माध्यमांतील जगरहाटी आणि परिवर्तनाची हाक

06 Jan 2026 10:50:00
MTV
 
दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी जगप्रसिद्ध संगीत वाहिनी ‘एमटीव्ही’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तसेच देशभरात गेल्या तीन वर्षांत ५० वाहिन्यांनीही त्यांचे प्रसारण बंद केले. त्यानिमित्ताने आजच्या डिजिटल युगातील बदलत्या माध्यमविश्वाचे आकलन करणारा हा लेख...
 
‘हम कहीं नहीं जा रहें’ म्हणत भारतातील ‘एमटीव्ही’ने आपले प्रसारण सुरूच राहणार असल्याची ‘गूड न्यूज’ दिली असली, तरी जगभरातील संगीतकेंद्रित ‘एमटीव्ही’च्या अन्य काही वाहिन्यांनी दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि ४४ वर्षांच्या अविरत सेवेनंतर ‘एमटीव्ही’च्या जगभरातील संगीतवाहिन्यांवरील सूर कायमचे शांत झाले. ‘व्हिडिओ किल्ड द रेडिओ स्टार’ हे ‘द बगल्स’चे सुप्रसिद्ध गीत दि. १ ऑगस्ट १९८१ रोजी सर्वप्रथम ‘एमटीव्ही’च्या अमेरिकेतील वाहिनीवर प्रसारित झाले होते. गाण्याच्या नावातूनच त्याचा अर्थबोधही व्हावा.
 
चलचित्रयुक्त वाहिन्यांच्या पदार्पणाच्या युगात रेडिओ, रेडिओवरील संगीत आणि गायकही काहीसे मागे पडले. माध्यमविश्वातील त्याच तांत्रिक संक्रमणावर हे गीत आधारित आहे. ‘युट्यूब’वर हे गीत आपण आजही ऐकू शकतो. विशेष म्हणजे, भारतात १९८२ साली प्रसिद्ध झालेल्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील ‘कोई यहा नाचे नाचे... अव्वा अव्वा हम को हैं तुमसे प्यार...’ या गीताची चालही याच ‘व्हिडिओ किल्ड द रेडिओ स्टार’वरून जशीच्या तशी चोरलेली. संगीतजगतात तर अशा चालचोरीचे म्हणा जुनेच चलन. असो. पण, मुद्दा हाच की, चार दशकांनंतर ‘एमटीव्ही’वर आपल्या संगीतवाहिन्यांचे प्रसारण बंद करण्याची वेळ का आली? तर ‘युट्यूब’, ‘स्पॉटीफाय’ आणि ‘रिल्स’च्या आजच्या सुपरफास्ट दुनियेत ‘एमटीव्ही’ साहजिकच मागे पडला.
 
आधी एखादे गाणे ऐकण्यासाठी प्रेक्षक टीव्हीसमोर तासन्तास डोळे फाडून, कान लावून बसत. पण, आजच्या डिजिटल युगात संगीतासाठीची ती प्रतीक्षा, उत्कंठाच कुठेतरी संपली. आपल्या आवडीचे गाणे, आपल्या आवडीचा गायक, संगीतकार वगैरे सगळे काही आता एका क्लिकवर उपलब्ध. म्हणूनच, मग ‘एमटीव्ही’सारख्या संगीतकेंद्रित वाहिन्यांची गरजच मुळात संपुष्टात आली. या वाहिन्यांची प्रेक्षकसंख्या लक्षणीयरित्या घटली. परिणामी, वाहिन्यांवरील जाहिरातींची संख्या आणि उत्पन्नही रोडावले. ‘एमटीव्ही’ची मुख्य कंपनी असलेल्या ‘पॅरामाऊंट मीडिया नेटवर्क्स’कडूनही या वाहिन्या बंद करण्यामागे आर्थिक चणचणीचे कारण देण्यात आले. साहजिकच, जाहिरातींच्या उत्पन्नाशिवाय अशा मोठाल्या वाहिन्यांचा डोलारा सांभाळणे हे केवळ अशक्यप्राय. अखेरीस ‘एमटीव्ही’च्या संगीतवाहिन्यांचा आवाज युके, जर्मनी, हंगेरी, ऑस्ट्रेलिया, ब्राझील यांसारख्या काही देशांत कायमचा बंद झाला.
 
‘एमटीव्ही’च्या उदाहरणावरून मनोरंजन क्षेत्रातील वाहिन्यांनी गाशा गुंडाळण्याची ही परिस्थिती पाश्चात्त्य देशांपुरती मर्यादित असल्याचा आपला समज होणे स्वाभाविक. पण, तसे अजिबात नाही. भारतातही या डिजिटायझेशनची झळ मोठ्या संख्येने येथील वाहिन्यांना बसलेली दिसते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या एका आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांत भारतातील तब्बल ५० वाहिन्यांनी त्यांचे परवाने सरकारच्या स्वाधीन केले आहेत. यामध्ये केवळ छोटे माध्यमसमूह नाहीत, तर ‘जिओ स्टार’, ‘एबीपी नेटवर्क’, ‘झी एंटरटेनमेंट’, ‘एनाडू’, ‘टीव्ही टुडे नेटवर्क’, ‘एनडीटीव्ही’ यांसारख्या प्रस्थापित माध्यमसमूहांच्या काही वाहिन्यांचा समावेश आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे, माध्यमसमूहांनीही वाहिन्यांपेक्षा डिजिटल माध्यमांकडे वळवलेला मोर्चा आणि आर्थिकदृष्ट्या वाहिन्यांचा न परवडणारा अवाढव्य खर्च!
 
त्यातच मनोरंजनविश्वातील प्रेक्षकांच्या बदललेल्या आवडी-निवडींमुळे काही वाहिन्यांवरही संक्रात ओढवली. टीव्हीसमोर तासन्तास चिकटून बसणारे प्रेक्षक हातातील स्मार्टफोनमुळे हळूहळू ‘ओटीटी’कडे वळले. ‘कोविड’ महामारीच्या काळात मालिकांच्या, चित्रपटांच्या बंद झालेल्या चित्रीकरणामुळेही प्रेक्षकांची नाळ वाहिन्यांशी काहीशी तुटली. एवढेच नाही, तर महागड्या ‘डीश’ऐवजी काहींनी आपला मोर्चा ‘डीडी’च्या मोफत ‘डीश’कडे वळवला. त्यातच मुख्यत्वे मनोरंजन वाहिन्यांवरील मालिकांमधील तोचतोच रटाळपणा, एकाच पठडीतील अतिरंजित कथानके, अर्ध्या तासांच्या मालिकेतील जाहिरातींची वाढती लुडबूड यामुळे वाहिन्यांपासून तरुण प्रेक्षकवर्ग दुरावला. परिणामी, २०१९ मध्ये ‘डीटूएच’च्या वापरकर्त्यांची संख्या ७.२ कोटींवरून, २०२४ मध्ये ६.२ कोटींवर पोहोचली आणि चालू आर्थिक वर्षात ती ५.१ कोटींपर्यंत घसरण्याचा अंदाज ‘क्रीसिल’च्या अहवालात वर्तविण्यात आला आहे.
 
प्रेक्षकांनी वाहिन्यांपासून घेतलेल्या या फारकतीचा परिणाम मालिकांच्या ‘टीआरपी’वर होणे स्वाभाविकच आणि एकदा का ‘टीआरपी’ घसरला की, आपसूकच जाहिरातदारही त्या मालिकेकडे, वाहिनीकडे पाठ फिरवतात. तसेच हल्ली बहुतांश जाहिरातदारांचा कलही डिजिटल मीडिया, इन्फ्ल्युएन्सर्सकडे झुकलेला. परिणामी, वाहिन्यांवरील जाहिरातींचा प्रवाहदेखील कालौघात आटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट व्हावे. एका संस्थेच्या माहितीनुसार, वाहिन्यांवरील जाहिरातीच्या उत्पन्नात २०२५ साली १.५ टक्के इतकी घट होऊन, हे उत्पन्न ४७७.४ अब्ज डॉलरवर स्थिरावण्याचा अंदाज होता. परंतु, एकूणच जाहिरातींची बाजारपेठ २०२५ पर्यंत १.८ ट्रिलियन आणि २०२६ मध्ये दोन ट्रिलियनपर्यंत विस्तारण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचाच अर्थ, एकीकडे जाहिरात क्षेत्राचे क्षितिज विस्तारत असले, तरी दुसरीकडे वाहिन्यांवरील जाहिरातींच्या उत्पन्नात मात्र घट नोंदवण्यात आली आहे.
 
तसेच काही प्रसारकांनी घटत्या जाहिरातींमागे ‘ट्राय’च्या ‘एका तासात १२ मिनिटेच जाहिराती’ या नियमालाही जबाबदार ठरवले आहे. कारण, अशी कुठलीही बंधने ‘ओटीटी’ आणि अन्य डिजिटल माध्यमांवर नाही. त्यामुळे सर्वाधिक नियमन केलेले क्षेत्र खर्चाच्या ओझ्याखाली दबलेले आणि कमीत-कमी नियमन असलेले ‘ओटीटी’ क्षेत्र मात्र सर्वाधिक नफा कमावताना दिसते. असा हा विरोधाभास. याचा परिणाम या क्षेत्रातील नोकर्‍यांवरही दिसून येतो. ’AIDCF-EY INDIA’च्या अहवालानुसार, २०१८ ते २०२५ या काळात देशभरात प्रसारण क्षेत्रात पाच लाख, ७७ हजार जणांनी नोेकर्‍या गमावल्या; तर ७२ हजार केबल ऑपरेटर्सना आपले नेटवर्क बंद करण्याची वेळ आली. एवढेच नाही, तर एप्रिल २०२४ मध्ये ‘झी एंटरटेनमेंट’ने १५ टक्के मनुष्यबळ; तर ‘जिओस्टार’ने मार्च २०२५ मध्ये एक हजार १०० कर्मचार्‍यांना घरचा रस्ता दाखवला. यावरून या क्षेत्रातील विदारक परिस्थितीचा अंदाज यावा.
 
आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या, ‘एआय’च्या जगात ‘कन्व्हर्जन्स’शिवाय माध्यमांनाही गत्यंतर नाही. १९९०-२०००च्या दशकात वाहिन्यांचा उदय होताना जाहिरातींचा प्रवाह आटण्याची भीती मुद्रितमाध्यमांच्याही चिंतेत भर टाकणारी होती. त्यामुळे वाहिन्यांना, प्रसारकांनाही प्रेक्षकांना आकर्षित करणारे नावीन्यपूर्ण प्रयोग आणि अधिकाधिक डिजिटल पर्यायांचा जाहिरात उत्पन्नासाठी विचार करणे क्रमप्राप्त. आज ज्याची चलती, ते काही वर्षांनंतर कालबाह्य ठरणार आहे, हीच जगरहाटी. त्याला माध्यमविश्वाचाही अपवाद नाहीच!
 
 
 
Powered By Sangraha 9.0