एकतर्फी संघर्ष

03 Jan 2026 10:14:23

Rahul Gandhi 

राजकीय पक्ष एकमेकांशी संघर्ष करतात. असे अनंत संघर्ष समाजात चालू असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणाशीही संघर्ष करीत नाही. यासंदर्भात संघ ही जगातील एकमेवाद्वितीय संघटना आहे.

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांना राहुल गांधींचे राजकीय गुरू मानले जाते. या राजकीय गुरूने काँग्रेस स्थापनेच्या आदल्या दिवशी एक वक्तव्य केले. त्यात एक फोटो टाकला. या फोटोत भाजपचे वरिष्ठ नेते खुर्चीवर बसले आहेत आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पायाशी. पण, जमिनीवर बसले आहेत, त्यावर त्यांनी भाष्य केले की, ‘संघटनेची शिस्त अशी असते की, नेत्यांच्या पायाजवळ बसलेला कार्यकर्ता गुजरातचा मुख्यमंत्री झाला आणि आज देशाचा पंतप्रधान आहे.’ दिग्विजय म्हणाले की, "हा जुना फोटो आहे;” पण तो कोणत्या कार्यक्रमातला आहे हे त्यांनी सांगितले नाही.

हा फोटो संघाच्या कुठल्यातरी कार्यक्रमातील असावा. नरेंद्र मोदी तेव्हा संघप्रचारक होते. संघाच्या कार्यक्रमात एखादा राजनेता आहे म्हणून त्याला बसण्यासाठी खुर्ची दिली जात नाही. संघाच्या पद्धतीप्रमाणे सर्व स्वयंसेवक असतात. मुख्य शिक्षकांनी ‘उपविश’ अशी आज्ञा दिली की, सर्वजण खाली बसतात. जे बसू शकत नाहीत, त्यांच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था असते. वय झाले की, खाली बसणे आणि उठणे फार कठीण होते. अशा वेळी ज्यांना बसण्यास त्रास होतो, त्यांच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था आहे, असे सांगितले जाते. नरेंद्र मोदी तेव्हा तरुण होते. त्यांना खुर्चीची काही गरज नव्हती. राजकीय खुर्चीचा प्रवास जमिनीवर बसण्यापासून झाला, असे दिग्विजय सिंह म्हणू शकतात आणि त्यांचा हा इशारा राहुल गांधींकडे आहे, हे माध्यमांनी सांगायला सुरुवात केली. संघासारखी शिस्त पक्षात निर्माण करा, हा गुरूचा शिष्याला आदेश असावा. परंतु, शिस्त कशाशी खातात हे ज्याला समजत नाही, तो शिस्तीच्या मार्गाने जाईल, अशी अपेक्षा करणे चुकीची आहे.

राहुल गांधी दर सहा महिन्यांनी नवनवीन विषय काढत असतात. अगोदर अदानी-अंबानी झाले, मग राफेल झाले आणि आता व्होटचोरीचा विषय सुरू आहे. मतदार हे सर्व विषय करमणुकीचे विषय आहेत, असे मानून स्वत:ची करमणूक करून घेतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान करतात. राहुल गांधी यांनी यात नवीन विषय जोडला, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांची विचारधारा देशाला घातक आहे. माझा संघर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी आहे.”

हा विषय तसा नवीन नाही. नेहरू राजघराण्याची ओळखच संघाशी संघर्ष करण्याची आहे. १९४८ साली पंडित नेहरूंनी संघावर बंदी घातली. १९७५ साली श्रीमती इंदिरा गांधींनी संघावर बंदी घातली. नरसिंहराव यांनी १९९२ साली संघावर बंदी घातली. या तीनही बंदीचा एक परिणाम झाला, तो म्हणजे संघ अतिशय बलवान होत गेला आणि क्रमश: काँग्रेस कमजोर होत गेली. राहुल गांधी हे काँग्रेस संपविण्याच्या मागे लागलेले आहेत आणि त्याचा मार्ग म्हणजे, कारण नसताना संघाला राजकीय वादात ओढण्याचे आहे.

संघर्ष नेहमी दोन पक्षांत होतो. खेळाच्या स्पर्धा असतात, तेव्हा दोन संघ एकमेकांशी लढत राहातात. कुस्त्यांच्या आखाड्यात दोन मल्ल एकमेकांशी लढतात. गायनाच्या जुगलबंदीत दोन गायक एक राग गातात. कोणाचे गाणे चांगले झाले हे ऐकणार्‍याने ठरवायचे असते. राजकीय पक्ष एकमेकांशी संघर्ष करतात. असे अनंत संघर्ष समाजात चालू असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणाशीही संघर्ष करीत नाही. यासंदर्भात संघ ही जगातील एकमेवाद्वितीय संघटना आहे.

राहुल गांधी म्हणतात की, "माझा संघर्ष संघाशी आहे.” संघ राहुल गांधींचे नावही घेत नाही. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची वेगवेगळ्या ठिकाणी भाषणे होत असतात, या भाषणात ते चुकूनही राहुल गांधी किंवा काँग्रेस यांचे नावही घेत नाहीत किंवा अपरोक्षपणे त्यांना काही सांगण्याचाही प्रयत्न करीत नाहीत. म्हटले तर राहुल गांधी यांचे बोलणे प्रतिक्रिया निर्माण करण्यास योग्य असते. परंतु, संघ त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. त्याचे कारण असे की, हे आरोप इतके हास्यास्पद आहेत की, त्यावर प्रतिक्रिया देणे, हा बालिशपणा ठरेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापनेपासूनची भूमिका अशी आहे की, आपले कार्य कोणाच्याही विरोधात नाही. ‘सर्वेशाम् अभिरोधेन’ - आपल्याला संघकार्य करायचे आहे,’ असे संघसंस्थापक डॉ. हेडगेवार सांगत. ते हयात असतानाच काँग्रेसने संघाचा विरोध सुरू केला. डॉक्टरांनी या विरोधाला कधी उत्तर दिलेले नाही. श्रीगुरुजींनी हाच आदर्श पुढे चालविला. संघावरील पहिली बंदी १९४९ साली उठली. त्यानंतर गुरुजींचा देशभर दौरा झाला. सर्व ठिकाणी त्यांची भाषणेही झाली. या भाषणात त्यांनी काँग्रेस, पंडित नेहरू यांच्याबद्दल एकही वाकडा शब्द उच्चारला नाही. समाज संघटनेचे आपले कार्य काय आहे, याचे विवरणच त्यांनी केले. ‘वयम् पञ्चाधिकं शतम्’ म्हणजे आम्ही एकशे पाच आहोत, हे धर्मराजाचे वाय त्यांनी बौद्धिक वर्गातून सर्वांना सांगितले. देशाचा विचार करता हा काँग्रेसी, तो समाजवादी असा आपल्याला विचार करता येणार नाही. आपण सर्व एकच आहोत. एकशे पाच आहोत, असा उदात्त विचार गुरुजींनी मांडला.

‘आणीबाणी’ १९७७ साली उठली. बाळासाहेब देवरस तेव्हा सरसंघचालक होते. त्यांनी आपल्या बौद्धिक वर्गातून सांगितले की, "झाले गेले विसरून जा. क्षमाशील वृत्ती ठेवा. काँग्रेसविषयी मनात कटुता ठेवू नका. संघाचा हा सर्वसमावेशक वैचारिक प्रवास रज्जूभैया, सुदर्शनजी आणि आता डॉ. मोहनजी भागवत शुद्ध भावनेने पुढे नेत आहेत. राहुल गांधी संघर्षाचा शड्डू ठोकून उभे आहेत. पण, संघ मैदानातच उतरलेला नाही. असल्या संघर्षात संघाला काही स्वारस्य नाही.

हे जरी खरे असले, तरी जनतेला याच्यात स्वारस्य आहे. जनता संघाला पाहाते, संघ कार्यकर्त्यांचा अनुभव घेते आणि संघावरील टीका ती सहन करीत नाही. या टीकेला जनता आपल्या पद्धतीने उत्तर देते. जनता संघकार्याला कशाचीच उणीव भासू देत नाही आणि राजकीय विचार करायचा, तर मतदानाच्या दिवशी काँग्रेस चिन्हावर ‘फुल्ली’ मारते. म्हणून राहुल गांधी यांचे वर्णन ‘पराभवाचे सेनापती’ असे केले जाते. राजकारणात ते आल्यापासून विजयाने त्यांच्याकडे आणि काँग्रेसकडे पाठ फिरवली आहे. त्यातून काही शहाणपण शिकले पाहिजे. परंतु, काँगे नेत्यांची मनोभूमिका अशी असते की, ‘आमचा पक्ष देशातील सर्वात जुना पक्ष आहे. कोणीही आम्हाला शहाणपण शिकवता कामा नये, आम्ही स्वयंभू आहोत.’ या स्वयंभू राजकीय वीरांना पराभूत सेनापती आपल्या कर्तृत्त्वाने राजकीय विजनवासात घेऊन चाललेला आहे. त्याने संघाला शिव्या घातल्याने यात काही फरक पडणार आहे, असे नाही.

 
- रमेश पतंगे
 
Powered By Sangraha 9.0