भारताने तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकत जगात पहिला क्रमांक मिळविण्याचा भीमपराक्रम केला आहे. भारताचे हे यश कृषिक्षेत्रापुरतेच मर्यादित नाही, तर हा स्वातंत्र्योत्तर विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारत आज अन्नपुरवठ्यात निर्णायक भूमिका बजावतो आहे, हेही उल्लेखनीय असेच यश.
भारताने तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकत जगातील पहिला क्रमांक मिळवला, ही बातमी कृषिक्षेत्रापुरती मर्यादित नाही; तर हा भारताच्या स्वातंत्र्योत्तर विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. अन्नसुरक्षेच्या प्रश्नावरून आयातीवर अवलंबून असलेल्या देशाने आज जागतिक अन्नपुरवठ्यात निर्णायक भूमिका मिळवणे, हे दीर्घकालीन धोरणात्मक परिवर्तनाचे द्योतक आहे. या यशामागे शेतकर्यांचे श्रम आहेतच; पण त्याहून अधिक महत्त्वाची आहे ती धोरणांची सातत्यपूर्ण दिशा, संशोधनाची भक्कम बैठक आणि कृषी क्षेत्राकडे पाहण्याची बदललेली दृष्टी. स्वातंत्र्यानंतर भारताची शेती ही उपजीविकेपुरती मर्यादित होती. लोकसंख्या वाढत होती, उत्पादन मात्र अनिश्चित होते. दुष्काळ, अपुरा पाऊस, सिंचनाचा अभाव, साठवणुकीची कमतरता आणि बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे अन्नसुरक्षा ही कायमची चिंतेची बाब राहिली. तांदूळ हा मुख्य अन्नघटक असूनही, त्याचे उत्पादन मात्र हवामानावरच अवलंबून होते. आयात हा पर्याय अपरिहार्य असाच होता. या पार्श्वभूमीवर हरितक्रांतीने उत्पादनात वाढ केली असली, तरी त्याचे फायदे काही प्रदेशांपुरतेच मर्यादित राहिले. पाण्याचा अतिवापर, जमिनीची झीज आणि खर्चीक शेती ही त्याची दुसरी बाजू होती.
काँग्रेसच्या दीर्घकालीन सत्तेत शेती धोरणांचा भर प्रामुख्याने तत्कालिक उपायांवरच राहिला. उत्पादन वाढवण्यापेक्षा अनुदाने, कर्जमाफी आणि भावनिक राजकारण यांनाच अधिक महत्त्व लाभले. संशोधन संस्थांचा विस्तार झाला; पण त्याचा लाभ शेतकर्यांपर्यंत पोहोचण्याचा वेग कमी होता. बियाणे, सिंचन, साठवणूक, प्रक्रिया आणि निर्यात यांची साखळी एकत्रितपणे उभी राहिली नाही. परिणामी, तांदूळ उत्पादन वाढत असले; तरी त्याची गुणवत्ता, शाश्वतता आणि जागतिक स्पर्धात्मकता याबाबत मर्यादा कायम राहिल्या. २०१४नंतर शेतीकडे पाहण्याची दिशा बदलली. शेती ही सामाजिक कल्याणाची बाब नाही, तर ती राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे ही भूमिका प्राधान्याने स्वीकारली गेली. उत्पादन वाढवताना शाश्वतता, संशोधन आणि बाजारपेठ यांचा समन्वय साधण्यावर भर देण्यात आला. तांदूळ उत्पादनात हा बदल ठळकपणे दिसून आला. नवीन वाणांचे संशोधन, रोगप्रतिबंधक आणि कमी पाण्यात अधिक उत्पादन देणार्या जाती, हवामानबदलाला तोंड देणारी बी-बियाणी ही प्रक्रिया वेगाने पुढे गेली. प्रयोगशाळेतील संशोधन थेट शेतकर्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला गेला.
यासोबतच सिंचनाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली. पाण्याचा कार्यक्षम वापर, सूक्ष्म सिंचन, पाणलोट क्षेत्र विकास, यामुळे उत्पादन स्थिर राहू लागले. डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकर्यांना हवामान, बाजारभाव, बियाणे आणि सरकारी योजनांची माहिती वेळेवर मिळू लागली. किमान आधारभूत किंमत व्यवस्थेत पारदर्शकता वाढली. सरकारी खरेदी यंत्रणा अधिक सक्षम झाल्याने शेतकर्यांचा विश्वास वाढला, उत्पादन वाढले; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे उत्पादनाचा धोकाही कमी झाला. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे तांदूळ उत्पादनात सातत्याने झालेली वाढ. चीनसारख्या देशाची मक्तेदारी मोडीत काढणे हे सहजसाध्य नव्हते. चीनकडे विशाल सिंचन व्यवस्था, यांत्रिकीकरण आणि केंद्रीकृत नियोजन आहे. भारताने मात्र हवामानातील वैविध्यता, लहान शेतजमिनी आणि लाखो शेतकर्यांच्या सहभागातूनच हे यश मिळवले. हीच भारतीय शेतीची ताकद आहे. उत्पादनाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर येणे म्हणजे ते व्यवस्थापनाची परिपक्वता आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.
या स्वयंपूर्णतेचे महत्त्व जागतिकसंदर्भात अधिक ठळक होते. अन्नधान्याचा पुरवठा हा आज आर्थिक नव्हे, तर सामरिक प्रश्न बनला आहे. अनेक देश आयातीवर अवलंबून आहेत. अशा वेळी भारताचा विश्वसनीय पुरवठादार म्हणून उदय होणे, ही परराष्ट्र धोरणालाही बळ देणारी बाब आहे. तांदूळ निर्यातीत भारताने मिळवलेले स्थान हे या आत्मनिर्भरतेचे प्रत्यक्ष फलित आहे. देशांतर्गत गरजा पूर्ण करून निर्यात वाढवण्याचे संतुलन साधणे सोपे नसते, मात्र ते भारताने साध्य केले.
तथापि, या यशाकडे आत्मसंतोषाने पाहून चालणार नाही. उत्पादन वाढले असले; तरी शेतकर्यांचे उत्पन्न, प्रक्रिया उद्योगांचा विस्तार, साठवणूक व्यवस्था आणि मूल्यवर्धन यांवर अधिक काम करण्याची गरज आहे. हवामानबदलाचे आव्हान अधिक तीव्र होत असून, पाण्याची उपलब्धताही मर्यादित आहे. त्यामुळे भविष्यातील धोरणे अधिक सूक्ष्म आणि दीर्घकालीन दृष्टीने आखावी लागतील. तांदूळ उत्पादनातील यश हे इतर पिकांमध्येही कसे रूपांतरित करता येईल, हा पुढचा प्रश्न आहेच. तरीही, एक गोष्ट निर्विवाद आहे आणि ती म्हणजे भारताने तांदूळ उत्पादनात जगात अव्वल स्थान मिळवणे, ही अपघाती घटना नाही. स्वातंत्र्यानंतरच्या अपूर्णतेपासून ते आजच्या आत्मनिर्भरतेपर्यंतचा हा प्रवास सांगतो की, शेतीकडे योग्य दृष्टीने पाहिले तर ती देशाला अन्नच नाही, तर आत्मविश्वासही देते. चीनला मागे टाकण्याचा हा क्षण भारतासाठी आकड्यांचा नव्हे, तर आत्मभानाचा आहे. आज भारत अन्नाच्या बाबतीत जगाला पुरवठा करणारा देश झाला आहे. हेच या यशाचे खरे मोजदाद म्हणता येईल.