व्हेनेझुएलाच्या राजधानीवर अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई! राष्ट्राध्यक्ष मादुरो पत्नीसह अमेरिकेच्या ताब्यात

03 Jan 2026 21:38:36

US Strikes Venezuela

मुंबई : (US Strikes Venezuela)
अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचला असून, व्हेनेझुएलाची राजधानी कराकसवरील अमेरिकेच्या हल्ल्यामुळे एका नव्या युद्धाचे ढग जमा झाले आहेत. या कारवाईमध्ये व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोलान्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर केला आहे.
निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलीया फ्लोरेस यांच्यावर न्युयॉर्कमध्ये आरोप पत्र दाखल करण्यात आले असून, या आरोपपत्रामध्ये मादुरो यांच्यावर अमली पदार्थ तस्करी, दहशतवादी कारवाया, घातक हत्यारे बाळगणे अशा आरोपांचा समावेश असल्याचे अमेरिकेच्या अ‍ॅटॉर्नी जरनल पमेला बाँडी यांनी म्हटले आहे. मादुरो यांच्यावरील सर्व खटले अमेरिकेमध्ये चालणार असून, लवकरच मादुरो योग्य शिक्षा मिळेल असे पमेला यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटले आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वी सातत्याने अमेरिकेतील वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीसाठी व्हेनेझुएलाला जबाबदार धरले होते. ट्रम्प यांनी मादुरो यांच्यावरही अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी असल्याचा आरोपही केला होता. त्याचवेळी वेळ पडल्यास लष्करी कारवाईची शक्यताही ट्रम्प यांनी वर्तवली होती. अलीकडेच ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर त्यांच्या करअस्त्राचाही वापर करताना, गेल्या आठवड्यात व्हेनेझुएलसाठी हवाई हद्द बंद करण्याचाही निर्णय घेतला होता.
अखेरीस शनिवार दि. 3 जानेवारी रोजी अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी कराकसला लक्ष्य केले. हा हल्ला रात्री 1.30च्या सुमारास झाला. त्यानंतर ठरावीक अंतराने अमेरिकेने हल्ले केल्याने, व्हेनेझुएलाच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले होते. अमेरिकेच्या या कारवाईला व्हेनेझुएला सरकारने लष्करी कारवाई म्हटले आहे. तसेच, अशा पद्धतीने अमेरिकेचे कोणतेही मनसुबे यशस्वी होणार नसल्याचेही व्हेनेझुएलाने निवेदनांच्या माध्यमातून जाहीर केले आहे.
व्हेनेझुएलावरील कारवाईचा भाग म्हणून अमेरिकच्या सैन्याने कॅरेबियन समुद्र आणि पूर्व प्रशांत महासागरातही, अनेक अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली अनेक नौकांवरही हल्ले केले, यामध्ये जवळपास 107 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
व्हेनेझुएलामध्ये सत्ताबदलासाठी अमेरिकेच्यावतीने सातत्याने व्हेनेझुएलावर दबाव टाकण्यात आला होता. अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी सैन्य कारवाईची शक्यताही ट्रम्प यांनी वेळोवेळी जाहीर केली होती. मात्र, अमेरिकेने अमली पदार्थांच्याबाबतीत केलेले सगळेच आरोप व्हेनेझुएलाने वेळोवेळी नाकारले होते.
सारे काही तेलासाठी...

अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी व्हेनेझुएलावर कारवाई केल्याचे ट्रम्प सांगत असले, तरीही या कारवाईमागील मुख्य उद्देश व्हेनेझुएलातील तेलसाठे असल्याचे म्हटले जात आहे. तसा आरोप मागील आठवड्यात व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांनीही केला होता. व्हेनेझुएलामध्ये जगातील 20 टक्क्यांपेक्षा जास्त तेलसाठे असून, या देशामध्ये 303 अब्ज पिंपापेक्षाही अधिक तेल उपलब्ध आहे. य व्हेनेझुएलाची 90 टक्के अर्थव्यवस्था ही तेलावर अवलंबून असून, 2019 मात्र अमेरिकेच्या निर्बंधांमुळे तेलाच्या उत्पादनात घट झाली होती.

Powered By Sangraha 9.0