Stray Dog Verdict : “इतके अर्ज तर माणसांसाठीही येत नाहीत…”, भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

07 Jan 2026 16:17:38


Stray Dog Verdict

नवी दिल्ली : (Stray Dog Verdict) भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात मंगळवारी ६ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने दाखल झालेल्या अंतरिम अर्जांची दखल घेतली. यावेळी “माणसांशी संबंधित प्रकरणांमध्येही इतक्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल होत नाहीत,” अशी स्पष्ट टिप्पणी न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने केली.

कोणता कुत्रा कधी चावण्याच्या मनस्थितीत असेल याचा अंदाज बांधणे शक्य नाही

सुनावणीदरम्यान दोन वकिलांनी भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करताना या प्रकरणाशी संबंधित नव्या अर्जांचा उल्लेख केल्यानंतर न्यायालयाने असे म्हटले होते. याप्रकरणी बुधवारी ७ जानेवारीला पुन्हा सुनावणी पार पडली. 'कोणता कुत्रा कधी चावण्याच्या मनस्थितीत असेल याचा अंदाज बांधणे शक्य नाही. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला', अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने यावेळी परखड मत व्यक्त केले. तसेच शाळा, हॉस्पिटल किंवा न्यायालयात भटके कुत्रे का आहेत? अशा संवेदनशील परिसरातून त्यांना बाहेर काढण्यासाठी काय आक्षेप आहे, असाही सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला.

प्राणीमित्रांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या युक्तिवादावर न्यायालयाने मिश्किल प्रतिक्रिया देत, भटक्या कुत्र्यांमुळे चावण्यासह अपघातांचाही धोका असल्याचे अधोरेखित केले आणि रस्त्यांवरून भटके कुत्रे हटवणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
 
 
Powered By Sangraha 9.0