सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ : सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ

07 Jan 2026 12:35:25
Savitribai Phule Women’s Ekattma Samaj Mandal
 
‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’ संस्थेच्यावतीने दरवर्षी थोर समाजसेवक डॉ. भीमराव गस्ती आणि दीर्घकाळ वैद्यकीय सेवा करणार्‍या भारतातील पहिल्या महिला डॉ. रखमाबाई राऊत यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाचा पुरस्कार फरीदा गुरू व केशव गावित यांना प्राप्त झाला. दि. ४ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर इथे हा सन्मान सोहळा पार पडला. त्यानिमित्ताने या संस्थेच्या कार्याचा, तसेच संस्थेतर्फे दिल्या जाणार्‍या पुरस्काराचा घेतलेला मागोवा...
 
पुरस्कारप्राप्त फरीदा गुरू व केशव गावित यांच्यासारखे लोक ध्येयवेडे होऊन काम करत आहेत, त्यामुळे आपला देश ‘भारत’ म्हणून टिकून आहे. अशी मंडळी जेव्हा समाजसेवा सुरू करतात, तेव्हा लोक प्रतिकूल प्रतिक्रिया देतात, अवहेलना करतात. परंतु, वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. ‘ध्येयवेडी मंडळीच इतिहास घडवतात,’ असे प्रतिपादन ‘राष्ट्रीय सेवा भारती’चे सहसंघटनमंत्री विजयराव पुराणिक यांनी केले. ते ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’तर्फे आयोजित डॉ. रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार व डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटनप्रमुख वक्ते विजयराव पुराणिक (सहसंघटनमंत्री, राष्ट्रीय सेवा भारती, भोपाल) यांच्या प्रेरणादायी विचारांनी झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निखिल खिंवसरा (सुप्रसिद्ध उद्योजक, छत्रपती संभाजीनगर) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश कुलकर्णी (अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैचारिक प्रतिष्ठान) होते, तर कार्यक्रमाचे आयोजन ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’च्या अध्यक्षा अ‍ॅड. प्रियंका बेहरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच व्यासपीठावर श्रीराम धसे उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय उकलगावकर यांनी केले. प्रथमेश महाजन यांनी वैयक्तिक गीत गायले आणि नैना खर्डे व अपर्णा वैद्य यांनी पसायदान म्हटले.
  
सावित्रीबाई फुलेमहिला एकात्म समाज मंडळ
 
‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’ ही संस्था छत्रपती संभाजीनगरस्थित महाराष्ट्रातील अग्रगण्य सेवाभावी संस्था आहे. ‘मातृशक्ती-राष्ट्रशक्ती’ हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून केवळ आरोग्यसेवेपुरते मर्यादित न राहता, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था कटिबद्ध आहे. आज महाराष्ट्र राज्यातील १३ जिल्ह्यांत, ९५० गावांमध्ये आणि ८० हून अधिक शहरी वस्त्यांमध्ये संस्थेचे ८४ पेक्षा जास्त प्रकल्प अविरतपणे सुरू आहेत. संस्थेचे मुख्य लक्ष आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि जलसंधारण व शाश्वत विकास या सहा प्रमुख क्षेत्रांवर आहे.
 
शहरी भागातील आरोग्यकेंद्रासारख्या उपक्रमांतून लाखो रुग्णांना केवळ दहा रुपयांत दर्जेदार उपचार दिले जातात, तर ग्रामीण भागात ‘संजीवनी’ प्रकल्पाद्वारे कुपोषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करण्यात संस्थेला यश आले आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात ‘ओंकार बालवाडी’ आणि विशेष मुलांसाठीची ‘विहंगशाळा’ हे प्रकल्प संवेदनशील समाज घटकांना आधार देत आहेत. ‘तेजस्विनी’ आणि ‘किशोरीविकास’ प्रकल्पांतर्गत हजारो महिला आणि मुलींना संघटित करून त्यांना स्वावलंबी बनवले जात आहे. कौशल्यविकासाच्या माध्यमातून दरवर्षी हजारो युवक-युवतींना रोजगारक्षम प्रशिक्षण दिले जाते, तर दुसरीकडे १६ हजारांहून अधिक शेतकर्‍यांना सोबत घेऊन जलसंधारण आणि कृषी-विस्तार उपक्रमाद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली जात आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेली ही संस्था आज खर्‍या अर्थाने समाजासोबत राहून समाजासाठी काम करणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते.
 
‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’ संस्थेच्यावतीने दरवर्षी थोर समाजसेवक भटक्या विमुक्त समाज आणि देवदासींच्या पुनरुथानासाठी आपले जीवन खर्ची घालणारे डॉ. भीमराव गस्ती यांच्या नावाने प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यास डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार, तर दीर्घकाळ वैद्यकीय सेवा देणार्‍या भारतातील पहिल्या महिला डॉ. रखमाबाई राऊत यांच्या नावाने सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यास डॉ. रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार असे दोन पुरस्कार देण्यात येतात.
 
कर्तव्यतत्पर आणि सामाजिक बांधिलकी जपणार्‍या सेवादूतांचा सन्मान या समारंभाचे मुख्य वक्ते, ‘राष्ट्रीय सेवा भारती’चे संयुक्त महामंत्री विजयराव पुराणिक यांनी सेवाकार्य आणि समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वाहिलेल्या केशव गावित आणि फरीदा ‘गुरुमाय’ यांचा गौरव केला. या दोन्ही सत्कारमूर्तींचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ असल्याचेही त्यांनी म्हटले, तर सत्कारमूर्ती केशव गावित यांनी सांगितले की, "माझं पुण्य आहे की मला शिक्षकाचे काम करायला मिळते. १२ तास आनंददायी शिक्षणासाठी आमची शाळा प्रयत्न करते. या पुरस्काराने मी भारावून गेलो आहे.” या आगळ्या-वेगळ्या सन्मान सोहळ्यात फरीदा ‘गुरुमाय’ यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना "पुरस्काराने जबाबदारी वाढली,” असे सांगितले. याच कार्यक्रमात ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’च्या कार्यावर आधारित ‘बदलांचे पायरव’ या सुहास वैद्य यांनी लिहिलेल्या आणि ‘विवेक प्रकाशन, मुंबई’ यांच्यातर्फे पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी संभाजीनगरातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक नागरिक उपस्थित होते.
 
वर्ष             डॉ. रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार           डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार
 
2019                       मिनाक्षी निकम                                             मिलिंद थत्ते
2020                       डॉ. दिलीप पुंडे                                             दुर्गा राजेंद्र गावीत
2021                       मयुरी राजहंस                                              पार्वती दत्ता
2022                       दीपा पाटील                                                 ज्योती पठानिया
2023                       श्रीलेखा वझे                                                  रविंद्र गोळे
2024                      डॉ. राजेश पवार                                             योगिता साळवी
2025                      नरेंद्र पाटील                                                   हभप राधाताई सानप
 
 

उपेक्षितांना स्वावलंबन आणि सन्मानाचा मार्ग दाखवणार्‍या फरीदा गुरू

यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरी येथे जन्मलेल्या फरीदा शहा नुरबकश उर्फ गुरुमाय यांचे बालपण संघर्षमय गेले. १२व्या वर्षी किन्नर समुदायात प्रवेश करून मुंबई-हैदराबाद भटकत २०१७ मध्ये नांदेड जिल्ह्यातील जिगळागावात आल्या. हिंसा, धमक्या सहन करत ३० लाख खर्चून आश्रम बांधला. ३० तृतीयपंथी इथे निर्भयपणे वावरतात. गावकर्‍यांचे गैरसमज मिटवत मंदिरबांधणीसाठी मदत, नवरात्र-गणेशोत्सव, गावातून पंढरपूरवारी सुरू केली. सुख-दुःखात साथ देत सौहार्द निर्माण केले. पशुपालन, दूधविक्री, कुत्रे ब्रीडिंग, ग्राहकसेवाकेंद्र सुरू केले. स्मशानभूमीमध्ये जागा मिळवली. ‘कमल फाऊंडेशन’ व ‘किन्नर विकास परिषदे’द्वारे अपंग तसेच ‘एचआयव्ही’ संक्रमणाने ग्रस्त रुग्णांसाठी मदतकार्य उभारले. पालक समुपदेशनाने बालकांना घरात सन्मान मिळवून दिला. इतकेच नाही, तर त्यांच्या १५० शिष्यांना त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग शिकवला.

आधुनिक शाळेचे शिल्पकार केशव गावित

शेतमजुराच्या घरी जन्मलेले केशव गावित. दि. १२ जानेवारी २००९ रोजी हिवाळी या त्र्यंबकेश्वर येथील अत्यंत दुर्गम गावी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. ३६५ दिवस सकाळी ९ ते रात्री ९ शाळा चालवत मराठी व्याकरण, इंग्रजी स्पिकिंग, स्पर्धा-परीक्षा, पाढे (बालवाडी मुलांना ३०, मोठ्यांना १ हजार, १००), दोन्ही हातांनी मराठी-इंग्रजीलेखन, संविधान कलमे शिकवली. ‘कोरोना’ काळात टेकडीवर, पावसाळ्यात घरांत शाळा सुरू ठेवली. गोपालन, परसबाग, औषधी वनस्पती उद्यान, रुबिक क्युब, डुलकी कक्ष असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. रमेश अय्यर, तुकाराम पवार, हरी भुसारे यांच्या मदतीने आधुनिक शाळा बांधली. आता ही शाळा आणि हे शिक्षक समाजासाठी आदर्श बनले आहेत.

 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0