मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्रात हिवाळ्यामध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करुन येणारा छोट्या टिवला (Little Stint) हा पक्षी मानवी विष्ठेवर अन्नग्रहण करत असल्याची नोंद पक्षीनिरीक्षकांनी केली आहे (little stint bird). विरारमधील मामाची वाडी किनाऱ्यावरुन ही नोंद करण्यात आली आहे. हा स्थलांतरी पक्षी अशा प्रकारे मानवी विष्ठेमधील काही घटक खात असल्याच्या त्याच्या खाद्यवर्तनाची ही पहिलीच नोंद ठरली आहे. (little stint bird)
हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारी आणि स्थलीय पाणथळ प्रदेशात अनेक पक्षी देशविदेशातून स्थलांतर करतात. यामधील आर्टिक प्रदेशातून लाखोंच्या संख्येने स्थलांतर करुन येणार पक्षी म्हणजे, छोटा टिलवा. या पक्षी प्रामुख्याने पाणी आणि चिखलातील छोटे किटक, कवचधारी प्राणी आणि कृमी यांवर अन्नग्रहण करतो. मात्र, पक्षीनिरीक्षक आकाश म्हाडगुत आणि वैभव हळदीपूर यांनी हा पक्षी मानवी विष्ठेवर देखील अन्नग्रहण करत असल्याचे निरीक्षण विरारमधील मामाचीवाडी किनाऱ्यावरुन टिपले आहे. या पक्ष्यांच्या खाद्यवर्तनाची ही पहिलीच नोंद असल्याने त्यासंबंधीची टिपण 'इंडियन बर्ड्स' या नियतकालीमध्ये प्रकाशित झाली आहे.
यापूर्वी छोट्या टिलव्याच्या अशा स्वरुपाच्या खाद्यवर्तनाची नोंद झालेली नाही. केवळ रंगीत तुतारी या स्थलांतरी पक्ष्याच्या मानवी विष्ठेवरील खाद्यवर्तनाची नोंद झालेली आहे. त्यामुळे छोट्या टिलव्याच्या मानवी विष्ठेवरील खाद्यवर्तनाची ही पहिलीच नोंद ठरली आहे. स्कॅन्डिनेव्हिया, सायबेरियामधून छोटे टिलवे पक्षी लाखोंच्या संख्येने मुंबईच्या किनारीक्षेत्राबरोबर पुणे जिल्ह्यातील स्थलीय पाणथळ क्षेत्रात अंदाचे २५ हजार किलोमीटरचे स्थलांतर करतात. सप्टेंबर महिन्यात त्यांच्या आगमनास सुरुवात होते आणि मार्च-एप्रिल हे पक्षी परतीच्या प्रवासाला निघतात. जेमतेम १२-१४ सेंटीमीटर आकाराचे आणि १२-१५ ग्रॅम वजनाचे असतात. ते एका जागी शांत बसत नाहीत. यामधील एक पक्षी जरी उडला तरी, त्यामागे हजारो पक्ष्यांचा थवा एकदम उडतो.
"विरारमधील मामाची वाडी किनाऱ्यावर अजूनही स्थानिक लोकं शौचास बसतात. १६ एप्रिल २०२४ रोजी, आम्ही स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी मामाची वाडी समुद्रकिनाऱ्याला भेट दिली. त्यावेळी सकाळी भरती ओसरली होती आणि काही लोक समुद्रकिनाऱ्यावर उघड्यावर शौचास बसले होते. त्याच वेळी, आम्ही तीन लिटल स्टिंट पक्ष्यांना समुद्रकिनाऱ्यावर पडलेल्या मानवी विष्ठेवर खाद्य शोधताना पाहिले. या खाद्य सवयीचे छायाचित्रण केले. पक्षी वारंवार त्या ठिकाणी येत होते. मात्र प्रत्यक्ष विष्ठेवर खाद्य शोधत होते की त्यातील कीटकांवर, हे आम्हाला स्पष्ट झाले नाही.- आकाश म्हाडगुत, पक्षीनिरीक्षक