प्रतिकूलतेतून घडलेले सोमनाथ

06 Jan 2026 11:21:20
Dr. Somnath Salgar
 
गरिबी, अपघात, अंधार आणि अपुर्‍या साधनांतून शिक्षणाचा ध्यास जपणार्‍या डॉ. सोमनाथ सलगर यांची वाटचाल ही केवळ वैयक्तिक यशाची नाही, तर प्रतिकूल परिस्थितीतही माणूस घडू शकतो, याचाच जिवंत दाखला...
 
भारतातून अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे होणार्‍या एचआयव्ही एड्सवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी डॉ. सोमनाथ निघाले होते. वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञांमध्ये भारतीय प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याचा तो क्षण होता. विमानात बसल्यानंतर त्यांचे मन मात्र वर्तमानात थांबले नाही. आकाशात झेपावणार्‍या विमानासोबतच आयुष्याच्या खडतर वाटेवरून चाललेला संपूर्ण प्रवास त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. कारण, हा क्षण सहज मिळालेला नव्हता.
 
डॉ. सलगर यांचा जन्म आणि बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले. गरिबी ही केवळ पैशांची नसते, ती माणसाच्या आयुष्याच्या प्रत्येक निर्णयावर छाया टाकते, हे सलगर कुटुंबाने अनुभवले. पाचवीत असताना त्यांच्या वडिलांचा गंभीर अपघात झाला. मग शिक्षणाचा विचार बाजूला ठेवून पोटाची खळगी भरणे, हेच कुटुंबासाठी प्राधान्य ठरले. जून १९८२ मध्ये जीवन शिक्षण विद्यामंदिर, कळंब येथे डॉ. सलगर यांचे शिक्षण सुरू झाले. वडील शेतमजूर म्हणून काम करत होते. काही वर्षांतच कुटुंब हाजापूर, तालुका मंगळवेढा येथे स्थलांतरित झाले. दुसर्‍यांच्या शेतात मजुरी करत असताना त्याच शेतातील छोट्याशा झोपडीत त्यांचे बालपण गेले. आजी धुणीभांडी करत असे. घरखर्च अपुरा पडत असल्याने सकाळी ७ ते १० या वेळेत आजीला मदत करून मग शाळा असा त्यांचा रोजचा दिनक्रम.
 
घरात वीज नव्हती. रात्री अभ्यासासाठी रॉकेलची चिमणीच सोबती होती. अशा परिस्थितीत डॉ. सोमनाथ यांच्या शिक्षणाला दिशा दिली, ती त्यांच्या प्राथमिक शिक्षिका वसुधा महाजन यांनी. पाचवीसाठी ‘रयत शिक्षण संस्थे’च्या श्री संत मुक्ताबाई विद्यालय, शेळगाव येथे वसतिगृहात प्रवेश मिळाला. येथेच ‘कमवा आणि शिका’चा खरा अर्थ उमगला. स्वयंपाकासाठी मदत, स्वच्छता, पाणी भरणे, प्रयोगशाळा साफ करणे, शेतात काम करणे ही सर्व कामे करत त्यांचे शिक्षण सुरू होते. घराची आठवण येत असे, एकटेपणा जाणवत असे; पण शिकायचे आहे, एवढीच जिद्द त्यांना पुढे नेत होती.
 
पुढे वालचंदनगरच्या वर्धमान विद्यालयात शिक्षण घेताना अडचणी कमी झाल्या नाहीत. पावसाळ्यात झोपडी गळायची. वह्या-पुस्तके सुरक्षित ठेवणे कठीण जायचे. काहीवेळा शिक्षकांच्या ओळखीच्या घरात जाऊन अभ्यास करावा लागे. सबनीस सर, प्रकाश बोकील, वैशाली रत्नपारखी, कांचन कापडी यांचे मार्गदर्शन डॉ. सलगर यांना लाभले. दहावीत असताना घडलेली एक घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. एका रात्री अभ्यास करताना झोप लागली. मध्यरात्री जाग आली, तेव्हा रॉकेलची चिमणी उलटून अंथरूण पेटले होते. काही पुस्तके जळाली, स्वतःही भाजले. मात्र, सुदैवाने जीव वाचला. त्या रात्री त्यांनी स्वतःशी ठाम निर्णय घेतला की, परिस्थिती कितीही कठीण असली, तरी शिक्षण सोडायचे नाही.
 
याच काळात मॅडम मेरी युरी यांचे जीवनचरित्र डॉ. सोमनाथ यांच्या वाचनात आले. प्रतिकूल परिस्थितीतून संशोधनात यश मिळवणार्‍या त्यांच्या आयुष्याने डॉ. सलगर यांना विशेष प्रेरणा दिली. त्यांनी अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले, डायरी लिहायला सुरुवात केली आणि प्रश्नपत्रिकांचा सराव केला. मार्च १९९२ मध्ये दहावीत ९०.८५ टक्के गुण मिळवून पुणे विभागात १७वा क्रमांक मिळवला. या यशामुळे कुटुंबात शिक्षणाबद्दल नवा आत्मविश्वास निर्माण झाला. बारावीत त्यांनी ‘पीसीबी’ गटात ९९ टक्के गुण मिळवले. पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. डिसेशन हॉल, रुग्णांचे दुःख, अभ्यासाचा व्याप हे सगळेच त्यांच्यासाठी नवीन होते. मात्र, हळूहळू परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी सेमिनार, संशोधन, प्रश्नमंजूषा आणि सामाजिक उपक्रमांत सहभाग घेतला. २००० मध्ये ‘एमबीबीएस’ पूर्ण केल्यानंतर ससून रुग्णालयात इंटर्नशिप, ग्रामीण आरोग्य केंद्रात सेवा आणि अतिदक्षता विभागात निवासी डॉक्टर म्हणून काम केले. २००३मध्ये ‘एम.डी.’ (बायोकेमिस्ट्री) पूर्ण झाले. संशोधन आणि अध्यापन याच त्यांच्या पुढील वाटचालीचे केंद्रबिंदू ठरले.
 
आज डॉ. सोमनाथ सलगर हे बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयात प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेली दोन दशके ते वैद्यकीय विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आहेत. वैद्यकीय शिबिरे, आरोग्य शिक्षण, सामाजिक कार्य, संशोधन आणि व्याख्याने यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. प्रतिकूल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना आधार देणे आणि आरोग्याबाबत जनजागृती करणे, हेच त्यांच्या आयुष्याचे खरे ध्येय आहे.
 
डॉ. सोमनाथ सलगर यांची वाटचाल सांगते की, परिस्थिती माणसाला थांबवण्यासाठी येते; पण जिद्द, शिक्षण आणि प्रामाणिक मेहनत असेल, तर तीच परिस्थिती माणसाला घडवते. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
 
- सागर देवरे
 
 
 
Powered By Sangraha 9.0