गौरव एका कार्यनिष्ठ ‘तपस्विनी’चा...

31 Jan 2026 13:09:16
Dr. Budhari Tati
 
डॉ. बुधरी ताती, दंतेवाडा-छत्तीसगढ येथे कार्यरत मां शंकिनी महिला उत्थान केंद्र, हिरानार आश्रम विकास खंड, कार्यक्षेत्र- गीदम, छत्तीसगढ यांना नुकताच ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. यापूर्वी ‘महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थे’मार्फत देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील ‘बाया कर्वे पुरस्कारा’ने त्यांना सन २०२२ मध्ये सन्मानित करण्यात आले होते. सन २०१६ मध्ये पंडित सुंदरलाल विश्व विद्यालय, बिलासपूर यांनी ‘डॉक्टरेट’ ही पदवी त्यांना अत्यंत सन्मानपूर्वक देण्यात आली. ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित होणार्‍या डॉ. बुधरी ताती यांनी नक्षलग्रस्त भागातील समाजबांधवांकरिता उभ्या केलेल्या कार्याची ओळख व या कार्य-उभारणीत त्यांनी पेललेली अनेक आव्हाने, त्यातून काढलेला मार्ग याचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
गेली चार दशके अत्यंत कठीण अशा भौगोलिक, नक्षलग्रस्त वनवासी क्षेत्रात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व आत्मनिर्भरता या विषयांत डॉ. बुधरी ताती या कार्यरत आहेत. यातून साधली जाणारी समाजबांधणी व समाजाचे उत्थान हे राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनेही या कामाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. डॉ. बुधरी ताती यांनी वयाच्या १५व्या वर्षीच आपले जीवन हे वनवासी समाजाच्या उत्थानाकरिता समर्पित करण्याचा निश्चय केला. त्यांच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. दोन मुली व दोन मुले असा प्रपंच चालविणे, त्यांच्या आईकरिता एक कठीण आव्हान होते. पण, मिळेल ते काम करीत त्यांनी मुलांचे संगोपन केले. वनवासी घटकांचे आयुष्य व त्यात अनेक अडचणींची भर घालणारी नक्षली चळवळ याचे चटके त्यांनीही अनेकदा सोसले होते. ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या कामातून प्रेरणा घेत त्यांनी पूर्णकालीन कार्यकर्ती म्हणून दायित्व स्वीकारले. पुढे ‘राष्ट्र सेविका समिति’च्या संपर्कात आल्यामुळे महिलांचे म्हणून जे विशेष प्रश्न असतात, ते हाती घ्यावेत असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले. महिलांचे प्रश्न हाताळताना लागणारी विविध कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने त्यांनी ‘राष्ट्र सेविका समिति’मार्फत आयोजित प्रशिक्षण-वर्गातून अनेक विषयांवर प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणांमुळे त्यांचा स्वत:वरील व हाती घेऊ इच्छित कामावरील विश्वास वाढीसच लागला. १९८०च्या दशकात त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. पदोपदी गोळ्या, स्फोटके, एन्काऊंटर, पोलीस-नक्षली संघर्ष या सगळ्यांतून मोठ्या धाडसाने त्यांनी आपल्या कार्यातून एका दुर्लक्षित अशा समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची किमया करून दाखविली.
 
अबुझमाड या भागातील ४००हून अधिक गावांचा व गावातील महिलांचा नेमका प्रश्न समजून घेण्याकरिता त्यांनी या गावांना पायी प्रवास करीत भेटी दिल्या. वनवासी भाग व त्यात नक्षलग्रस्त क्षेत्र असल्यामुळे अनेकदा त्यांचा सामना नक्षलवाद्यांशी झाला. मात्र, मनाचा निश्चय व या कामाप्रती असलेल्या निष्ठा व प्रेमामुळे अशा अनेक प्रसंगांतून त्या अधिकच खंबीर व धीट झाल्या. या कामातून त्यांनी महिलांशी, कुटुंबांशी जोडलेल्या स्नेहपूर्ण नात्यामुळेच या परिसरात त्यांना महिला मोठ्या मायेने ‘बडी दीदी’ असे संबोधतात. अशा अनेक आव्हानात्मक प्रसंगातून त्या हाती घेतलेल्या कामाशी समरस होत गेल्या. खरेतर आपण सगळेच जण त्यांना त्यांच्या नावाने ओळखतो. मात्र, दक्षिण बस्तरमध्ये त्या ‘महिला सशक्तीकरणाचे’ दुसरे नाव आहेत.
 
आपले काम हाच आपला प्रपंच, हे मानणार्‍या डॉ. बुधरी यांनी पुढे अविवाहित राहण्याचा संकल्पच केला. त्यांच्यासह काम करणार्‍या सर्वच कार्यकर्त्या या अविवाहित राहून वनवासी समाजाची सेवा करण्याचा संकल्प करतात, हेही विशेष. वनवासी क्षेत्रातील पाच हजारांहून अधिक महिलांना शिवणकाम, विणकाम, कुटीर उद्योगांचे प्रशिक्षण देत त्यांना आत्मनिर्भरतेच्या वाटेवर चालायला डॉ. बुधरी यांनी शिकविले. मुख्य म्हणजे, त्यांच्या जगण्यातील आत्मविश्वास व ऊर्मी त्यांनी वाढविली. अज्ञान, दारिद्य्र इ. कारणांमुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या महिलांना भेटून, त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून अनेक महिलांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची किमया त्यांनी करून दाखविली. अंधश्रद्धा, अज्ञान, अशिक्षितपणा, यामुळे वनवासी समाजात अनेक चुकीच्या (गैर)समजुती असतात. रोज अंघोळ न करणे, व्यक्तिगत स्वच्छतेचा अभाव, देवीचा प्रकोप होईल या भीतिपोटी औषधे घेण्यास नकार, अशा अनेक बारीकसारीक सवयी व चुकीच्या पद्धतींवर त्यांनी प्रयत्नपूर्वक काम केले व त्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणला. याच कामातून अनेक वनवासी कुटुंबांची त्या ‘आरोग्यसखी’ झाल्या. हे कार्य उभे करीत असताना त्या आजपर्यंत हजारो मैल पायी चालल्या असून, आजही अनेक गावांपर्यंत पोहोचण्याकरिता त्यांना घनदाट जंगलातून व नक्षलग्रस्त वसाहतीतून पायी चालत जावे लागते.
 
एक स्त्री म्हणून दुर्लक्षित व भयग्रस्त समाजात काम करणे, मुख्य म्हणजे नक्षली साम्राज्यात काम करणे सोपे, साधे व सहज कधीच नव्हते. या ‘चुनौती’पूर्ण कार्याकरिता बाहेर पडताना अनेकदा नक्षली घटकांनी त्यांना अडविण्याचा, त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; तर काही प्रसंगात त्यांच्यावर जीवघेणे हल्लेदेखील करण्याचे बेत नक्षलवाद्यांनी आखले. मात्र, स्वतःच्या कामावरील निष्ठा, या कामातून मिळू लागलेला समाजबांधवांचा आधार व ‘या केवळ विकासात्मक कार्य करीत असल्याची’ खात्री पटल्यानंतर नक्षलवाद्यांनी काही प्रमाणात आपली दृष्टी व भूमिका सौम्य करायला सुरुवात केली. आपली मुले शिक्षण घेत आहेत, आरोग्यपूर्ण जीवन जगू लागली आहेत, अशा अनेक परिवर्तनाची दृश्यरूपे या आव्हानांची धार कमी करू लागले. विशेषतः जीवावरील हल्ले व स्त्री म्हणून स्वतःची सुरक्षा या दोन गोष्टींवर प्रतिबंधात्मक रणनीती आखत, अत्यंत डोळसपणे त्यांनी आपल्या कार्याची रचना केली. केवळ स्वतःपुरते नव्हे, तर सर्व महिला कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचे भान ठेवत त्यांनी सतर्कता पाळण्याचे मापदंड तयार केले. अशा अनेक अडचणींना सामोरे जात त्या अधिकच प्रगल्भ व हाती घेतलेल्या कामाप्रती गंभीर होत गेल्या.
 
गावपातळीवरील कामाच्या अनुभवातून पुढे त्यांनी संस्थात्मक कामाची मुहूर्तमेढ रोवली. सन १९९० मध्ये हिरानार, दंतेवाडा येथे एक कन्या छात्रावास व एक वृद्धाश्रम सुरू केला. परिसरातील मुली-वृद्ध महिलांना आधार व निवारा दिला. अनेक दूरच्या खेड्यातील मुलींची शिक्षणासाठी या छात्रावासात सोय केली जाते, तर नक्षलवादी आक्रमणातून उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील वृद्ध महिलांना येथे सुरक्षित निवारा दिला जातो. आपल्या कार्याची व्याप्ती वाढत असताना आजही त्या ‘एकल अभियाना’तील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व अभिभावक म्हणून काम करतात, हे त्यांच्या कामातील कार्यनिष्ठा अधोरेखित करते.
 
बस्तर परिसरात वनवासी महिलांचे सक्षमीकरण, मुलींचे शिक्षण आणि लोकसंस्कृती जतन, यासाठी कार्य करणार्‍या बुधरी ताती या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमा’च्या सेवाव्रताशी जोडलेले राहून व समितीच्या मुशीतून तयार झालेल्या डॉ. बुधरी यांनी वनवासी समाजात आत्मसन्मान व स्वावलंबनाची जाणीव निर्माण केली.दृढनिश्चयाचे एक अप्रतिम; परंतु तितकेच आव्हानात्मक कार्य डॉ. बुधरी यांनी स्वतःवरील विश्वास, कामातील निष्ठा व समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व जपत उभे केले. ज्या वनवासी समाजाकरिता ‘एकल अभियान’ समर्पित आहे, त्याच समाजातील या तेजःपुंजास सन्मानित करताना संस्था म्हणून आम्ही गौरान्वित झालोच; पण त्यांच्या कार्याचा गौरव ‘पद्मश्री’ पुरस्काराने होत असताना आम्हीही त्यांच्यासह गौरान्वित होत असल्याचा अनुभव घेत आहोत. डॉ. बुधरी ताती यांच्या कार्याला शतश: प्रणाम व वंदन!
 
हा पुरस्कार म्हणजे बस्तरमधील माझ्या बांधवांचे आशीर्वाद!
 
माझ्या व सर्व सहकार्‍यांच्या सहभागातून बस्तरवासीय वनवासी बांधवांच्या विकासाकरिता उभे राहिलेल्या कार्याची दखल घेऊन मला ‘पद्मश्री’ पुरस्कार दिल्याबद्दल मी सर्व संबंधितांचे नम्रतापूर्वक आभार मानते. हा पुरस्कार म्हणजे, बस्तरमधील माझ्या बांधवांचे आशीर्वाद आहेत. या पुरस्काराच्या निमित्ताने बस्तरमधील वनवासी बांधवांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी व आव्हानांचे स्वरूप जगासमोर आणले. आता अधिक मदतीचे हात त्यांच्या विकासासाठी पुढे येतील, हे नक्की.
 
- डॉ. बुधरी ताती, सामाजिक कार्यकर्त्या, छत्तीसगढ
 
 
 
 
 
- स्मिता कुळकर्णी
(लेखिका महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत.)
 
 
 
Powered By Sangraha 9.0