मुंबई : (Oxford University Press) ब्रिटीश लेखक जेम्स लेनच्या ' शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकामध्ये आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी, प्रकाशक असलेल्या ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटीने छत्रपती शिवाजी महारजांचे १३ वे वंशज खा. उदयनराजे भोसले आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे. एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या सार्वजनिक जाहीर सुचनेत ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटी प्रेस इंडियाने कबूल केले आहे की २००३ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकातील पान क्र. ३१, ३३, ३४, आणि ९३ वरील काही मजकूर पडताळणी न केलेला होता. प्रकाशनाने याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
या संदर्भात उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्ट लिहीत माहिती दिली. यात ते म्हणाले "या पुस्तकातील काही परिच्छेद व उतारे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा मलिन करणारे आणि अपमानास्पद होते. या विरोधात सातारा येथील माननीय मुख्य न्यायाधीश दंडाधिकारी समोर फौजदारी केस क्र. 3230 /2004 ही खासगी तक्रार दाखल केली होती." या कोर्टाच्या आदेशानंतर आरोपी सैयद मंझर खान जे OUP चे संपादक होते, तसेच डॉ. श्रीकांत बहुळेकर, सुचेता परांजपे आणि व्ही एल मंजूळ या चौघांनी रिट याचिका दाखल केली. तसंच तक्रारदार म्हणजे उदयनराजे भोसलेंची माफी मागण्याचीही तयारी दाखवली. १७ डिसेंबरला कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशांनंतर ६ जानेवारीला मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये ही माफी प्रकाशित करण्यात आली.