स्वसंरक्षणासाठी दाढीवाल्या राघूच्या पिल्लाची भिंतीवर भिस्त; सिंधुदुर्गातून अनोख्या वर्तनाची जगातील पहिलीच नोंद

03 Jan 2026 08:30:35
blue bearded bee eater chick


मुंबई (अक्षय मांडवकर) -
निळा दाढीवाला राघू (ब्ल्यू-ब्रियर्ड बी-इटर) या पक्ष्याच्या पिल्लाने स्वसंरक्षणासाठी अंमलात आणलेल्या अनोख्या वर्तनाची नोंद सिंधुदुर्गातील ओरस गावातून करण्यात आली आहे (blue bearded bee eater chick). निळ्या दाढीवाला राघू पक्ष्यांचे पिल्लू हे रात्रीच्या वेळी भक्षकांपासून स्वसंरक्षण करण्यासाठी बिळाच्या तोंडावर दररोज सायंकाळी भिंत तयार करत असल्याचे वर्तन पक्षीनिरीक्षक सचिन प्रभू यांनी नोंदवले आहे (blue bearded bee eater chick). निळ्या दाढीवाला राघू पक्ष्यामधील पिल्लाचे हे अशाप्रकारचे वर्तन जगात पहिल्यांदाच टिपण्यात आले आहे. (blue bearded bee eater chick)

निळा दाढीवाला राघू हा भारतातील स्थानिक पक्षी आहे. त्याच्या अधिवासाचा विस्तार हा भारतातील पश्चिम घाट, पूर्व घाट, इशान्य भारतापासून नेपाळ आणि आग्नेय आशियातील काही देशापर्यंत विस्तारलेला आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात या पक्ष्याची विण आॅक्टोबर ते मे या कालावधीत होते. मातीच्या उभ्या भिंतींमध्ये बीळ तयार करुन त्यामध्ये हा पक्षी अंडी घालतो. बिळाची रचना ही प्रवेशद्वारानंतर लांबलचक नळीसारखा भाग आणि त्यानंतर गोलाकार पोकळ भाग अशी असते. निळ्या दाढीवाला राघूचे पिल्लू साधारण मे महिन्यात या पोकळ भागात अंड्यातून जन्माला येते. त्यानंतर पालक-पक्षी त्याला छोटे किटक येऊन भरवतो. याच काळातील पिल्लाकडून स्वसंरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या भिंत रचण्याच्या अनोख्या वर्तनाची नोंद पक्षीनिरीक्षक सचिन प्रभू यांनी आपल्या ओरस गावातून केली आहे. जगातून पहिल्यांदाच टिपलेल्या या वर्तनाचे टिपण 'इंडियन बर्ड्स' या नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे.


प्रभू यांनी मे, २०२५ मध्ये केलेल्या केलेल्या निरीक्षणामध्ये त्यांना दिसले की, पिल्लाच्या जन्मानंतर साधारण नवव्या दिवसापासून ते बिळातील पोकळ भाग आणि प्रवेशद्वारानंतरच्या लांबसर नळीसारख्या भागामध्ये एक भिंत तयार करते. ही भिंत पिल्लाद्वारे किटकांचे पंख, खाऊन उरलेले इतर अवयव आणि मातीचा वापर करुन रचली जाते. त्यासाठी तो आपल्या चोचीचा वापर करतो. ही प्रकिया पिल्लू सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरू करतो. अवघ्या दहा-पंधरा मिनिटांमध्ये तो भिंत रचतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा भिंत आता पोकळ भागात ओढून घेतो. जन्मल्यापासून अगदी तिसाव्या म्हणजेच बिळातून बाहेर येईपर्यंत दररोज पिल्लू ही भिंत रचत असून साप आणि इतर भक्षकांपासून वाचण्यासाठी तो हे करत असल्याची शक्यता सचिन प्रभू यांनी वर्तवली आहे. या संपूर्ण वर्तनाचे छायाचित्रण प्रभू यांनी छोट्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून केले असून या वर्तनाचा सखोल शास्त्रीय अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.


अन्नग्रहण करताना पालक पक्षी हे घरट्याबाहेर येऊन विशिष्ट आवाज देतात. त्यावेळी पिल्लू हे रांगत बिळाच्या प्रवेशद्वाराजवळ येते. मात्र, मे, २०२५ च्या सुरुवातीस एकेदिवशी सायंकाळी पालक पक्ष्यांनी आवाज देऊनही पिल्लू हे अन्न खाण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ आले नाही. यावेळी जेव्हा निरीक्षण केले तेव्हा बिळामध्ये भिंत तयार झाल्याचे समजले. सुरुवातीस हे वाळवीचे काम असल्याचे वाटले. मात्र, सखोल निरीक्षणाअंती ही भिंत पिल्लाने रचल्याचे निरीक्षणात दिसून आले, त्यानंतर मी सूक्ष्म निरीक्षण टिपून त्याची टिपण लिहण्यास सुरुवात केली. - सचिन प्रभू, पक्षीनिरीक्षक
Powered By Sangraha 9.0