मनी, जपान, रशिया, ऑस्ट्रिया इत्यादी अनेक देशांमध्ये लाखोंच्या संख्येत रोजगार उपलब्ध आहेत. आपल्या देशातील प्रचंड मनुष्यबळ विदेशी भाषांमध्ये पारंगत केले, तर त्यांना विविध क्षेत्रांत रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी संबंधित तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषा पारंगत असल्याचे प्रमाणपत्र मिळवावे लागते अन् नेमके हेच कार्य भाषा अ‍ॅकेडमी करते आहे.
 
जेवढे जास्त नोकरदार परदेशात जातील, तेवढा जास्त प्रमाणात परकीय चलनसाठा भारताला मिळेल. परदेशात जाणार्‍या भारतीय कुटुंबाची आर्थिक परिस्थिती उन्नत होईलच; पण त्याचबरोबर जागतिक पातळीवरील अग्रक्रमाकडे वेगाने आगेकूच करणारी अर्थव्यवस्था हा लौकिक प्राप्त करण्यात आपल्या देशाला निश्चितच मदत होईल. सुमारे ७३ भाषांवर प्रभुत्व मिळवलेला बोस्नियामधील मुहम्मद मेसिक हा सध्या जगातील अग्रस्थानी असलेला ‘बहुभाषाकोविद’ म्हणून सुप्रसिद्ध आहे. दीपक पागे यांनी भाषा अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून प्रज्वलित केलेल्या या ज्ञानयज्ञातून भावी काळात मराठीतला एखादा तरुण ‘बहुभाषाकोविद’ म्हणून नावारूपास यावा, हीच त्यांच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
 
- अतुल तांदळीकर
 
 
 
Powered By Sangraha 9.0