मुंबई : ( Sunetra Pawar ) सुनेत्रा पवार यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सामाजिक कार्य ते राजकारण असा त्यांचा आजवरचा प्रवास आहे.
सुनेत्रा पवार यांचा जन्म धाराशीव जिल्ह्यातील तेर याठिकाणी झाला. त्यांचे बंधू माजी मंत्री पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे जवळचे मित्र होते. तसेच सुनेत्रा पवार यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक असल्याने त्यांना बालपणापासूनच सामाजिक आणि राजकीय वारसा लाभला होता. १९८५ मध्ये अजित पवार यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर काटेवाडी येथे आल्यावर सुनेत्रा पवार यांनी सामाजिक कार्याला सुरूवात केली. निर्मलग्राम आणि ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात प्रवेश केला. त्यांनी बारामती टेक्सटाईल कंपनीचे अध्यक्ष पदही भुषवले. अजितदादांच्या राजकीय जीवनात त्यांनी खंबीर साथ दिली. पण, त्यांनी राजकारणाव्यतिरिक्त समाजकार्यातूनच आपला ठसा उमटवला.
हेही वाचा : Sunetra Pawar: “मी सुनेत्रा अजित पवार… ईश्वरसाक्ष शपथ घेते की…”
राजकारणात प्रवेश
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. नणंद विरुद्ध भावजय अशी ही निवडणूक होती. परंतू, यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर निवड झाली. राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांना तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. आता अजित पवार यांच्या निधनानंतर त्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.