दोन वर्षे अडकलेलं पहिलं गाणं, ‘आशिकी 2’नं बदललं नशीब, अरिजीत सिंहच्या निवृत्तीने चाहते नाराज

    31-Jan-2026
Total Views |

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय गायक म्हणून अरिजीत सिंहचं नाव घेतलं जातं. किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांच्याप्रमाणेच अरिजीतसाठीही प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रियता पाहायला मिळते. मात्र मंगळवार, २७ जानेवारी रोजी अरिजीत सिंहने आपल्या गायन कारकिर्दीतून पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. आणि यामुळे त्याच्या लाखो चाहत्यावर्गामध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. आपल्या आवडत्या गायकाचं गाणं पुन्हा ऐकायला मिळणार नाही या भावनेने अनेकजण सोशल मीडियावरही व्यक्त होताना दिसत आहेत.

आजपर्यंत अरिजीतने आपल्या आवाजाने असंख्य अजरामर गाणी दिली आहेत. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की बॉलिवूडमधील त्याचं पहिलं गाणं कोणतं होतं आणि ते तब्बल दोन वर्षे रिलीजच्या प्रतीक्षेत अडकून पडलं होतं? चला, या रंजक प्रवासावर एक नजर टाकूया.

मॉडर्न एरातील टॉप सिंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरिजीत सिंहने जरी आज आपल्या गायन कारकिर्दीवर पूर्णविराम दिला असला, तरी त्यांच्या आवाजातली जादू आणि त्यांनी गायलेली गाणी कायमस्वरूपी अमर राहणार आहेत. अरिजीतच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या गाण्यांपैकी एक गाणं २०११ साली प्रदर्शित झालं होतं, मात्र त्याचं रेकॉर्डिंग २००९ मध्येच पूर्ण झालं होतं. “फिर मोहब्बत करने चला…” हे गाणं अभिनेता इमरान हाश्मीच्या मर्डर २ या चित्रपटातील होतं.
गाणं सुपरहिट ठरलं, पण त्या काळात अरिजीतला अपेक्षित अशी लोकप्रियता मिळाली नाही. तरीही हा टप्पा त्याच्या कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. यानंतर बर्फीसाठी “फिर ले आया दिल”, एजंट विनोदसाठी “राब्ता” अशी अनेक गाणी त्याने गायली आणि हळूहळू प्रेक्षकांच्या मनावर आपल्या आवाजाची मोहिनी घालायला सुरुवात केली. पण खरी जादू घडली ती २०१३ साली.

‘आशिकी २’नं बदललं अरिजीतचं नशीब

आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या आशिकी 2 चित्रपटातील “तुम ही हो…” हे गाणं अरिजीत सिंहसाठी टर्निंग पॉइंट ठरलं. या एका गाण्याने त्यांना अपार लोकप्रियता मिळवून दिली आणि तो बॉलिवूडमधील नवी ‘सेन्सेशन व्हॉइस’ बनला. यानंतर अरिजीतने कधीच मागे वळून पाहिलं नाही. रोमँटिक, सॅड किंवा डान्सिंग कोणताही प्रकार असो, त्याच्या आवाजाने श्रोत्यांच्या मनाला थेट स्पर्श केला. भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही अरिजीत सिंह एक सर्वोत्तम गायक म्हणून उदयास आले.

15 वर्षांत 700 हून अधिक गाणी

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अरिजीतने आपल्या सुवर्णकाळात जवळपास ७०० पेक्षा अधिक गाण्यांना आवाज दिला. हिंदीसह विविध भाषांमधील गाणी त्याच्या नावावर कोरलेली आहेत. निवृत्तीची घोषणा झाल्यानंतरही अरिजीतची काही गाणी अजून रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामध्ये सलमान खानच्या बॅटल ऑफ गलवान या चित्रपटातील गाण्यांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. आज जरी अरिजीत सिंहने गायनातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांच्या आवाजातल्या भावना, वेदना आणि प्रेमकथा रसिकांच्या मनात कायम घुमत राहणार आहेत.