मुंबई : (Sunetra Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी शनिवार दि. ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात पार पडलेल्या संक्षिप्त पण भावनिक शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत हा शपथविधी पार पडला असून, सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. (Sunetra Pawar)
शपथविधीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रीमंडळातील सहकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रमुख नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी शपथ घेताना राज्यघटनेप्रती निष्ठा राखण्याची आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. (Sunetra Pawar)
याआधी दुपारी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधायक दलाने बैठक घेऊन सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी एकमताने निवड केली होती. त्यानंतर संध्याकाळी हा शपथविधी पार पडला. शपथविधीपूर्वी त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. (Sunetra Pawar)
अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पक्षात फूट पडू नये आणि सरकारमध्ये स्थैर्य राहावे, यासाठी नेतृत्वाची धुरा सुनेत्रा पवारांकडे सोपवण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे. (Sunetra Pawar)
सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या असून, त्यांच्या शपथविधीने राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. भावनिक वातावरणात पार पडलेला हा शपथविधी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (Sunetra Pawar)