मुंबईचं अस्तित्व राखण्यासाठी मुंबई ठाकरेंच्या हातात शोभून दिसते,” असे नुकतेच विधान केले, ते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी. खरेतर जरांगे आणि मुंबईचा तसा दुरान्वयाने संबंध नाहीच. गेल्यावर्षी काय तो याच जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबईत हैदोस घातला होता, तेवढ्यापुरतीच यांची मुंबईची समज आणि मजल. त्यातच ‘मुंबईचे अस्तित्व’ राखण्याची जबाबदारी ही सर्वस्वी मुंबईकरांचीच! त्यामुळे मुंबईचे अस्तित्व कुणा घराण्याच्या हातात नव्हे, तर ते मुंबईकरांच्या प्रश्नांना-समस्यांना वाचा फोडणार्या पक्षाच्या, नेतृत्वाच्या हातातच शोभून दिसेल, हे जरांगेंनी लक्षात घ्यावे.
मुळात जरांगेंनी ते मराठा समाजासाठीच्या आरक्षणाचे आंदोलक आहेत की, मराठा आरक्षणाच्या आड राजकीय डावपेच खेळणारे राजकारणी, हे एकदाचे ठरवून टाकावे. कारण, त्यांचे आंदोलन हे ‘सिझनल’ आणि राजकारण मात्र ‘ऑल सीझन’ असेच काहीसे चित्र महाराष्ट्रात अलीकडच्या काळात उभे राहिलेले दिसते. त्यातच जरांगेंचा एक गैरसमज असा की, त्यांच्या राजकीय मतानुसार मराठा समाजही मतदान करतो. पण, २०२४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने घवघवीत असा विजय मिळवून जरांगेंच्या या समजालाही सुरुंग लावला. त्यामुळे जरांगेंनी समाजासाठी जरूर बोलावे, जरूर झगडावे; पण आपल्या राजकीय हेवेदाव्यांसाठी मराठा समाजाला गृहीत आणि वेठीस अजिबात धरू नये. कारण, हा समाज, समाजबांधव सुज्ञ आहेत. त्यामुळे कुठल्या पक्षाच्या पाठीशी उभे राहायचे, समाज म्हणून आपले भले नेमक्या कोणत्या पक्षाने आजवर केले, कोणता पक्ष भविष्यातही आपल्या पाठीशी उभा राहू शकतो, याचे भान समाजाला आहेच. त्यामुळे जरांगेंनी ‘लष्कराच्या भाकर्या भाजण्या’च्या नसत्या फंद्यात न पडलेलेच बरे! त्यात अशी विधाने करून ज्या ठाकरेंचा पुळका जरांगेंना आज येतोय, त्या ठाकरेंनी मराठा आरक्षणासाठी काय केले होते, त्याचे उत्तर द्यावे. तसेच फडणवीसांनी दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना न्यायालयात टिकवता आले नव्हते, याचाही जरांगेंना सपशेल विसर पडलेला दिसतो. असो. जरांगेंना ठाकरेंच्या प्रेमाचे भरते आले असले, तरी याच ठाकरेंनी मात्र जरांगेंना त्यांची जागा दाखवून दिली होतीच.
कलुषित मने
मनोज जरांगे पाटलांनी ‘मुंबईचे अस्तित्व राखण्यासाठी ती ठाकरेंच्या हाती शोभून दिसते,’ असे म्हणणे म्हणजे मुंबईचे एकप्रकारे वस्तुकरण किंवा व्यापारीकरण करण्यासारखेच. मुंबई ही वस्तू नाही, मुंबई ही खासगी मालमत्ता नाही किंवा मुंबई हे कुठले खेळणे तर अजिबात नाही, जे कुणाच्या हातात शोभून दिसावे. यावरून ठाकरेंप्रमाणेच जरांगेंचाही मुंबईकडे पाहण्याचा संकुचित दृष्टिकोनच अधोरेखित व्हावा. पण, कदाचित जरांगेंना मराठा आंदोलनाच्या वेळी ठाकरेंनी त्यांच्याविषयी आणि त्यांनी ठाकरेंविषयी नोंदवलेल्या प्रतिक्रियांचा विसर पडलेला दिसतो. यानिमित्ताने का होईना, ज्या ठाकरे बंधूंचा जरांगे आज ‘उदो-उदो’ करीत आहेत, त्यांना याच ठाकरेंनी त्यांची वेळोवेळी जागा दाखवून दिली होती. एवढेच नाही, तर जरांगेंनीही ठाकरेंवर आगपाखड केली होती. पण, आज तेच ठाकरे मुंबईचे अस्तित्व राखून ठेवू शकतात; याचा विश्वास जरागेंना वाटावा, याचेच सखेद आश्चर्य वाटावे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर महाराष्ट्राला आरक्षणाची आवश्यकताच नाही, असे मागे विधान केले होते. त्यावर जरांगेंचाही चांगलाच जळफळाट झाला होता. त्यावेळी जरांगेंनी राज ठाकरेंना ‘चिल्लर’, ‘मानाला भुकलेलं पोरगं’ म्हणत ‘यांच्या तोंडासमोरही उभे राहायचे नाही,’ अशी विधाने केली होती. एवढेच नाही, तर ‘श्रीमंत राजकारण्यांना गरीब मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न कळणार नाही,’ अशीही टीका याच जरांगेंनी ठाकरेंना उद्देशून केली होती. पण, आज तेच जरांगे ‘ठाकरे मुंबईचे अस्तित्व राखू शकतात,’ ‘मुंबई त्यांच्याच हातात शोभून दिसेल,’ अशी वक्तव्ये बेधडकपणे करीत सुटले आहेत. यावरून जरांगे पाटलांचे खायचे आणि दाखवायचे दात कसे वेगळे आहेत, हेच जनतेसमोरही आले. असो. जरांगेंच्या म्हणण्यानुसार, मराठा समाज आपला मतदानाचा हक्क बजावीत नाही हे विधानसभा, नगरपालिका निवडणुकांमधून स्पष्ट झाले आहेच. हीच बाब महानगरपालिका निवडणुकांच्याही निमित्ताने पुनश्च अधोरेखित होईलच. तेव्हा जरांगेंनी या नसत्या राजकारणात न पडता, समाजकारणाकडेच लक्ष द्यावे. मुंबईकर त्यांचे लोकप्रतिनिधित्व सक्षम पक्षाकडे देण्यासाठी समर्थ आहेत. त्यामुळे ‘आंतरवाली’वरून कांदिवली-बोरिवलीतील राजकारणावर जरांगेंनी न बोललेलेच बरे!