प्रगल्भ हो रे मना...

06 Jan 2026 12:22:07

Emotional Maturity

 

प्रगल्भता म्हणजे नेमके काय, असा कोणी प्रश्न विचारला तर क्षणभर आपणही विचारात पडू. विशेषकरुन भांडणांच्या, मतभेदांच्या प्रसंगी तर ही प्रगल्भता दाखवायची म्हणजे केवळ गप्प बसणे का? तेव्हा नेमकी ही भावनिक प्रगल्भता कशी विकसित करायची? याचा कानोसा घेणारा हा लेख...

कोणी तुमची चेष्टा केली, टोमणा मारला किंवा उपरोध केला, तर त्याचा तुमच्यावर किती परिणाम होईल, याचे नियंत्रण खरं तर तुमच्याच हातात असते. तुम्ही त्या गोष्टीला किती महत्त्व देणार आहात किंवा शांतपणे सोडून देणार आहात, यावरच सगळे अवलंबून असते. एखादी व्यक्ती सतत इतरांची खिल्ली उडवत असेल किंवा टोमणे मारत असेल, तर ते समोरच्याच्या कमतरतेपेक्षा स्वतःच्या आतल्या असुरक्षिततेचे अधिक स्पष्ट द्योतक असते. जिथे त्यांचा आत्मविश्वास कमी असतो, तिथे टोमणे हे संरक्षणाचे शस्त्र बनतात. इतरांना कमी लेखून स्वतःला मोठे दाखवण्याचा हा एक मानसिक बचावमार्ग अनेक वापरतात. खरा आत्मविश्वास कधीच दुसर्‍याला कमी लेखत नाही; ही प्रवृत्ती न्यूनगंडातून जन्माला येते. जेव्हा आपल्यात पुरेसा आत्मविश्वास आणि आत्मस्वीकृती असते, तेव्हा अशा चेष्टेची नकारात्मक धार आपोआप बोथट होते. तेव्हा इतरांचे शब्द आपल्याला हादरवू शकत नाहीत. तेव्हा टोमणे बोचत नाहीत. ते फक्त एका कानातून शिरून दुसर्‍या कानातून निघून जातात.

अहंकाराच्या लढाया जिंकून मन शांत होत नाही; उलट, तणाव वाढतो. परंतु, जेव्हा आपण अपेक्षा सैल करतो, तुलना थांबवतो आणि बदलता न येणार्‍या गोष्टींवरचे नियंत्रण सोडतो, तेव्हा मनावरचा ताण आपोआप हलका होतो. हे ‘सोडून देणे’ कमजोरीचे लक्षण नसून, ती भावनिक परिपक्वतेची ओळख असते. प्रगल्भता म्हणजे प्रत्येक वेळी जिंकण्याचा आग्रह धरू नये, हे समजणे. कुठे प्रतिक्रिया द्यावी आणि कुठे शांतपणे दोन पाऊले मागे जावे, हे ओळखण्याची क्षमता म्हणजे प्रगल्भता. समोरच्याचे वर्तन वैयक्तिक पातळीवर न घेता, त्यामागील मर्यादा, असुरक्षितता किंवा परिस्थिती समजून घेणे यातूनच मानसिक स्थैर्य निर्माण होते. प्रगल्भतेचे खरे लक्षण म्हणजे, आपला मुद्दा सिद्ध करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपले भविष्य घडवण्यासाठी शांतपणे मेहनत करण्याची तयारी.

मानवी मेंदू जगाकडे पाहताना नैसर्गिकरित्या अनेक कथा रचतो. आपण आपल्या भविष्यासंबंधी नकळत गोष्टी, चित्रे आणि अपेक्षा तयार करत असतो. स्वप्ने पाहणे, इच्छा बाळगणे आणि उद्दिष्टे ठेवणे हे महत्त्वाचेच आहे. मात्र, वस्तुस्थिती अनेकदा आपण मनात रंगवलेल्या कथेशी जुळत नाही. जेव्हा आपण एखाद्या अपेक्षित स्वप्नांशी किंवा महत्त्वाकांक्षेशी अतिशय घट्ट जोडले जातो आणि तशी निष्पत्ती प्रत्यक्षात घडत नाही, तेव्हा चिंता, नैराश्य आणि अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता वाढते.

खरी प्रगल्भता त्यावरून सिद्ध होते, की तुम्ही संकटाच्या काळात स्वतःला कसे हाताळता. बदलता न येणार्‍या वास्तवाशी संघर्ष न करता त्याच्याशी शांततेने जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे प्रगल्भता. हीच समज आपल्याला तणावापासून वाचवते. प्रगल्भतेचे असे काही पैलू आहेत, जे तणावावर मात करण्यासाठी ‘सुपरपॉवर’ ठरतात -

अनेकदा एका छोट्याशा नकारात्मक विचारामुळे संपूर्ण दिवस अस्वस्थतेत जातो. अस्वस्थतेच्या क्षणी लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थांबणे, समजून घेणे आणि शांत राहणे, हीच खरी प्रगल्भता. यामुळे छोट्या मतभेदांचे मोठ्या संघर्षात रूपांतर होत नाही. भावनिक तणावाचं एक मोठं कारण म्हणजे, सर्वांना खुश ठेवण्याच्या अट्टाहासापायी आपण अनेकदा स्वतःच्या मानसिक शांततेचा बळी देतो. प्रगल्भ व्यक्तीला स्वतःच्या मर्यादा स्पष्ट असतात. वेळ, ऊर्जा आणि भावना यांना मर्यादा घालणं, ही स्वार्थी वृत्ती नाही, यामुळे थकवा, चिडचिड आणि ‘बर्नआऊट’ टाळता येतो.

तणाव आल्यावर अनेकजण अति खाणे, सोशल मीडियात बुडून जाणे किंवा काम टाळणे अशा निसटून जाण्याच्या वाटांकडे वळतात. मात्र, प्रगल्भता आपल्याला संकटापासून दूर पळण्याऐवजी त्याच्या मुळाशी जाणे, प्रश्न समजून घेणे आणि उपाय शोधणे शिकवते. ही वृत्ती तणावाचा भार लक्षणीयरित्या कमी करते. प्रश्नाला सामोरं जाण्याचं धैर्य हेच मानसिक ताकदीचं लक्षण आहे. आयुष्यात अडथळे, अपयश आणि दुःख अपरिहार्य आहेत. मात्र, प्रगल्भता आपल्याला हे जाणवून देते की, कोणतीही वेदना कायमस्वरूपी नसते. चढ-उतार हा जीवनाचा भाग आहे, हे स्वीकारल्यावर संकटाची तीव्रता कमी होते आणि आपण अधिक खंबीरपणे पुढे जातो.

महान मानसशास्त्रज्ञ व्हिटर फ्रँकल म्हणतात त्याप्रमाणे एखादी घटना आणि त्यावर आपण दिलेली प्रतिक्रिया यामध्ये एक जागा (स्पेस) असते. या जागेला ओळखण्याची, तिथे स्थिरावून विचारपूर्वक प्रतिसाद देण्याची जी क्षमता आहे, तीच खरी प्रगल्भता होय. प्रतिक्रिया देण्याआधीचा तो क्षण, तोच आपली मानसिक नियंत्रणाची सीमा आणि निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याचे द्वार असते. भावनिक प्रगल्भता म्हणजे जीवन स्वतःच्या अटींवर स्वीकारण्याची आणि स्वतःशी अधिक समंजस होण्याची क्षमता विकसित होणे. जे लोक मोठ्या अपयश, नुकसान अथवा दुःखातून स्वतः थेट सामोरे गेले आहेत, तसेच ज्यांना आध्यात्मिक जाणिवांचा खोलवर स्पर्श झाला आहे, अशा व्यक्तींमध्ये भावनिक प्रगल्भता अधिक दिसून येते.

तणाव हा कदाचित बाह्य परिस्थितीचा भाग असेल, पण शांतता हा आपल्या दृष्टिकोनाचा परिणाम असतो. आपण प्रत्येक क्षणी प्रतिक्रिया द्यायची की प्रतिसाद द्यायचा, हा निर्णय आपल्या हातात असतो. प्रगल्भता म्हणजे गंभीर चेहरा करून आयुष्य सहन करणे नव्हे; तर संकटाच्या वादळातही आपल्या मनातील आशेचा दिवा विझू न देणे. बाह्य जग गोंधळलेले, स्पर्धात्मक किंवा कठीण असू शकते; पण अंतर्गत शांतता ही प्रगल्भ मनाची नैसर्गिक अवस्था असते.

वैयक्तिक तणावांवर मात करणे, हे केवळ कौशल्य नाही, ते प्रगल्भतेचे फलित आहे. जिथे प्रगल्भता असते, तिथे संघर्ष कमी होतात आणि जिथे संघर्ष कमी होतात, तिथे तणावालाही फारशी जागा उरत नाही. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, आपण काय निवडतो, घाई, भीती आणि संघर्ष की समज, संयम आणि संतुलन, यावरच आपल्या आयुष्याची गुणवत्ता ठरते.

- डॉ. शुभांगी पारकर

 
 
Powered By Sangraha 9.0