मुंबई : ( Mega Block on Western Railway ) मुंबईकरांच्या रेल्वे प्रवासात येत्या दोन दिवसांत मोठा अडथळा निर्माण होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली ते बोरिवली दरम्यान मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला असून, या कालावधीत तब्बल २१५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली–बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे काम वेगाने सुरू असून, त्यासाठी २० डिसेंबर ते १८ जानेवारी या कालावधीत टप्प्याटप्प्याने मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दि ६ जानेवारी रात्री ते बुधवारी दि. ७ जानेवारी पहाटेपर्यंत जलद मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. मंगळवारी अप जलद मार्गावर मध्यरात्री १२.०० ते बुधवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत, तर डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १.०० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक ठेवण्यात आला आहे. हा ब्लॉक जरी मध्यरात्रीचा असला, तरी त्याचा थेट परिणाम पहाटेच्या आणि सकाळच्या लोकल फेऱ्यांवर होणार आहे.
हेही वाचा : Ameet Satam : मुंबई महापालिकेत २५ वर्षांत देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार: आ. अमीत साटम
या मेगा ब्लॉकमुळे मंगळवारी ९३ तर बुधवारी १२२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, दोन दिवसांत एकूण २१५ फेऱ्या रद्द होणार आहेत. रद्द करण्यात आलेल्या फेऱ्यांमध्ये एसी लोकल तसेच १५ डब्यांच्या जलद लोकलचाही समावेश आहे. याशिवाय, या कालावधीत पाचव्या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.