मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखिल भारतीय व्याघ्र गणनेच्या पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणाअंती वाघाच्या प्रजननाचे पुरावे मिळून आले आहेत (sindhudurg tiger). जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील चिन्ह सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून वाघिणीबरोबरच पिल्लांच्या पदचिन्हांचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे (sindhudurg tiger). आता फेब्रुवारी महिन्यात याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून जिल्ह्यातील वाघांची नोंद केली जाईल (sindhudurg tiger). या माध्यमातून सिंधुदुर्गातील वाघांची नेमकी संख्या किती याची माहिती समोर येईल. (sindhudurg tiger)
सिंधुदुर्ग वन विभागाने अखिल भारतीय व्याघ्र गणेनेअंतर्गत जिल्ह्यातील वाघांच्या गणनेला सुरुवात केली आहे. याअंतर्गत १९ ते २४ जानेवारी दरम्यान पहिल्या टप्प्यातील चिन्ह सर्वेक्षणाचे काम करण्यात आले. यासाठी वन कर्मचारी ८३ बीटांमध्ये फिरले आणि त्याठिकाणी आढळेल्या वन्यजीवांच्या विष्ठा, पदचिन्ह, ओरखडे अशा चिन्हांची माहिती गोळ्या केल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन शिड्तुरे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले. सर्वेक्षणाअंती वनकर्मचाऱ्यांना दोडामार्ग आणि आंबोली नियतक्षेत्रामध्ये वाघांच्या वावराचे पुरावे मिळून आले आहेत. खास करुन दोडामार्ग तालुक्यात वाघीण आणि तिच्या दोन पिल्लांची पदचिन्ह आढळून आली आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात वाघांचे यशस्वी प्रजनन होत असल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी महिन्यात पार पडणाऱ्या अखिल भारतीय व्याघ्र गणनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सावंतवाडी, दोडामार्ग, आंबोली आणि रांगणा किल्याच्या भाग मिळून साधारण १०० प्राॅईंटवर २०० कॅमेरा ट्रॅप लावण्यात येतील, असे शिड्तुरे यांनी सांगितले. याद्वारे मोजण्यात आलेली वाघांची संख्या ही राष्ट्रीय व्याघ्र गणनेत समाविष्ट करण्यात येईल. यावर्षी पहिल्यांदाच सावंतवाडी तालुक्यात कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे व्याघ्र गणनेचे काम होणार आहे.
सिंधुदुर्गातील वाघाच्या अधिवासाचे क्षेत्र हे सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गाचा भाग आहे. सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गाचा विस्तार हा महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे. १० हजार ७८५ चौ.किलोमीटर क्षेत्रावर या भ्रमणमार्गाचा विस्तार पाहायला मिळतो. 'डब्लूसीटी'ने वन विभागाच्या मदतीने २०२२-२३ या साली केलेल्या अभ्यासात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमधून १० वाघांच्या छायाचित्रांची नोंद केली होती. डब्लूआयआयने सावंतवाडी-दोडामार्ग इको-सेन्सिटिव्ह झोनसंदर्भातील अहवाल जानेवारी, २०२३ साली प्रकाशित केला होता. या अहवालात त्यांनी सावंतवाडी-दोडामार्ग इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये अधिवास करणाऱ्या सहा वाघांची छायाचित्र प्रसिद्ध केली होती. मात्र, सिंधुदुर्गात वाघांची संख्या एवढीच नसून यापेक्षा अधिक वाघांचा अधिवास जिल्ह्यात आहे.
सावंतवाडीत वाघिणीचे दर्शन
सावंतवाडी तालुक्यात वन्यजीव निरीक्षक कौस्तुभ कोरगावकर आणि छायाचित्रकार रीस सॅम यांना वाघिणीचे दर्शन घडले आहे. वाघिणीचे हे छायाचित्र अखंड सह्याद्रीत आढळणाऱ्या वाघांसोबत जुळवले गेले. मात्र, ते कोणत्याच वाघासोबत जुळले नाही. मात्र, गेल्यावर्षी वनविभागाने सावंतवाडी तालुक्यात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये ही वाघीण पिल्लांसोबत दिसून आली होती. आता पिल्ल स्वतंत्र झाल्यानंतर ती पुन्हा फिरु लागली आहे.