विविध विषयांवर सखोल अभ्यास करून आपल्या लेखणीच्या बळावर समाजाला दिशा देण्याचे काम करणारे मिलिंद मधुकर चिंधडे यांच्याविषयी...
मिलिंद मधुकर चिंधडे यांचा जन्म दि. २५ मे १९५७ रोजी जळगाव येथे झाला. त्यावेळेला त्यांचे मातुल आजोबा जळगाव येथे होते. वडील मनमाडला सरकारी वकील होते. त्यामुळे दहावीपर्यंतचे शिक्षण मनमाड येथे झाले. नाशिकच्या पेठे हायस्कूल येथे अकरावी, बी. वाय. के. महाविद्यालयातून ‘एम.कॉम्’, विधी महाविद्यालयातून ‘एल.एल.बी.’, पुणे विद्यापीठातून ‘एल.एल.एम.’पर्यंत शिक्षण घेतले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ‘एम.ए.’ (शिक्षणशास्त्र), ‘ज्योतिष प्रवीण’ या पदव्या मिळवल्या. शिकता-शिकता वाचन आणि लेखन सुरू झाले. नाशिकच्या स्थानिक वर्तमानपत्रांत भरपूर लेखन केले. ‘सार्वजनिक वाचनालय, नाशिक’ या १८६ वर्षे जुन्या संस्थेचे सदस्यपदही मिलिंद यांनी भूषविले. पुढे एप्रिल १९८३ साली ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र’ची सनद घेऊन वकिलीचा व्यवसाय सुरू केला.
१९८५ मध्ये बी. वाय. के. महाविद्यालयात ‘व्यापारी कायदा आणि औद्योगिक कायदा’ हा विषय शिकवण्याकरिता अर्धवेळ प्राध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. ऑगस्ट २००० मध्ये बिटको महाविद्यालय, नाशिकरोड येथे गोखले शिक्षण संस्थेचे विभागप्रमुखपदही मिलिंद यांनी लीलया सांभाळले. याशिवाय, नाशिकच्या एन. बी. टी. विधी महाविद्यालय येथे २३ वर्षे ‘कायदा’ विषय शिकवला. त्यामुळेच ‘सार्वजनिक वाचनालय, नाशिक’तर्फे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा न्यायालयात मागील ४३ वर्षांपासून आपल्या वकिलीच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्याचे अविरतपणे काम सुरू आहे, तर दुसरीकडे शेकडो लेखांबरोबरच साहित्य आणि कायदा या विषयांवर अनेक दैनिके, मासिके, त्रैमासिके यांतून समाजप्रबोधनाचे कार्य सुरू आहे.
अनेक गावांमध्ये शाळा-महाविद्यालय इत्यादी ठिकाणी विविध विषयांवर मिलिंद यांनी व्याख्याने दिलेली असून, महाराष्ट्र समाज सेवा संघ, मध्यवर्ती हिंदू सैनिकी शाळा, लोकमान्य विद्यालय, मालेगाव एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थांवर पदाधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच सेवाभावी ‘समाज कल्याण संस्था, नाशिक’ या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. ‘सार्वजनिक वाचनालय, नाशिक’ या संस्थेच्या कार्यकारी मंडळात २००८ ते २०११ या कालावधीत काम केले. या काळात जवळजवळ त्यांनी ५७ व्याख्यानांचे यशस्वी आयोजन केले आहे. ‘कोरोना’ काळापासून पुस्तक लेखनालाही प्रारंभ केला असून, ‘स्वाक्षरीचे जग’ या पुस्तकात १२७ व्यक्तींची माहिती व फोटो आहेत. ‘प्रकाशाचे दिवे’ या पुस्तकात ५१ व्यक्तींवरील चरित्रात्मक लेख, ‘ज्योतिष नभातील तारे’मध्ये ज्योतिषावरची माहिती, ‘भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश’, ‘पुस्तकांच्या सहवासात‘, सरन्यायाधीशांवरील पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद, ‘वकिलीच्या अंतरंगात’, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा’ अशी आठ पुस्तके मिलिंद चिंधडे यांची प्रसिद्ध झाली आहेत.
याशिवाय, वेळोवेळी कायदेविषयक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. ‘महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे’, ‘सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई’, ‘ललित’ मासिक, ‘सर्वात्मक वाचनालय इंदिरानगर’, ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक’ यांसारख्या संस्थांचे ते आजीव सदस्य आहेत. २००४ सालापासून दिलेल्या सशक्त देणगीतून आजी आणि आजोबा यांच्या स्मरणार्थ काकाणीनगर वाचनालय, मालेगाव येथे साहित्यविषयक त्यांची दोन व्याख्याने आयोजित केली जातात. त्याबरोबरच वेगवेगळी वाचनालये आणि शाळांना वेळोवेळी शेकडो पुस्तके भेट देण्याचे काम मिलिंद यांनी केले आहे. तसेच अनेक नामवंत स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. यामध्ये गो. ह. देशपांडे वक्तृत्व स्पर्धा, सार्वजनिक वाचनालय, एन. बी. टी. विधी महाविद्यालय, ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, व्यंकटेश बालाजी संस्थान, विखे पाटील महाविद्यालय प्रवरानगर, महानगरपालिका नाशिक, जायंट्स ग्रुप सिडको, जिल्हा सहकारी बोर्ड, समाज परिवर्तन केंद्र, लोकहितवादी मंडळ या संस्थांनी आयोजित केलेल्या वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचा समावेश आहे.
तसेच मेहता मराठी ग्रंथ जगत, अन्य एका दैनिकाने ‘उत्तम वाचक’ म्हणून गौरवलेले आहे. याबरोबरच वेळ मिळेल तसे समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम मिलिंद चिंधडे वेळोवेळी करत असतात. आपल्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा समाजाला काहीतरी फायदा व्हावा, या उद्देशाने मिलिंद चिंधडे कायम अग्रेसर असल्याचे दिसून येते. त्यामुळेच नाशिक जिल्ह्यासह इतरही संस्थांमध्ये अजूनही न थकता काम करताना दिसतात. त्यामुळेच वयाची सत्तरी गाठलेले मिलिंद अजूनही तरुणाला लाजवेल अशा ऊर्जेने काम करत आहेत. असे हे वाचन आणि लेखनप्रेमी व्यक्तिमत्त्व असलेले मिलिंद चिंधडे यांनी यापुढेही विविध विषयांवर लेखऩ करून समाजाला दिशा देण्याच्या उद्देशाने काम करावे, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील निरोगी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
- विराम गांगुर्डे