छत्रपतींच्या घराण्यातील वास्तुविशारदांचा वंशज

    30-Jan-2026
Total Views |
Sameer Indalkar
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वास्तुविशारदांच्या कुळातील असलेले समीर इंदलकर हे छत्रपतींचा इतिहास देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचावा म्हणून प्रयत्नशील आहेत. त्यांच्याविषयी...
 
पुणे जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा तसा निर्विवाद. सह्याद्रीच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड-किल्ले आजही अनेक शतकांनंतर अबाधित, शाबूत आहेत. त्यामुळे या काळातील प्रत्येक पिढीने या ऐतिहासिक वारशांचा आपापल्यापरीने अभ्यास केला. केवळ गड अस्तित्वात असण्यासोबतच त्याकाळात छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत अठरापगड जातीतील मावळ्यांनी आपले हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी बहुमूल्य असे योगदान दिले. त्या मावळ्यांमधील काही घराण्यांचे वंशज आजदेखील याच सह्याद्रीच्या कुशीत हा मौलिक वारसा जतन करण्यासाठी बदलत्या काळानुसार प्रयत्नदेखील करीत आहेत. अशाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील वास्तुविशारद असणार्‍या हिरोजी इंदलकर यांच्या विचारांचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करणारे समीर इंदलकर. ते गड-किल्ल्यांचे ज्याप्रकारे संवर्धन करीत आहेत, ते भावी आणि आताच्या पिढीसाठी प्रेरक असेच. एवढेच नाही, तर या परिसरात निसर्गसंवर्धनासाठीदेखील ते झटत आहेत.
 
समीर इंदलकर यांचे शिक्षण पुण्यात झाले. लहानपणापासून त्यांना सामाजिक कार्याची आवड. सध्या ते पिंपरी-चिंचवडमधील एका कंपनीमध्ये कार्यरत आहेत. अर्थक्रांती जनसंवाद, ‘लाईफ माईंडेड इनिशिएटिव्ह फॉर एम्पॉवरमेंट’ अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला त्यांनी सुरुवात केली. महाविद्यालयीन काळात वर्गणी काढून रक्तदान शिबीर आयोजित करणे, गरजूंना मदत पुरवणे, ग्रामीण भागातील शाळांना काय हवे-नको पाहणे, गरीब घरातील विद्यार्थ्यांना शिक्षणोपयोगी वस्तू पुरवणे अशा अनेक उपक्रमांतून सामाजिक कार्याला त्यांनी सुरुवात केली.
 
विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करताना, अनेक माणसांना जोडत असताना विविध इतिहासकारांच्या संपर्कात ते आले. यातून अवलोकन करीत, माहिती घेत त्यांनी हा आपला देदीप्यमान असा प्रेरक इतिहास जपण्याची धडपड सुरू केली. सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील विविध सरदारांच्या वंशजांच्या गाठीभेटी घेत इतिहास जपण्यासाठी उपक्रम सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. सध्या त्यांनी महाराष्ट्रातील अधिकाधिक गड-किल्ले स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली. त्यांनी गडांवर स्वच्छता मोहीम राबवली आहे. ‘सरदार हिरोजी इंदलकर प्रतिष्ठान’च्या माध्यमातून गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा मावळ्यांचे स्मरण राहावे, यासाठी स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मुघलांसोबत लढा देणार्‍या अनेक सरदारांचे वंशज एकत्र करत, सगळ्यांना एकत्र बोलावले जाते. त्यानिमित्ताने समीर यांनी विविध राज्यांना भेटी दिल्या. देशभरात मराठा सरदारांचा इतिहास पोहोचला पाहिजे, हे त्यांचे उद्दिष्ट. विविध कंपन्यांच्या ‘सीएसआर’ प्रकल्पातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवताना सातत्याने जनतेच्या भल्याचा विचार केला जातो. त्यांनी तरुणांची टीम तयार केली आहे. कोणताही उपक्रम आयोजित करायचा असेल, तर बैठक घेतली जाते, उपक्रमाची रूपरेषा ठरवली जाते आणि उपक्रम यशस्वी करून दाखवला जातो.
 
आतापर्यंत स्वच्छता मोहीम राबविलेल्या विविध गड-किल्ल्यांवरून २००हून अधिक पोती कचरा गोळा केला आहे. तसेच किल्ल्यांवर वृक्षारोपण केले. पुण्याच्या जवळ पानशेत येथील शिवसृष्टीत देखील मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवण्यात आले आहेत. केवळ स्वच्छतेपुरते न थांबता, समीर यांनी अन्य संकल्पनादेखील रुजविण्यास सुरुवात केली आहे. तरुणांच्या मनात हिंदवी साम्राज्याचा समृद्ध इतिहास रुजवण्यासाठी लहान मुलांना, तरुणांना विविध गड-किल्ल्यांवर ते घेऊन जातात. विशेष म्हणजे, त्या-त्या गडांवर ते इतिहासाची माहिती देतात. छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत स्वराज्य उभे करताना मावळ्यांनी कशाप्रकारे संघर्ष केला, याची माहिती देतात. यातून नवीन पिढ्यांना स्वराज्याच्या इतिहासाची माहिती असावी, हा उद्देश असतो. मराठी सण साजरे करण्यासाठी या सणांची माहिती दिली जाते. सणावारांना एकत्र यावे, यासाठी उपक्रम राबविले जातात. यावेळी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक घेतले जाते. ट्रेकिंगचे प्रशिक्षण दिले जाते. लहान मुलांना काय चांगले, काय वाईट याची माहिती दिली जाते.
 
आपण जे काही आहोत, ते आपल्या शिक्षणामुळे. आपल्या शिक्षकांचा आदर राहावा, यासाठी शिक्षकांचा ‘सन्मान सोहळा’ आयोजित केला जातो. शिक्षणातूनदेखील भावी पिढीला या आपल्या छत्रपतींच्या खर्‍या इतिहासाची ओळख व्हावी आणि त्यापासून नव्या पिढ्यांना प्रेरणा मिळावी, हादेखील त्यामागे हेतू. तसेच स्वराज्यातील विविध सरदारांच्या रथांचेदेखील पुण्यात आयोजन केले जाते. यावेळी या उपक्रमात समीर यांचा सातत्याने पुढाकार असतो. शिवाय, अन्य तरुणाईदेखील हिरिरीने भाग घेत असते. मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक पद्धतीने सजावट केलेले रथ यात सहभागी होतात. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना विविध संस्थांनी गौरविले आहे. या गौरवापेक्षा गडांचे संवर्धन आणि सभोवतालच्या निसर्गाचे जतन हे आपल्यासाठी मौलिक आहे आणि त्यात सर्वांनी हातभार लावावा, अशी त्यांची प्रामणिक भावना आहे. त्यांच्या या ऐतिहासिक जतन-संवर्धन कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
- शशांक तांबे