‘गोल्ड लाईन’ मेट्रो आणि ‘तिसर्‍या मुंबई’चा नवा अध्याय

Total Views |
Gold Line Metro
 
मुंबई महानगर प्रदेश एका नव्या शहरी परिवर्तनाच्या टप्प्यावर उभे आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो (गोल्ड लाईन - मेट्रो मार्गिका ८) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कनेक्टिविटी, प्रवास आणि विकासाची दिशा बदलणार आहे. अवघ्या अर्ध्या तासात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांना जोडणारा हा प्रकल्प तिसर्‍या मुंबईच्या उभारणीची मजबूत पायाभरणी करत आहे. नुकतीच या मार्गाला राज्याच्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली. त्यानिमित्ताने मुंबईला नवी मुंबईशी जोडणार्‍या या मेट्रो मार्गिकेविषयी...
 
महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासात एक निर्णायक अध्याय जोडला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील ‘राज्य मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती’ने दि. २७ जानेवारी रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण मंजुरींमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो प्रकल्प विशेष ठरतो. ‘गोल्ड लाईन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या मेट्रो मार्गिकेमुळे केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही, तर मुंबई महानगर प्रदेशाच्या शहरी विकासाची संकल्पनाच नव्याने आकार घेणार आहे.
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रारंभासोबतच, आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना थेट जोडणार्‍या वेगवान मेट्रोमार्गाला मंजुरी मिळाल्याने ‘तिसर्‍या मुंबई’चा संकल्प अधिक दृढ होत आहे. दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांना एका उच्च दर्जाच्या मेट्रो कॉरिडोरने जोडणारा हा प्रकल्प देशातीलच नव्हे, तर जागतिक शहरी नियोजनासाठी एक आदर्श मॉडेल ठरण्याची क्षमता बाळगतो.
 
मुंबई ते नवी मुंबई अवघ्या ३० ते ३५ मिनिटांत
 
या ‘गोल्ड लाईन’ मेट्रोमुळे मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांदरम्यानचा प्रवास अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. आज जो प्रवास वेळखाऊ, तणावपूर्ण आणि अनिश्चित आहे, तो भविष्यात वेगवान, सुकर आणि नियोजनबद्ध बनेल. ही मेट्रो लाईन मुंबई मेट्रो, तसेच नवी मुंबईतील विद्यमान वाहतूक जाळ्याशी थेट जोडली जाणार असल्याने महामार्गांवरील आणि पुलांवरील वाहतुककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. दररोज प्रवास करणारे नागरिक, व्यावसायिक, विमानतळ कर्मचारी, लॉजिस्टिस आणि सेवा क्षेत्रातील मनुष्यबळासाठी ही लाईन जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवणारी ठरणार आहे.
 
प्रकल्प अंमलबजावणी ‘पीपीपी’ मॉडेलअंतर्गत
 
या प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक-खासगी भागीदारी म्हणजेच ‘पीपीपी मॉडेल’अंतर्गत करण्यात येणार असून, शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक संतुलित आर्थिक आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक २२ हजार कोटी रुपये कोटी हा अंदाजित खर्च केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन प्रत्येकी २० टक्के निधी ‘व्हायबिलिटी गॅप फण्डिंग’च्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असून, उर्वरित ६० टक्के गुंतवणूक खासगी विकासकाकडून केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवरील भार कमी होताना, प्रकल्पाची गती आणि कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची धुरा ‘सिटी अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’अर्थात ‘सिडको’कडे देण्यात आली असून, खासगी कन्सोर्टियमच्या भागीदारीत हा प्रकल्प ‘बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर’ मॉडेलवर विकसित केला जाणार आहे.
 
दोन्ही विमानतळांचे ‘टी-२’ जोडणारी मेट्रो
 
‘सिडको’ने सल्लागार ‘मे. अर्बन मास ट्रान्झिट कंपनी लि.’ यांच्यामार्फत तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार, ही मार्गिका एकूण ३४.८९ किमी लांबीची असेल. हा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-
२ पासून सुरू होईल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ येथे समाप्त होईल. यामध्ये ९.२५ किमीचा मार्ग जमिनीखालून, तर उर्वरित २५.६४ किमीचा मार्ग उन्नत ( Elevated ) प्रस्तावित आहे.
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ शहरी परिवर्तनाचा केंद्रबिंदू
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा या संपूर्ण शहरी परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. मुंबईतील विद्यमान विमानतळावरील ताण कमी करणे आणि भविष्यातील हवाई वाहतुकीची गरज पूर्ण करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमुळे जागतिक व्यापार, पर्यटन आणि उद्योगक्षेत्राला चालना मिळेल. परिणामी, नवी मुंबईत लॉजिस्टिस, कार्गो, हॉटेल्स, कॉर्पोरेट कार्यालये आणि व्यावसायिक संकुलांचा वेगाने विस्तार होताना दिसतोय, ज्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीही होते आहे.
 
नवी मुंबई - ‘रिअल इस्टेट हब’
 
‘गोल्ड लाईन’ मेट्रो आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचा संयुक्त परिणाम नवी मुंबईला ‘रिअल इस्टेट हब’ म्हणून पुढे आणत आहे. अवघ्या अर्ध्या तासात दोन विमानतळांदरम्यान प्रवास शक्य होणे, ही सुविधा नागरिकांचे राहणीमान, व्यवसायिक निर्णय आणि गुंतवणूक धोरणे बदलून टाकेल. मेट्रो स्थानकांजवळील आणि विमानतळ कॉरिडोरमधील भागांमध्ये मालमत्तेच्या किमतींमध्ये वाढ, भाडे बाजारात तेजी आणि नव्या निवासी व व्यावसायिक प्रकल्पांची मागणी झपाट्याने वाढताना दिसेल. तळोजा, पनवेल, उलवे, खारघर, द्रोणागिरी आणि रोडपाळी हे भाग आगामी काळात विकासाचे नवे केंद्रबिंदू ठरतील.
 
रोजगाराच्या संधींची नवी परिसंस्था
 
या शहरी परिवर्तनासोबत रोजगाराच्या संधींची नवी परिसंस्था आकार घेत आहे. विमानसेवा, लॉजिस्टिस, किरकोळ व्यापार, आदरातिथ्य सेवा, आयटी आणि विविध सेवाक्षेत्रांत हजारो नोकर्‍या निर्माण होतील. त्यामुळे लोकसंख्येचा ओघ वाढेल, गृहप्रकल्पांची मागणी बळावेल आणि नवी मुंबई अधिक गतिमान, बहुआयामी शहर म्हणून उदयास येईल. मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असून, विकासक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार नवी मुंबईकडे दीर्घकालीन संधी म्हणून पाहात आहेत.
 
नवी मुंबई - विकासाचे इंजिन
 
दशकानुदशके नवी मुंबईकडे मुंबईचा पर्याय म्हणून पाहिले जात होते. मात्र, आज तीच नवी मुंबई मुंबई महानगर प्रदेशाची प्रमुख विकास इंजिन बनत आहे. जागतिक कनेटिव्हिटी, स्मार्ट पायाभूत सुविधा, नियोजित शहरी विकास आणि शाश्वत वाढ यांचा संगम येथे प्रत्यक्षात उतरत आहे. मेट्रो कनेक्टिविटी, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि स्मार्ट सिटी संकल्पनेच्या एकत्रीकरणातून नवी मुंबई भारतासाठी पुढील पिढीचे आदर्श शहरी मॉडेल ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
 
भारताच्या शहरविकासाची दिशा
 
‘गोल्ड लाईन’ मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ वाहतूक प्रकल्प नाहीत, तर ते महाराष्ट्राच्या प्रगतीशील दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत. जीवनमान उंचावणारे, आर्थिक विकासाला चालना देणारे आणि जागतिक गुंतवणुकीचे नवे दरवाजे उघडणारे हे प्रकल्प नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया घालणार आहेत. कनेटिव्हिटी आणि स्मार्ट पायाभूत सुविधांवर आधारित शहरी विकासाचे हे मॉडेल पुढील दशकातील भारताच्या शहरविकासाची दिशा ठरवणारे ठरेल.
 
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.