मुंबई : ( Siddhivinayak Temple ) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर पाच दिवसांकरिता दर्शनासाठी बंद असणार आहे. मंदिरातील मुख्य मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दि. ७ जानेवारी ते रविवार दि. ११ जानेवारी कालावधीत हे सिंदूर लेपन करण्यात येणार आहे, असे मंदिर न्यासाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.
या पाच दिवसांच्या कालावधीत मुख्य मूर्ती झाकलेली असल्यामुळे गाभाऱ्यातून होणारे प्रत्यक्ष दर्शन या काळात पूर्णपणे बंद राहील. मंदिराच्या प्राचीन परंपरेनुसार, ठराविक कालावधीनंतर मूर्तीचे पावित्र्य आणि संवर्धन जपण्यासाठी हा विधी पार पाडला जातो. मूर्तीला शेंदूर लावण्याचा हा विधी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पार पडणार आहे.
दिनांक ७ जानेवारीच्या पहाटेपासून या कामाला सुरुवात होऊन ११ जानेवारीच्या रात्रीपर्यंत ते पूर्ण होईल. १२ जानेवारी रोजी सकाळी श्रींच्या मूर्तीचा प्रोक्षणविधी, नैवेद्य आणि विशेष आरती करण्यात येईल. त्यानंतर दुपारी ठीक एक वाजल्यापासून भाविक नेहमीप्रमाणे बाप्पाच्या मुख्य मूर्तीचे मनोहर दर्शन घेऊ शकतील, अशी माहिती कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी दिली आहे.
'प्रतिमूर्तीचे’ दर्शन घेण्याची व्यवस्था
दूरवरून येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आणि गैरसोय लक्षात घेऊन मंदिर न्यासाने एक मध्य मार्ग काढला आहे. मुख्य मूर्तीचे दर्शन बंद असले, तरी मंदिराच्या आवारात गणपतीच्या ‘प्रतिमूर्तीचे’ दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भक्तांना आपला नवस किंवा श्रद्धा अर्पण करण्यासाठी प्रतिमूर्तीपुढे नतमस्तक होता येईल.